विलास सारंगांनी केवळ मराठी नव्हे, भारतीय नवतेला रूढ वादांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याचे कारण स्व-संस्कृतीचा आरसा दाखवण्याचे सामथ्र्य त्यांच्या लेखणीत होते. ते न ओळखता सारंगांना चौकटबद्ध करण्याची मखलाशी करणाऱ्यांना सारंग शोधत असलेला शक्यतार्थ कधी लक्षातच आला नाही..

लेखकाकडे दुर्लक्ष करणे हे समाजाचेच दुर्लक्षण असते. मराठीत हे दुर्लक्षण किती ओतप्रोत आहे, याची चर्चा अधूनमधून होत असते; पण ओतप्रोत म्हणजे किती, याचा प्रत्यय विलास सारंग यांचे जाणे आणि त्याआधीच्या काही वर्षांतले त्यांचे जगणे पाहिल्यावर यावा. एका महत्त्वाच्या लेखकाची निधनवार्ताच सात-आठ तासांनी समजावी इतके हे दुर्लक्षण. त्याहीपेक्षा, सारंग गेली सुमारे १२ वर्षे काय करत होते, याहीकडे दुर्लक्षच. ‘सत्यकथा’सारख्या मासिकांचा जोर असताना सारंगांची जी ‘सोलेदाद’ आणि ‘एन्कीच्या राज्यात’ ही पुस्तके निघाली, त्यांखेरीज सारंगांचे काहीच न वाचलेली मंडळी बरीच आहेत. ‘अमर्याद आहे बुद्ध’, ‘रुद्र’, ‘तंदूरच्या ठिणग्या’ ही पुस्तके जणू सारंगांची नव्हेतच. मर्यादित अर्थाने ते खरेही असेल. सारंगांनी आधी इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत ते, पण या पुस्तकांचे कर्ते सारंगच आहेत. त्यांचे लेखक म्हणून जे सांस्कृतिक देणेघेणे आहे त्यात मराठीचा वाटा मोठा आहे आणि मुख्य म्हणजे ते आपला- भारतीय तसेच मराठी वाङ्मयव्यूहाचा विचार करणारे म्हणून ‘आपले’ आहेत, असे किती जणांना वाटत होते, या प्रश्नाचे आजचे उत्तर तरी निराशाजनक आहे. सारंग तर गेलेच. आता त्या निराशेतून बाहेर पडायचे तर, सारंगांकडे पुन्हा पाहण्याचे कर्तव्य आपले आहे.
प्रत्येक कर्तव्याला पळवाट असते. सारंगांच्या बाबतीत ही पळवाट फारच रुंद आहे. मराठीत त्यांची ११, पण इंग्रजीतही आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी कथा आहेत. सारंग इंग्रजीत सर्वदूर पोहोचले होते आणि आपल्या दिलीप चित्र्यांसह आदिल जस्सावाला, डॉम मोराइस ते अरविंद अडिगा अशा बिनीच्या इंग्रजी लेखकांनी सारंगांची थोरवी वर्णिली- किंवा त्याही पलीकडे- परदेशी जाणकारांनी आणि सॅम्युअल बेकेटसारख्या लेखकाने सारंगांच्या इंग्रजी लिखाणाला दाद दिली, यासाठीच सारंगांचे कौतुक करायचे किंवा तिकडे इंग्रजीत कोणी तरी सारंगांना पाहून काफ्काची आठवण काढली म्हणून आपणही सारंग हे मराठी काफ्का असे काही तरी म्हणून सारंगांची काफ्काकोंडीच करायची किंवा मराठीतच लटके वागायचे तर, दूरदेशी दिलेल्या कन्येचे कौतुक काकणभर जास्तच असते, तसे कढ काढू कौतुकाचे.. पण नाही. ही सोय सारंगांनी ठेवलेली नाही. मराठीच्या माहेरी ते वारंवार येतच राहिले. असल्या सासर-माहेरच्या उपमा न वापरता लिहीत राहिले मराठीत आणि वर म्हणाले, मी लिहिता लेखक आहे. ‘लिहित्या लेखकाचं वाचन’, ‘सर्जनशोध आणि लिहिता लेखक’ ही सारंगांची पुस्तके. यापैकी एकात इतरांच्या तर दुसऱ्यात स्वत:च्या लिहितेपणाचा लेखाजोखा ते मांडतात. मोठय़ा आर्ट गॅलऱ्यांत चित्र ‘समजले नाही’ असे होऊच नये या दृष्टीने चित्राशेजारीच भिंतीवर जी नोंद लावलेली असते, तशी ही दोन पुस्तके म्हणजे सारंगांचे लिहितेपण- आणि त्यांचे लिखाण- समजण्यासाठीच्या भिंतनोंदी आहेत. इतर अनेक इंग्रजी लेखकांप्रमाणे ‘उत्तरवसाहतवादी’ असण्यात समाधान मानणारे सारंग नव्हेत आणि मराठीतील आधुनिक साहित्यजाणिवा ज्याला शरण गेलेल्या दिसतात त्या ‘वास्तववादा’शी सारंग फटकूनच राहतात या दोन्हीमागची त्यांची भूमिका या पुस्तकांतून कळते. ‘वास्तवदर्शी वर्णन’ म्हणजे अनुभवाचा खरेपणा की तपशील? असा प्रश्न उभा करून न थांबता ‘उपरा’सारख्या लिखाणाचा खरेपणा तपशील देण्यातूनही कसा जाणवतो, तसाच खरेपणा हेमिंग्वेच्याही तपशिलांत कसा आहे, अशा उदाहरणांतून उत्तरे शोधतात. कादंबरीपेक्षा कथेची भलामण करणारी, म्हणजे जगावेगळीच भूमिका सारंग निकराने मांडतात तेव्हा कादंबरीचा दबदबा त्यांना ठाऊक नसतो असे नव्हे, पण कथा अधिक सार्वकालिक आणि जागतिक आहे, तर कादंबरी फसण्याच्याच शक्यता अधिक असतात, हा त्यांचा मुद्दा असतो. पानोपानी एकांगी, एकारलेले भासणारे सारंग पुस्तक मिटले की- आणि त्यांनी लिहिलेले पुन्हा आपल्यापरीने आठवून पाहिले तर- सम्यक शक्यतार्थ शोधताहेत असे लक्षात येते. त्यांची भाषा खिल्ली उडवते, तुच्छतावादीच वाटावीशी नापसंती व्यक्त करते.. पण अखेर हा अक्षरांचा श्रम आपुलकीनेच सुरू आहे याची जाणीव करून देते. सारंग ज्या भूमिकांवर हल्ला चढवताहेत, त्या भूमिकांचाही अभ्यास करणे किंवा त्या माहीत करून घेणे हा गृहपाठ त्यांनी केलेला आहेच हे वाचकाला जाणवते. हे झाले, ज्याला मराठीत सहसा ‘ललितेतर’ म्हणतात अशा पुस्तकांबद्दल. ही पुस्तके वाङ्मयाच्या अनुषंगाने संस्कृतीची मीमांसा करणारी आहेत, पण वाचकाला स्व-संस्कृतीचा आरसा दाखवण्याचे सामथ्र्य त्यांच्या कादंबऱ्या आणि त्याहीपेक्षा कथांमध्ये आहे.
आजघडीला स्थिती अशी की, सारंगांच्या कथांचे हे सामथ्र्य वाचकांनी जाणलेले नाही. असे झाले याचे एक कारण असे की, सारंगांचे कथा-कादंबऱ्यांतून दिसणारे संस्कृतीचे रूप त्यांच्या वाचकाला पाहायचेच नव्हते आणि नाही. जी सांस्कृतिक घुसळण आजवर झाली, तिच्यातून आपणा प्रत्येकाची जी काही सांस्कृतिक सद्य:स्थिती आहे, तिचा धांडोळा आपण घेऊ इच्छितो का? नाही. घुसळणीतून आलेली सरमिसळ थेटपणे खोदून पाहणे आपण नाकारतो. त्याऐवजी संस्कृती म्हणजे काही तरी शुद्ध-साजूक तरी किंवा रसाळ-रांगडे तरी अशी खूणगाठ बांधणे आपल्या सोयीचे असते. संस्कृतीचे पावित्र्य म्हणजे हेच, असे न मानणाऱ्यांवर एक तर संस्कृतिद्रोहाचे ठपके ठेवले जातात किंवा हे ‘आपल्या’ संस्कृतीतले नाहीतच अशा समजातून त्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा त्यांच्याविरुद्ध दावेदारी होते. सारंग यांना या दुर्लक्ष आणि दावेदारीचा अनुभव भरपूर आला. उदाहरणार्थ ‘रूपांतर’ ही त्यांची कथा ही नावासकट काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’ची नक्कल असल्याचेच आजही लोक समजतील, इतका. काफ्काच्या कथेतल्या नायक-निवेदकाचे रूपांतर एका किडय़ात झालेले होते, तर सारंगाच्या कथेतला नायक-निवेदक लिंगरूप झाला आहे. सारंग आजच्या आणि कालच्याही लिंगजाणिवांबद्दल काही म्हणताहेत का, असा प्रश्नही न पडता सारंगांना मराठीतला काफ्का ठरवणारे अधिक होते आणि असतील. शिवपुराणातील मिथचा वापर मी केला, अशी कबुली सारंगांनी या टीकेच्या उत्तरात दिली, पण नाही. शोध घेणाऱ्या समीक्षेऐवजी शिक्के मारणारी समीक्षाच मराठीत बळावल्याने कुणी सारंगांना काफ्का ठरवले, तर कुणी माक्र्वेझच्या जादूई वास्तववादाचा शिक्का त्यांच्यावर मारला. माक्र्वेझच्या कथानकांना वास्तवाचा आधार असतो, तर सारंग हे वास्तव भासणाऱ्या तपशिलांनिशी केवळ सुरुवात करतात. हे साम्य नसून फरक आहे.. सारंगांना वास्तव केवळ सोय म्हणून बहुतेकदा हवे आहे आणि त्यांना सांगायचे आहे ते मिथके, कल्पनातीत कथाभाग यांमध्ये दडलेले आहे, असे मात्र कुणीच सांगत नाही. ते सारंगच सांगतात, त्याची चिकित्साही कुणी करत नाही.
परंपरा आणि नवता यांची तंत्रशुद्ध अंगाने सरमिसळ, हा सारंगांच्या लिखाणाचा गाभा आहे. दशावतारी राजाचा मुकुट सरकून ‘आदिदास’चा हेअरबँड दिसला तर कुणी हसू नये, अशी अपेक्षा असते. त्या अपेक्षेला गावठी ठरवणे चूक आहे, या धारणेत सारंगांची कथा रुजली आहे. देशीवादाला संकुचित आणि ‘अपरिवर्तनीय स्वत्वा’चे रोगलक्षण मानणाऱ्या सारंगांनी ‘देशी-विदेशी भोवऱ्या’तून केवळ मराठी नव्हे, भारतीय नवतेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नवतेचा हा नावाडी कोणती गाणी गात होता, हे ऐकण्याची सोय आजही त्यांच्या पुस्तकांत उरली आहेच.