भाषण कसे हवे? कंसात तलवार उपसून राणाभीमदेवी थाटातले? तसे वरच्या पट्टीत भांडल्यासारखे बोलल्याशिवाय कोणी भाषण केले असे आपणांस वाटतच नाही. पुन्हा त्या भाषणात जरा नाटकीपणा, थोरामोठय़ांवर झाडलेल्या शब्ददुगाण्या, झालेच तर कोणाच्या नकलाबिकला असतील तर मग काय, श्रवणानंदाची पर्वणीच ती! हे झाले प्रचाराच्या वगैरे भाषणांबाबत. पण आपण जरा उच्च अभिरुचीचे, अभिजन वर्गातील वगैरे असू, तर मात्र आपणांस वक्तृत्व कसे उपमा-उत्प्रेक्षादी अलंकारांनी विनटलेले लालित्यपूर्ण हवे असते. पंतप्रधान मनमोहन सिंग हे काही अशी भाषणे करणाऱ्यांतले नाहीत. मुळात ते बोलणाऱ्यांतलेही नाहीत आणि काही जण म्हणतात, ते करणाऱ्यांतलेही नाहीत, पण तो भाग वेगळा. या वर्षीच्या त्यांच्या भाषणाबद्दल मात्र अनेकांच्या मनात उत्सुकता होती. त्याला कारण भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी हे होते. जत्रा-यात्रांच्या निमित्ताने पूर्वी कुठे कुठे कव्वालीचे, तमाशाचे वगैरे मुकाबले होत असत. त्याचप्रमाणे मोदी यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदी विरुद्ध सिंग असा भाषणाचा ‘सुपरहिट मुकाबला’ होणार असल्याचे जाहीर केले होते. यंदा एक भाषण भुजमध्ये होईल आणि दुसरे लाल किल्ल्यावरून. तेथे आणि येथे काय बोलले जाते याकडे लोकांचे लक्ष असेल, असे सांगून मोदी यांनी आपल्या भाषणाची तर जोरदार प्रसिद्धी केलीच, पण मनमोहन सिंग यांचे भाषण ऐकण्यासही लोकांना प्रवृत्त केले. एरवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रास उद्देशून केले जाणारे भाषण हा समस्त राष्ट्राच्या दृष्टीने एक उपचारच असतो. कारण त्यात रंजनमूल्य नसते. वस्तुत: अशी भाषणे खूप अर्थपूर्ण असतात. त्यातून सरकारची धोरणे अधोरेखित होत असतात. योजनांचे दिशादिग्दर्शन होत असते. स्वाभाविकच ती गंभीर असतात. त्यातही ते भाषण करणारे पं. नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, कविमनाचे विश्वनाथ प्रतापसिंह वा सरस्वती ज्यांच्या जिभेवर वास करते असे अटलबिहारी वाजपेयी असतील, तर त्यांतही जान येते. मनमोहन सिंग यांचे भाषण म्हणजे त्या अर्थाने प्रदीर्घ जांभईआख्यानच. तेव्हा ते ‘रंगले की नाही, याहून पंतप्रधान काय बोलले हे महत्त्वाचे ठरते. त्याची चिकित्सा अर्थातच व्हायला हवी. ती होईलही. मुद्दा फक्त ती कोणत्या व्यासपीठावरून व्हावी, हाच आहे. मोदी यांचे त्याबाबतीत भान सुटले. राष्ट्र आपले आणि सिंग यांची भाषणकुस्ती पाहण्यासाठीच आतुर आहे, असा बहुधा त्यांच्या माध्यम व्यवस्थापकांनी त्यांचा समज करून दिला असावा. कारण ते बोलले त्याच पद्धतीने. त्यांनी टीका केली याबद्दल कोणाचे काही म्हणणे असण्याचे कारण नाही. तो त्यांचा घटनादत्त हक्कच आहे. पण असे हक्क बजावतानाही लोकनेत्यांनी औचित्याचे भान ठेवायचे असते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्याबद्दल मोदी यांना चार शब्द सुनावले, शिवसेनेनेही अडवाणी यांचीच री ओढली, ते बरेच झाले. त्यातील कुरघोडीच्या राजकारणाचा भाग बाजूला ठेवला तरी अडवाणी जे बोलले ते रास्तच होते. आपण पक्षाचे प्रचारप्रमुख आहोत, याचा अर्थ उठता-बसता प्रचारी आणि कंठाळी भाषणे केलीच पाहिजेत असे नसते. शब्दांची शस्त्रे प्रसंग पाहूनच वापरायची असतात, हे मोदी जेवढय़ा लवकर समजून घेतील, तेवढे ते त्यांच्या फायद्याचेच ठरेल.