09 December 2019

News Flash

२०. दहीभाताची गोडी

हृदयेंद्रच्या ओघवत्या बोलण्यात खंड पडला तेव्हा नि:शब्द शांतता पसरली. कुणालाच हस्तक्षेप करावासा वाटला नाही. तेवढय़ा अल्पविरामाच्या क्षणांत कर्मेद्र कॉफी भरलेले चार पेले घेऊन आला.

| January 29, 2015 01:01 am

हृदयेंद्रच्या ओघवत्या बोलण्यात खंड पडला तेव्हा नि:शब्द शांतता पसरली. कुणालाच हस्तक्षेप करावासा वाटला नाही. तेवढय़ा अल्पविरामाच्या क्षणांत कर्मेद्र कॉफी भरलेले चार पेले घेऊन आला. गरम घोट घेत हृदयेंद्र बोलू लागला..
हृदयेंद्र – वासना तृप्त झाल्या नाहीत.. कितीही सेवन करूनही तृप्ती होत नसेल आणि त्या ओढीनं आणखी-आणखी खाल्लं गेलं तर अपचन होणारच ना! म्हणून पंक्तीत बसलो आहोत, पंचपक्वान्नांचा लाभही होत आहे, पण किती खावं याची मर्यादा आपणच ठरवली पाहिजे. जन्मापासून जीव दिवसागणिक मृत्यूकडेच तर जात आहे! मृत्यूच्या पंक्तीत बसलेल्या जिवाला पंचपक्वान्नांचा म्हणजे पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांच्या क्षमतांचा लाभ झाला आहे. पण तरी जर तृप्ती नसेल तर अतृप्ती आणि मग अपचन ठरलेलंच! त्यासाठी आटोपशीर खाऊन तृप्त झाल्यावर पंक्तीत माणूस काय म्हणतो? आता फक्त दहीभात द्या, झालं! तर हा तृप्तीचं, पुरेपणाचं प्रतीक असलेला दहीभात खायला माउली सांगत आहेत!
कर्मेद्र – मी एक विचारू का?
ज्ञानेंद्र – (हसत) कर्मू, ज्ञान ग्रहण करण्याची हीच रीत आहे! तू ज्या विनयानं प्रश्न करत आहेस ना, त्याच विनयानं केलेल्या प्रश्नातून उपनिषदं जन्मली आहेत..
कर्मेद्र – आता घ्या! ताडकन विचारलं तरी टोमणे, नीट विचारलं तरी टोमणे..
योगेंद्र – अरे विचार विचार.. तू इतक्या शांतपणानं काही विचारतोयंस हेच नवीन आहे..
कर्मेद्र – पहा मी तुमच्यासारखा ज्ञानीबिनी नाही तरी मीदेखील आध्यात्मिक पुस्तकं वाचतो, आपण जमतो तेव्हा तुमच्या चर्चा ऐकतो.. वाचताना कधी कधी फार छान वाटतं.. हृदू तू दिलेलं ‘प्रवचने’ असेल किंवा ज्ञान्या तू दिलेलं जे. कृष्णमूर्ती, विमला ठकार असेल.. छान वाटतं वाचताना.. पण पुस्तक बंद करून जगायला ज्या क्षणी सुरुवात होते त्याक्षणी सारं ओम फस्स होतं. पुस्तकातलं जग आणि आपण जगतो ते जग वेगळंच आहे, असं वाटतं.. माझे प्रश्न कृष्णमूर्ती सोडवणार नाहीत, ते मलाच सोडवावे लागतात आणि सहृदयता, अनुकंपा, करुणा, सहवेदना यांचा तर त्यात काडीचा उपयोग होत नाही.. चार शिव्या घालूनच काम करून घ्यावी लागतात आणि ज्याला थपडेची भाषाच कळते त्याला थप्पडच मारावी लागते.. या अध्यात्माला एका मानसिक आत्मभ्रमापलीकडे काही अर्थ नाही.. ‘राम कर्ता’ मानून सर्व रामावर सोडलं ना तर हे जग मला वेळेआधीच ‘राम’ म्हणायला लावेल आणि जे घडत आहे त्याचं अलिप्तपणे, तटस्थपणे अवलोकन करत बसलो ना तर हे जग माझं सारं काही बळकावून भिकेला लावेल, याचंही तटस्थ अवलोकन करण्याची पाळी येईल..
ज्ञानेंद्र – ओहो!
योगेंद्र – व्वा.. कुठून आणि कसे मिळवलेस एवढे शब्द?
कर्मेद्र – (योगेंद्रच्या पाठीत गुद्दा घालत) बाबांनो मी जर बोलायला लागलो ना, तर दुनिया माझं अध्यात्म डोक्यावर घेईल.. तुम्ही मूळ मुद्दा टाळू नका.. खूप ऐकलं, खूप वाचलं पण त्या ऐकीव माहितीच्या ‘दहीभाता’ला तृप्ती मानून जगण्याची गोष्ट मला तरी फसवी वाटते..
हृदयेंद्र – अंत:करणरूपी कावळा याच प्रश्नावर अडणार याची माउलींनाही खात्री आहे बरं! या प्रश्नानं त्याच्या हृदयात कालवाकालव होणार मग हृदयपद्मात असलेल्या चौथ्या अनाहत चक्रात तो कसा झेपावणार? डॉक्टरसाहेब म्हणतात त्याप्रमाणे तिथे पल्सचं नियंत्रण आहे.. अर्थात प्राणांच्या गतीचंच नियंत्रण आहे, नाही का? मग प्राणांची गती तात्पुरती आटोक्यात आली, पण पुन्हा प्राण जगासाठीच तळमळू लागले तर काय उपयोग? अंत:करणरूपी कावळाही तिसऱ्या चक्रानंतरच्या आणि चौथ्या चक्राआधीच्या उंबरठय़ावरच अडखळतोय! ‘जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी’, हा त्याचा पवित्रा आहे!! जग मिथ्या आहे, आत्मसाक्षात्कार हाच जीवनाचा खरा हेतू आहे, सद्गुरूंनाच त्यासाठी शरण गेलं पाहिजे, वगैरे खूपदा ऐकलं, वाचलं, पण त्याच्या अनुभवाची गोडी काही मिळालेली नाही. अंत:करणरूपी कावळा म्हणतोय, परम तत्त्वाची ती गोडी खरी आहे, याचा अनुभव वेगानं कसा येईल, ते आधी सांग! बाबा रे तृप्तीचा दहीभात खाईन, पण त्याआधी त्याची गोडी सांग!!
चैतन्य प्रेम

First Published on January 29, 2015 1:01 am

Web Title: spiritual life
Just Now!
X