व्यवहाराचे काटेकोर नियम अगदी बारीकसारीक गोष्टींतही स्वामी स्वरूपानंद कसे पाळीत, याची ही काहीशी गमतीशीर घटना श्रीकांत ऊर्फ बाबूराव देसाई यांनी सांगितली आहे. ते लिहितात : त्या वेळी स्वरूपाश्रमाची वास्तू नव्हती. आमचे काका तात्यासाहेब देसाई यांच्या घरातील खोल्या व हॉलमध्ये आश्रम व्यवस्था सुरू केली होती. त्याला दोन स्नानगृहे बाहेरच्या बाजूस होत्या. जवळच विहीर, डोणी (पाणी साठवण्याचा छोटासा दगडी हौद) आणि आश्रमाच्या वापरातल्या दोन-तीन बादल्या तिथेच असत. तिथे जवळच फुलझाडे लावली होती आणि ती फुलांची जागा आश्रमास दिलेली नव्हती, तर आमची खासगी जागा होती. तिथल्या झाडांना थोडं पाणी घालण्यासाठी म्हणून मी तिथेच असलेली एक बादली घेतली आणि डोणीतून पाणी आणून फुलझाडांना टाकले. हे सगळं काम अप्पांच्या (स्वामींच्या) खोलीपासून दूर आणि बाहेर चाललेलं! पण त्यानंतर मला लगेच अप्पांनी बोलावून घेतलं. त्यांच्या अंतज्र्ञानानं त्यांनी जाणलं होतं. मला म्हणाले, ‘‘हे बघ, आपली बादली त्यांनी घेतली तर चालेल, पण त्यांची आपण घेता कामा नये.’’ त्यावर मी विचारात पडलो. आता त्यांची म्हणजे कुणाची? तर आश्रमाचीच आणि आश्रम तर अप्पांच्या सेवेसाठीच निर्माण झालेल्या सेवा मंडळाचा! पण अप्पांचं धोरण असं की, विश्वस्त संस्थेचा आश्रम व त्यातील वस्तू या आपण खासगी कामासाठी वापरायच्या नसतात. उलट अशा संस्थेला आपण काही वस्तू समर्पित करायच्या असतात. केवढा हा काटेकोरपणा! अगदी बालवयापासून अप्पांचं असं मार्गदर्शन लाभलं. (अनंत आठवणीतले अनंत निवास, पृ. ८५). याच आठवणींत बाबूरावांनी असंही नमूद केलं आहे की, सेवा मंडळ स्वामींची जी पुस्तकं प्रकाशित करीत असे ती विकत घेऊनच नंतर स्वामी कुणाला भेट द्यायची तर देत असत! एकदा बेळगावचे जिल्हाधिकारी स्वामींच्या दर्शनाला आले. त्यांच्या वावरण्यात ताठा होता. त्यांनी फळांची करंडी, मिठाई आणि ५१ रुपयांची दक्षिणा स्वामींना समर्पित केली. स्वामींनी मिठाईचा बारीक कण खाल्ला आणि उरलेलं परत केलं. त्यांनी दक्षिणेचा आग्रह केला तेव्हा फक्त एक रुपया उचलून घेतला. मग जेवण झाल्यावर ते झोपाळ्यावर बसले तेव्हा त्यांनी स्वामींची पुस्तकं पाहिली. सगळी पुस्तकं त्यांनी मागितली. त्यांची किंमत झाली ३७ रुपये. ती देता-देता ते म्हणाले, ‘‘हे पहा, मी आहे जिल्हाधिकारी. ही सगळी पुस्तकं काही मी वाचणार नाही, पण मी जे दिलं ते त्यांनी सर्वच परत केलं. बरं, मी इथं जेवलोदेखील. मग तुम्हाला खर्च येतच असेल ना? म्हणून ही पुस्तकं घेतली. तेवढीच तुम्हाला मदत. एरवी हा खर्च चालणार कसा?’’ बाबूराव तेव्हा तरुण वयातले होते. ते एकदम उसळून म्हणाले, ‘‘हे पहा साहेब, तुम्ही पुस्तकांचे पैसे एक वेळ देऊ नका, पण तुम्ही पुस्तकं वाचलीत तरी आम्हाला पैसे मिळाल्यासारखेच आहे. तुम्ही ती वाचावी म्हणून देतो आहे.’’ आता हे जे घडलं ते व्यवहाराच्या विरुद्ध आणि दुसऱ्याचं मन दुखावणारं, असं वाटेल, पण स्वामींची यावर प्रतिक्रिया काय होती?