‘हंडीतापा’च्या बाधेमुळे समाजमनाच्या विचारशक्तीचे होणारे खच्चीकरण आणि त्याचे समाजातील भावी पिढीच्या निकोप धारणेवर होणारे दुष्परिणाम यांची जाणीव ‘लोकसत्ता’च्या विविध वृत्तांतांतून (३० ऑगस्ट) करून देण्याचे धाडस दाखविल्याबद्दल अभिनंदन.
 इमारतीच्या चौथ्या-पाचव्या मजल्यावरून एखादी व्यक्ती आणि त्यातही कोवळे बालक वेडेवाकडे खाली पडताना पाहणे यात रोमहर्षकता आहे, असे वाटणाऱ्यांची गणना एरवी विकृतांतच केली जायला हवी. पण दहीकाल्याच्या दिवशी मुंबई आणि परिसरात हजारो आबालवृद्ध दिवसभर या खेळात रमलेले दिसतात. एकेकाळी िहस्र वाघ-सिंहांबरोबर गुलामांना झुंजविणे हा ‘साहसा’चा खेळ मानला जायचा. त्याच बौद्धिक आणि भावनिक अमानुषतेकडे समाजाला नेले जात आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे; कारण या ‘साहसी खेळा’त बाजारशक्तीच्या क्षमता शोधणाऱ्यांनी, कायदे करणाऱ्यांना आणि प्रसिद्धीमाध्यमांनाही त्यात सामील करून घेतले आहे!
 दहीहंडय़ा मानवी मनोरे रचून फोडणे यात कौशल्य आणि साहस हे दोन्ही असेलही, पण एका मर्यादेपर्यंतच. मानवी जिवाच्या मोलाचे भान जपत, त्याचा आदर स्वत: करत आणि समाजमनावर बाणवत, या कौशल्याचे आणि साहसाचे प्रदर्शन झाले, तरच ते आनंददायी आणि प्रेरकही मानता येईल. हंडी फोडण्यासाठी उभारलेला मनोरा कोसळल्यास गंभीर इजा होण्याचा धोका किमान राहील, इतपत दहीहंडय़ांची उंची ठेवली गेली आणि एखादी दुर्घटना घडली, तर तो ‘अपघात’ मानणे शक्य  आहे. मात्र आज कोण किती उंचीवर दहीहंडी बांधतो, याची स्पर्धा सुरू झाली आहे. अन्य मनोऱ्यांप्रमाणेच मानवी मनोरे किती उंचीपर्यंत स्थिर राहू शकतात, याचेही शास्त्र असणार. मनोऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा विस्तार अधिक तेवढे स्थर्य त्याला येणार. नऊ-दहा थरांच्या मनोऱ्यांसाठी एवढय़ा संख्येने प्रशिक्षित गोिवदा मंडळांना मिळूही शकणार नाहीत. म्हणजेच एवढय़ा थरांच्या मनोऱ्याची अपेक्षा करणे ही साहस आणि कौशल्याची परीक्षा नाही, तर केवळ नशिबावर विसंबत अनेकांचा जीव जाणूनबुजून धोक्यात घालणे आहे.
 यातील सर्वात धक्कादायक बेपर्वाई ही मुलांच्या बाबतीतील आहे. वरच्या थरांवर वजनाने हलके म्हणून अल्पवयीन मुलांना वापरले जाते. उंच मनोऱ्यांत वरच्या दोन थरांवर कोवळी मुले वापरली जाताना दिसतात. किंबहुना वरच्या थरांवर मुलांचा वापर ही ‘यशा’ची आणि कदाचित ‘थ्रिल’चीही पूर्वअटच आहे! याचा दुसरा अर्थ, प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा जीव येथे जाणीवपूर्वक पणाला लावला जातो. यापकी बहुतेक दुर्घटनांत जीव वाचला तरी मणक्याला गंभीर स्वरूपाच्या इजा होतात. त्यामुळे आयुष्यभराची विकलांगता येते.
 तेव्हा ‘इव्हेंटखोर’ जे ‘साहस’ म्हणून खपवतात, तो चार-पाच थरांपलीकडील हंडय़ांच्या बाबतीत ‘वेडाचार’ ठरतो. हा वेडाचार विवेक कायम असलेला कोणताही माणूस स्वयंप्रेरणेने करणार नाही. किमान यासाठी आपल्या अल्पवयीन मुलांना तर अजिबात भरीला घालणार नाही. तरीही मुंबईत तो वाढत आहे; कारण त्याला या वेडाचाराला प्रवृत्त केले जात आहे.
  ते करण्यात सर्वात मोठा वाटा आहे, तो सवंगतेला राजकारण मानणाऱ्या अल्पकुवतीच्या पुढाऱ्यांचा. त्यांच्या दिमतीला धर्माचे दांभिक ठेकेदार आहेत. प्रायोजक आहेत. लाखांची बक्षिसे जाहीर केली जातात. त्यांची संबंधित पुढाऱ्यांच्या नावे भरपूर प्रसिद्धी केली जाते. माध्यमांच्या सहभागाने वेडाचाराचा ‘इव्हेंट’ बनवला जातो. अशा अनेक इव्हेंट्सच्या गाजावाजामुळे समाजातही सेलिब्रेशनचा सामूहिक उन्माद पद्धतशीरपणे निर्माण केला जातो. आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांच्या जिवाचा सट्टा लावणाऱ्या २१, ५१ लाखांच्या हंडय़ांकडे सर्व फोकस वळवला जातो. म्हणजेच या वेडाचाराला प्रवृत्त करण्यासाठी पशाचे, प्रसिद्धीचे आमिष आणि धर्मकृत्य केल्याचे खोटे समाधान, या हत्यारांचा वापर केला जातो. उंच हंडय़ा फोडण्यासाठी एकेक मंडळ अनेकदा प्रयत्न करते. असा प्रत्येक अपयशी प्रयत्न म्हणजे कोणाचा तरी जीव वारंवार धोक्यात पडणेच असते. पण समाजातही असाच सामूहिक भ्रम निर्माण केला जात असल्यामुळे, त्याची जाणीव बघ्यांनाही होत नाही.
 याचा अर्थ हा की, या वर्षी जे चारशेच्या घरात गोिवदा जखमी झाले, ते स्वेच्छेने केलेल्या साहसाचे नव्हे, तर हंडीआयोजकांनी दाखविलेल्या आमिषाचे आणि इव्हेंटखोरांनी निर्माण केलेल्या भ्रामक मायाजालाचे बळी आहेत. यातील जखमी बालकांच्या बाबतीत तर गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईची शक्यता आजमावून पाहता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. कारण बालकांमध्ये त्यांच्या जिवाच्या धोक्याचे मूल्यमापन करून निर्णय घेण्याची क्षमता नाही, हे गृहीत धरले पाहिजे.
 बलांच्या शर्यतीवर वा नागपंचमीला नागाला दूध पाजण्यावर बंदीचा पुरस्कार केला जातो, कोर्टाकडूनही अनुकूल भूमिका घेतली जाते, पण दहीहंडय़ांच्या उत्तुंग मनोऱ्यांतील किमान बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम करण्यास राज्यकर्त्यांना का भाग पाडले जात नाही? करदात्याच्या पशातून विम्याची तरतूद करून, उंच मनोऱ्यांच्या जीवघेण्या शर्यतीला प्रोत्साहन देण्याचाच साळसूदपणा मुंबई महापालिका दाखवते आहे, हे लक्षात का घेतले जात नाही? गोिवदांसाठी विम्याची तरतूद करणे गरजेचे आहेच, पण त्यासाठी थरांच्या संख्येचे बंधन असले पाहिजे. तसेच विम्याची तरतूद करण्याचे बंधन हे नऊ आणि दहा थरांसाठी लक्षावधींची आमिषे दाखवणाऱ्या आयोजकांवर टाकले पाहिजे.

नेत्यांनी बोलण्यापूर्वी वास्तवाचा विचार करावा
भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी बलात्कार करणाऱ्या एक-दोघा आरोपींना फासावर लटकवा, अशी मागणी संसदेत करून संताप व्यक्त केला. रामदास आठवले यांनीही शक्ती मिल प्रकरणातील सर्व बलात्काऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी केली आहे तर एका काँग्रेस नेत्याने त्यांचीच री ओढली आहे. सर्वानाच त्या दुर्घटनेचा संताप आला आहे; पण तो व्यक्त करताना राष्ट्रीय नेत्यांनी वास्तवाचाही विचार करावा.
दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ची दुर्घटना झाल्यानंतर बलात्काराबाबतच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली, त्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेपेची आहे. या पाश्र्वभूमीवर या नव्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याचे अधिकार न्यायाधीशांना नाही. त्यासाठी नवीन दुरुस्ती विधेयक सुषमा स्वराज यांनी मंजूर करवून घ्यावे.
दुसरी बाब अशी की, वेगवेगळय़ा गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा झालेले आणि राष्ट्रपतींनी दयेचे अर्ज फेटाळलेले २५ वा अधिक कैदी देशभरच्या तुरुंगांत खितपत पडले आहेत. त्यांच्या जिवाला मुक्ती देण्याचा मुहूर्त सरकारला केव्हा मिळणार आहे? हा प्रश्न खासदारांनी कधी धसाला लावल्याचे वाचनात वा ऐकिवात नाही. समजा या गाजत असलेल्या प्रकरणातील बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा झाली, तरी फाशीवर जाणाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीची संख्या पाचने वाढेल, एवढेच. नेते तेवढय़ावर समाधान मानणार का?
सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले (पूर्व)

दहीकाला आणि निळे झेंडे
धर्म ही संकल्पना आता आवाक्याच्या बाहेर गेली आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी त्याचे प्रत्यंतर अनेकांना रस्त्यारस्त्यांवर आले असेलच, परंतु या वर्षीच्या दहीकाल्याचे वैशिष्टय़ म्हणजे भगव्याच्या जोडीने फडकलेले निळे झेंडे! अनेक ठिकाणी तर युतीमध्ये सामील झालेल्या आरपीआयच्या गटानेच दहीहंडय़ांचे आयोजन केले होते. धार्मिक सामंजस्य वगैरे ठीक आहे, परंतु तात्कालिक राजकीय लाभासाठी (एक-दोन आमदारक्या, एखाददुसरी खासदारकी) वैचारिक हाराकिरी कशी होते, याचे हे बोलके उदाहरण आहे. आंबेडकरी विचार वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हे ‘सामंजस्या’चे राजकारण कितपत हितावह आहे? एकीकडे धर्म या संकल्पनेचे डॉ. आंबेडकर परखड विश्लेषण करतात आणि नव्या रक्तहीन धार्मिक- सामाजिक व आर्थिक बदलाचे मार्ग सांगतात.. त्यांच्या नावाचा जयघोष करीत, तथाकथित राजकीय लाभाच्या चतकोरासाठी हपापलेले जयभीमवाले त्यांचेच विचार पायदळी तुडवत आहेत.  
काशिनाथ तांबे, कुर्ला

‘बीं’चा विसर..
‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ सारखे उत्कृष्ट काव्य लिहिणारे कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी ‘बी’ यांची पुण्यतिथी ३० ऑगस्ट रोजी होती, याचा विसर सर्वानाच पडावा याचे आश्चर्य वाटते. (‘आजचे महाराष्ट्रसारस्वत’चा अपवाद). कवी ‘बी’ हे गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), केशवसुत (केशव कृष्णाजी दामले), रेव्हरंड नारायण वामन टिळक, ‘राजकवी’ भा. रा. तांबे आदी कवींचे समकालीन होते. आजच नव्हे, यापूर्वीही अ. भा. मराठी साहित्य संमेलनांत कुठे त्यांच्या नावाचे प्रवेशद्वारही लागू नये, हे मराठी साहित्यक्षेत्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.
अमेय गुप्ते, दादर