नोबेल पुरस्काराने नेहमीप्रमाणे अनेकांचे अंदाज चुकवत एरवी फारशा लोकप्रिय नसणाऱ्या कॅनडिअन कथाकार अ‍ॅलिस मन्रो यांना मानकरी ठरवले.  
मन्रो यांच्या कथा मानवी नातेसंबंधांकडे, विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्या तरी त्या काही हारुकी मुराकामीसारख्या जगभर लोकप्रिय असलेल्या लेखिका नव्हेत. याचा अर्थ असाही नव्हे की, मन्रो या चांगल्या लेखिका नाहीत. नोबेल मिळणारा कुठलाही लेखक हा चांगला असतोच. कॅनडिअन समीक्षक मन्रो यांचा उल्लेख ‘अवर चेकॉव्ह’ असा करते. अशी तुलना वा अशी विशेषणे ही प्रतीकात्मक असतात. त्यामुळे त्याकडे त्या दृष्टीनेच पाहायचे असते. चेकॉव्ह थोरच  होता. तो मानवी संबंधांचा खूप व्यापकपणे आणि सूक्ष्मात जाऊन वेध घेतो. मन्रो यांच्या कथालेखनात त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न दिसतो. म्हणून त्यांना एका मर्यादित अर्थाने ‘अवर चेकॉव्ह’  म्हणणे सयुक्तिक ठरू शकते.
१९०१ साली सुरू झालेल्या नोबेल पुरस्कारामध्ये आतापर्यंत फक्त बारा लेखिकांचा समावेश आहे. मन्रो या १३ व्या कथालेखिकेला हा सन्मान मिळाला आहे. तर त्या हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या कॅनडिअन लेखिका आहेत.
मन्रो १९६० पासून कथालेखन करत असून आतापर्यंत त्यांचे बाराहून अधिक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. पण त्यांना स्वत:चा पीआर फार चांगला करता येत नसावा.
या पुरस्कारामुळे आता मन्रो यांच्या साहित्याकडे जगाचे लक्ष वेधले जाईल. त्यांच्या कथासंग्रहांची पुन्हा नव्याने समीक्षा केली जाईल. त्यांची पुस्तके मिळवून वाचली जातील आणि एकंदर कॅनडिअन साहित्यावरही रसिक वाचकांची मेहेरनजर होईल.
अमेरिकन साहित्यिक हे फार खोली आणि लांबी-रुंदी नसलेले असतात. कारण अमेरिकन जीवनशैलीच जगण्याशी खोलवर भिडत नाही, असे मानले जाते. त्यामुळे काही सन्माननीय अपवाद वगळता अमेरिकन साहित्याविषयी उर्वरित जगाचा दृष्टिकोन हा फार औत्सुक्यपूर्ण नसतो. तो काही प्रमाणात निश्चितच खराही आहे. पण तरीही चांगलं साहित्य हे चांगलंच असतं. त्यामुळे त्याची दखल घ्यायलाच हवी.