‘वृक्षारोपणाची चळवळ’ हा शब्द जेव्हा प्रचारात नव्हता, तेव्हा असे प्रयोग करणारे आणि शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत अनेक व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्याचाच व्यवसाय करणारे वि. वि. देशपांडे हे अखेपर्यंत निर्मळ राहिले.  उद्योजक आणि राजकारणी यांच्या इतके जवळ राहूनही ‘सद्गृहस्थ’पणा त्यांनी सोडला नाही. त्यांच्या सुहृदाने जागवलेल्या आठवणी..

मराठी विज्ञान परिषदेचे माजी विश्वस्त, माजी उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सच्या निर्यात समितीचे अध्यक्ष विश्वनाथ विनायक ऊर्फ वि. वि. देशपांडे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी रविवारी पहाटे अडीच वाजता माहीमच्या रहेजा रुग्णालयात निधन झाले. गेले महिनाभर ते आजारी होते, दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या आणि रुग्णालयात जाऊन-येऊनच होते.
मूळचे सांगलीचे असणारे वि. वि. देशपांडे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आले आणि त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर कायद्यातील एलएल.एम. केले. एलएल.एम.च्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या एका खास वसतिगृहात ते तेव्हा ऑपेरा हाऊसजवळ राहत असत. १९६५ च्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बाबा आमटे यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती, त्या वेळी महिनाभर रोज संध्याकाळी वि. वि. देशपांडे रुग्णालयात जाऊन त्यांच्याशी काव्यशास्त्रविनोद करीत असत. दुहेरी द्विपदवीधर झाल्यावर वि. वि. देशपांडे मंत्रालयातील मत्स्य विभागात काम करू लागले. पी. एन. डमरी तेव्हा त्यांच्या खात्याचे सचिव होते. ते टाकाला जाड निबलावून कशी सही करायचे हे वि. वि. सांगत असत. १९६६च्या सुमारास रीगल सिनेमाजवळ ऑफिसची जागा असणारे एक गृहस्थ परदेशी जात असताना त्यांनी ती जागा वि. वि. देशपांडे यांना देऊ केली. तोवर ते विवाहित झाले होते. वि. वि. देशपांडे यांच्या पत्नी महाविद्यालयात प्राध्यापकी करीत असल्याने त्यांनी त्यांच्या संमतीने आपली मंत्रालयातील नोकरी सोडून देऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
हा व्यवसाय होता सल्ला देण्याचा. ज्या कोणाला छोटा-मोठा उद्योग सुरू करायचा होता, त्यांना परवानग्या मिळवून दे, बँकांकडून कर्ज मिळवून दे, एखाद्या उत्पादनाबद्दल माहिती मिळवून दे, माल कसा विकायचा त्याची माहिती दे, करविषयक सल्ला दे, अशी नानाविध प्रकारची सल्लामसलत ते करीत. रीगल सिनेमाजवळील तुलक रस्त्यावरील नॅशनल बििल्डगमधील हे कार्यालय जेमतेम ४० ते ५० चौरस फुटांचे होते, पण तेथून वि. वि. देशपांडे यांनी ३५ वष्रे व्यवसाय केला. अखेर ती इमारत २००० सालाच्या सुमारास पडली तेव्हा तेथून त्यांनी आपले कार्यालय घाटकोपरच्या आपल्या घरी स्थलांतरित केले.
या दरम्यान खांडसरी साखरेच्या उत्पादकांना नाना प्रश्न होते. त्यासाठी त्यांनी त्यात लक्ष घातले. त्यांना लक्षात आले की, खांडसरी साखर उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे काही कायदे आड येत होते. हे पाहून मग ते खांडसरी उद्योगाचे एक शिष्टमंडळ घेऊन १९७०च्या सुमारास पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घरी गेले व त्यांना हा प्रश्न समजावून दिला. त्यांच्या घराबाहेर एका झाडाखाली झालेल्या एका सभेचा फोटो त्यांच्या घरी अजूनही भिंतीची शोभा वाढवतो आहे. त्यात ते भाषण करीत असून इंदिराबाई बाजूला उभ्या आहेत असे दिसते.
त्यानंतर पाच-सात वर्षांनी ते काही कामानिमित्त मनिला येथे गेले होते. परत येताना परदेशी वस्तू घेऊन यायची तेव्हा एक क्रेझ होती, पण वि. वि. देशपांडे त्याला बळी न पडता, तेथून एका अतिजलद वाढणाऱ्या लुकेना झाडाच्या बिया घेऊन आले. मग त्या बिया ते दिसेल तेथे लावत गेले. त्यांनी सांगली ते कोल्हापूर वाटेवरही ही झाडे लावली, रेल्वेच्या कडेकडेने लावली. चेम्बूर-घाटकोपरला लावली आणि ती सर्व मला रिक्षात बसवून दाखवत असत. मी एकदा त्यांच्याबरोबर सांगलीला गेलो असता, तेथून आम्ही रिक्षा करून कोल्हापूरला गेलो व वाटेत ते रिक्षा थांबवत थांबवत मला ती झाडे दाखवीत होते. या झाडाच्या बियाही ते दिल्लीला घेऊन गेले आणि पंतप्रधान इंदिरा गांधींना देऊन आले. इंदिराबाई जलदगतीने वाढणाऱ्या या झाडामुळे एवढय़ा प्रभावित झाल्या की पुढच्या वेळी त्या राजस्थानला गेल्या, तेव्हा त्या बिया घेऊन गेल्या आणि तेथील तत्कालीन मुख्यमंत्री मोहनलाल सुखाडिया यांना त्या बिया देऊन आल्या..  ही झाडे लावा म्हणजे राजस्थान हिरवागार होईल, असे त्यांना म्हणाल्या. वि. वि. देशपांडे यांनी लुकेनावर लिहिलेले पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. बारिलगे अध्यक्ष असताना छापले गेले व त्याच्या एक लाख प्रती छापून ते त्या वेळी विकले गेले होते. वि. वि. देशपांडे यांचे हे असे अचाट उपक्रम होते.
डोक्यावर पांढऱ्या केसाचा क्रॉप, खादीचा पांढरा शर्ट, पांढरा कोट, पांढरा टाय, पांढरी पँट, पांढरे मोजे, पण बूट मात्र काळे, अशा वेशातले वि. वि. देशपांडे कोणत्याही समुदायात उठून दिसायचे. त्यांना उंचीही सहा फुटांची लाभली होती. हे कपडे ते रोज स्वत:च्या हाताने अंघोळीबरोबर घरी धुवायचे. ते मराठी विज्ञान परिषदेच्या संमेलनांना बाहेरगावी यायचे, आमच्याबरोबर एखाद्या वर्गात सार्वजनिकरीत्या राहायचे. पहाटे चारलाच उठून आपले सर्व आवरायचे आणि आम्ही सहा वाजता उठायचो, तर वि. वि. देशपांडे आपला पांढरा सूट घालून तयार झालेले दिसायचे. म्हणजे रात्री आम्ही झोपायच्या वेळी ते पांढऱ्या सुटात दिसायचे, पहाटे उठल्यावरही ते परत पांढऱ्या सुटात दिसायचे. हे झोपले कधी समजायचे नाही. मात्र घरी ते नेहमी धोतर नेसत.
नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांबद्दल त्यांना विलक्षण आपुलकी होती व त्यांना माहिती देण्यासाठी ते महाराष्ट्रभर भाषणे देत फिरायचे. एकेक भाषण चार चार ताससुद्धा ते देत. अशाच एका ऊर्मीतून त्यांनी ‘सíव्हस फॉर कम्युनिकेटर्स हे मासिक सुरू करून तब्बल २५ वष्रे एकहाती चालविले.
त्यांना शेक्सपिअरबद्दल प्रेम होते. त्याच्या वाङ्मयावर त्यांनी आठ-दहा भाषणे दिली होती. मनाने अत्यंत शांत असलेले वि. वि. देशपांडे कोणालाही तत्परतेने मदत करायला तयार असायचे. तोंडात कधीही वावगा शब्द आलेला मी ऐकला नाही. १९७५ ते ९५ अशी वीस वष्रे त्यांनी डॉज कंपनीच्या किंग्ज मॉडेलची एक भली मोठी गाडी एका पारशाकडून विकत घेतली होती. ती ते स्वत: चालवत. पारशी काय काळजी घेईल अशी ते तिची देखभाल करीत. लोक गाडीत बसल्यावर दरवाजा दाणकन आपटतात, ते त्यांनी करू नये म्हणून ते दरवाजापाशी उभे राहत व आपण बसल्यावर स्वत: दरवाजा प्रेमाने लावून मगच ड्रायव्हरच्या सीटवर स्वत: बसून गाडी चालवीत. मध्येच कोणी मुद्दाम आडवा आला तर गाडीत स्वत:शीच पुटपुटत, ‘गधा आहे.’ यापेक्षा ते कधीही आणखी कडक बोलले नाहीत.
महाराष्ट्रात उद्योगधंद्यांचे िधडवडे उडत असताना अनेकांना उद्योगधंदे सुरू करून देणारा हा सद्गृहस्थ जावा ही दु:खद घटना आहे.
  

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!