16 December 2017

News Flash

नक्षलवादग्रस्त गावाची ‘मारक’ कथा!

एकाला कायदा उधळून लावायचा आहे तर दुसऱ्याला कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. दोन्ही बाजूने

देवेंद्र गावंडे | Updated: November 25, 2012 3:47 AM

एकाला कायदा उधळून लावायचा आहे तर दुसऱ्याला कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. दोन्ही बाजूने होणाऱ्या या जोरकस प्रयत्नात हे गाव मात्र पूर्णपणे उधळले गेले आहे. छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मरकेगावची वेगळीच कहाणी..
गावात घरांची संख्या ४८, त्यात राहणारे लोक जेमतेम दोनशे, गावातून दिसणाऱ्या मुख्य रस्त्यावरून कोणतेही वाहन जात असले, थांबले किंवा गावाच्या दिशेने वळले की या गावाचे कान टवकारतात. सारे सावध होत सावरून बसतात. पोलीस असतील तरी काही जण पळण्याच्या तयारीत असतात आणि रात्री येणारे नक्षलवादी असतील तरीही तशीच तयारी असते. एरवी या दोन बंदूक वाल्याशिवाय या गावात कुणी येतच नाही. गावाचे नाव मरकेगाव या गावात ४८ कुटुंबं राहायची. आता ४२ उरली आहेत. गावात प्रवेश केला की शाळेच्या पायऱ्यावर बसलेला पंडीराम उसेंडी समोर येतो. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ४१ एकर धानाची शेती असलेला हा वृद्ध पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या लढाईत आदिवासी कसा भरडला जात आहे, याचे उत्तम उदाहरण आहे. केवळ पंडीरामच नाही तर या गावातल्या प्रत्येकाची छळकथा अशीच आहे. केवळ तारीख, वेळ व वर्षे बदलली आहेत. कारवाईचे स्वरूप ढोबळमानाने सारखेच आहे.
एकाला कायदा उधळून लावायचा आहे तर दुसऱ्याला कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. दोन्ही बाजूने होणाऱ्या या जोरकस प्रयत्नात हे गाव मात्र पूर्णपणे उधळले गेले आहे. छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या या गावात नक्षलवादी नेहमी येतात, हे पंडीराम आता बेधडक सांगतो. आधी तो लपवायचा, तरीही पोलीस बदडायचे. आता सांगितले तरी मारतात. त्यापेक्षा खरे बोलून मार खाणे काय वाईट, ही त्याची प्रतिक्रिया. नक्षलवादी जेवण मागतात. प्रारंभी ते दिले म्हणून पोलिसांचा मार खाल्ला. असह्य झाले तेव्हा जेवण देण्यास नकार दिला म्हणून नक्षलवाद्यांनी मारहाण केली. मार खाण्यापासून दोन्हीकडून सुटका नाही हे लक्षात आल्यावर पोलीस किंवा नक्षलवादी जे सांगतील त्याला हो म्हणायचे असे गावकऱ्यांनी ठरवले. ५२ वर्षांचा पंडीराम बोलत असतो, तोवर सारे गाव गोळा झालेले असते. या गावातल्या ४२ कुटुंबांतील कधी एकावर तर कुठे दोघांवर पोलिसांची कारवाई झालेली आहे. गेल्या २० वर्षांंतला हा लेखाजोखा आहे. २००३ मध्ये पंडीराम रात्री घरात झोपला असताना नक्षलवादी आले. त्यांनी त्याला व आणखी तिघांना स्फोटके दडवून ठेवण्यासाठी रस्ता खोदायला नेले. नकार देताच पंडीरामच्या छातीवर बंदुकीच्या नळीचा थंडगार स्पर्श जाणवला. ही स्फोटके नंतर महिनाभराने पोलिसांच्या बॉम्बशोध पथकाला सापडली. नेहमीप्रमाणे गावाची झडती झाली. पंडीरामला अटक झाली. याच काळात गावापासून काही अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील राजनांदगाव पोलिसांनीसुद्धा पंडीरामवर नक्षलवाद्यांना मदत केली म्हणून गुन्हा नोंदवला. पंडीराम तीन वष्रे तीन महिने कारागृहात राहिला. नक्षलवाद्यांना मदत केली हा आरोप पोलिसांना न्यायालयात सिद्ध करता आला नाही. त्याची निर्दोष सुटका झाली. तेव्हापासून पोलिसांच्या रडारवर आलेला पंडीराम आता वृद्ध झाला तरी त्याच्यामागचा ससेमिरा सुटला नाही. अत्याचारसुद्धा वंशपरंपरेने चालत यावा त्याप्रमाणे आता त्याचा मुलगा रावण पोलिसांचे हमखास सावज ठरला आहे.
गेल्या १३ ऑक्टोबरला पोलिसांनी रावणला घरात झोपला असताना पाचव्यांदा अटक केली. त्याच्यासोबत पत्तीराम पुडो या तरुणालासुद्धा उचलण्यात आले. या दोघांवर २००६च्या नक्षल कारवाईत सहभागी असल्याचा आरोप आता ठेवण्यात आला. नंतरचे आठ दिवस या दोघांना नेमकी अटक कुठे झाली, त्यांना ठेवले कुठे आहे हेच पोलीस सांगायला तयार नव्हते. २००९ मध्ये या गावाला अगदी लागून असलेल्या शिवारात नक्षलवाद्यांनी १५ पोलिसांना अगदी घेरून ठार केले. बंदुकांच्या दस्त्यांनी दगडावर ठेचून या जवानांना ठार करण्यात आले. या हत्याकांडाच्या दरम्यान हे संपूर्ण गाव घरात दडी मारून बसले होते. या घटनेनंतर संतापलेल्या पोलिसांनी सलग तीन दिवस या संपूर्ण गावाला यथेच्छ झोडपून काढले. नंतर १२ गावकऱ्यांना हत्येच्या गुन्हय़ाचा कट रचणे या आरोपावरून अटक झाली. सुमारे एक वष्रे तुरुंगात काढल्यानंतर हे सर्वजण जामिनावर सुटले. नक्षलवादी गावाच्या शेजारी तळ ठोकून आहेत हे माहीत होते, पण पोलिसांना सांगण्याची हिंमत कोण करणार आणि असे करून कोण जीव धोक्यात घालणार, असा सवाल त्यांना बोलते केल्यावर समोर येतो. २००९ च्या कारवाईनंतर या गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली. या भागातली पोलिसांची हालचाल मंदावल्यानंतर तब्बल महिनाभराने नक्षलवादी गावात आले. त्यावेळी दलममध्ये असलेले गावातलेच ईश्वर नरोटे व सामसाई नरोटे सुद्धा त्यांच्यासोबत होते. या सर्वाच्या समक्ष गावकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. आता जगायचे कसे ते सांगा, असा प्रश्न उपस्थित केला. नक्षलवाद्यांनी काही उत्तर दिले नाही, उलट तुमच्या गावात पोलिसांचे खबरे वाढले आहेत, तेव्हा जास्त बकबक करू नका असा दमही दिला. यानंतर दोनच महिन्यांनी दलममध्ये असलेले गावचे तरुण ईश्वर व सामसाईने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हे दोघे ताब्यात येताच पोलिसांना मोठे घबाड गवसल्याचा आनंद झाला. नंतरचे काही महिने या दोघांनी गावातल्या तरुणांची नावे सांगायची आणि पोलिसांनी गावात येऊन त्यांना अटक करायची, असा प्रकार सुरू झाला. २००९ ते आतापर्यंत या दोघांच्या सांगण्यावरून २६ गावकऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे. चळवळीत असताना हेच दोघे गावात जेवणाचा निरोप द्यायला यायचे व आता हेच दोघे याच आरोपावरून गावातल्या एकेकाला आत टाकत आहेत, असे याच गावचा तरुण रवींद्र शिंपी सांगतो. २०१० मध्ये या गावापासून ४८ किलोमीटर दूर असलेल्या येरकड गावात खबरी असल्याच्या संशयावरून  नक्षलवाद्यांनी भानू गावडे या तरुणाची हत्या केली. एक वर्षांनंतर मरकेगावची येनुबाई पोया धानोरा या  गावी बँकेत पैसे काढत असताना पोलिसांनी तिला झडप घालून उचलले. या हत्याप्रकरणात सहभागी होती असा आरोप या विवाहित महिलेवर ठेवण्यात आला.
सुमारे एक वर्ष चंद्रपूर व नागपूरच्या तुरुंगात काढल्यानंतर सध्या जामिनावर सुटलेली येनुबाई आपली आपबीती सांगते. ‘येरकडला हत्या झाली त्या रात्री मी घरात  झोपले होते. माझ्या एक व चार वषार्ंच्या दोन मुली बाजूला होत्या. तरीही खूनाचा आरोप माझ्यावर लावण्यात आला. मी जर दलममध्ये असते तर बँकेत पैसे काढायला कशी गेली असते, मला मुली कशा झाल्या असत्या असे बिनतोड प्रश्न ती उपस्थित करते.’ पोलिसांच्या लेखी हे गाव कट्टर नक्षलसमर्थक असले तरी नक्षलवाद्यांनी या गावावर केलेल्या अत्याचाराच्या कथा अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. पाच महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी रामसाय नरोटे व देवराव उसेंडी या दोन तरुणांची गळा चिरून हत्या केली. २००३ पासूनची ही सातवी हत्या आहे. हे दोघेही नक्षलसमर्थक होते, असे पोलीस सांगतात तर गावकरी मात्र या दोघांनी अलीकडच्या प्रत्येक बैठकीत नक्षलवाद्यांना प्रश्न विचारणे सुरू केले होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, असे सांगतात. मरकेगावच्या ४२ कुटुंबांकडे २७२ एकर शेती आहे. धानाचे उत्पन्न चांगले होत असले तरी न्यायालयात तारखेवर हजेरी लावण्यात व वकिलाची फी देण्यात सारे उत्पन्न खर्च होते. एकटय़ा पुंडीरामने २००३ पासून आजवर पाच लाख रुपये कोर्टकचेरीवर खर्च केले आहेत. संपूर्ण गावाने आतापर्यंत किमान १५ लाख खर्च केले असे बारावीचे शिक्षण घेतलेला रवींद्र शिंपी सांगतो. सध्या गावातले सहा तरुण नक्षल चळवळीत आहेत. तेही पोलिसांच्या माराला कंटाळून तिकडे गेले, असेही तो सांगतो. नक्षलवाद्यांचा विरोध असून सुद्धा गावातल्या १४५ मतदारांनी गेल्या निवडणुकीत मतदान केले, हे तो जेव्हा सांगतो तेव्हा पोलिसांचे या गावाविषयीचे मत अर्धसत्य आहे असे वाटते. या गावातील प्रत्येक पोलीस केस धानोरा येथील अ‍ॅड. दुग्गा व गडचिरोलीचे अ‍ॅड. दोनाडकर लढतात. गडचिरोलीत दोनाडकरांची भेट झाली. मरकेगावात पोलिसांनी केलेल्या बहुतेक केसेसमध्ये पुरावेच नाहीत. बहुतांश प्रकरणे नक्षल्यांना जेवण देण्यासंबंधीची आहेत. या गावातील आदिवासींवर पोलिसांनी शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपपत्रात या आदिवासींनी अत्याधुनिक शस्त्रांनी पोलिसांवर गोळीबार केला, असे पोलीस नमूद करतात आणि प्रत्यक्षात जप्ती मात्र असंख्य बंदुकांची दाखवली जाते. या बंदुकीतून गोळी नाही तर र्छे सुटतात याचेही भान पोलीस ठेवत नाहीत. यात आदिवासी मात्र नाहक भरडले जातात, असे मत अ‍ॅड. दोनाडकर स्पष्टपणे नोंदवतात. केवळ मरकेगाव नाही तर नक्षलवादग्रस्त भागातील बहुतांश गावांची कथा अशीच आहे.

First Published on November 25, 2012 3:47 am

Web Title: story of naxalism affected villege