भोसरी येथील प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालयातील आठवीच्या ३० विद्यार्थ्यांना एकमेकांशी मराठीत बोलल्याबद्दल काळेनिळे पडेपर्यंत बेदम मारहाण केली गेली. शाळेच्या अधिकारी व्यक्तीनेच हे संतापजनक कृत्य केले. ज्या मुजोर व्यक्तीने हे कृत्य केले त्यास कठोर शासन होणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्रातच मराठी भाषेच्या मुळावर कोणी उठत असेल तर ते दुष्कर्म पचवणे अशक्य आहे. दुर्दैव एका गोष्टीचे वाटले की, ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्यांच्या पालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली नाही. आपल्या मुलांना शाळेतून काढून टाकले जाण्याची भीती यामागील कारण आहे. ही जी कचखाऊ मानसिकता आहे नेमकी तीच मराठीच्या शत्रूंच्या पथ्यावर पडते आणि मग वाटेल ते करण्याचे बळ त्यांना मिळते. वेळीच त्यांना जर त्यांची ‘पायरी’ दाखवली तर त्यांनाही मराठी अस्मितेची प्रचीती येईल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हवा. परराज्यातील कोणा व्यक्तीची आपल्या मुलांना अमानवीपणे बदडण्याची िहमत होतेच कशी?
विद्यार्थ्यांनी मराठी बोलणे एवढेच जर त्या शाळेस झोंबत असेल तर त्यांनी तसे शाळेच्या गेटवर नमूद करायला हवे होते. शाळेस मराठी माणसांचे पसे चालतात. मग त्या भाषेचा वापर केल्यास पोटात का दुखावे? मुलांनी इंग्रजीतच बोलावे यासाठी इंग्रजी शाळा आग्रही असतात. यासाठी शाळेप्रमाणे शिक्षाही निराळ्या आहेत. देश-विदेशात उच्चपदावर कार्यरत असणारे मराठी माध्यमातून शिकले. त्यांचे इंग्रजीमुळे कुठे अडले नाही.
मराठी पालकांनीच डोळसपणे याबाबत विचार करावा. ‘चकाकतं ते सर्व सोनं नसतं.’ त्यामुळे इंग्रजीचा नको इतका बाऊ करू नये.

चाचण्या आवश्यकच, पण  प्रयोगशाळेची सक्ती नको!
वैद्यकीय चाचण्यांविषयी विविध डॉक्टरांची मतमतांतरे (रविवार विशेष, १२ जुलै) वाचली. डॉक्टरांनी प्रत्यक्ष केलेल्या तपासणीमुळे व तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या चाचण्यांमुळे रुग्णाच्या व्याधीचे अचूक निदान होण्यास मदतच होते. परंतु, विशिष्ट प्रयोगशाळेतील अहवालच आम्ही गृहित धरू असा आग्रह जर एखादा डॉक्टर करीत असेल तर ते सर्वार्थाने चुकीचेच आहे. नव्हे आपणास आर्थिक भरुदड पाडणारे वा संबंधित डॉक्टरचा खिसा गरम करणारे असू शकते, याची शंका रुग्णाला येते. त्यामुळे तो रुग्ण अशा डॉक्टरकडे ‘लुटतात’ या भावनेने पाहतो व तसा प्रचार समाजामध्ये करतो. हे टाळण्यासाठी डॉक्टरांनी ज्या चाचण्यांची आवश्यकता आहे त्या अवश्य सुचवाव्यात. परंतु, त्याला विविध प्रयोगशाळांचे पर्यायही सांगावेत, जेणेकरून रुग्णाची संशयीबुद्धी कमी होईल.
डॉ. कैलास चांदकर, मानवत, जि. परभणी</strong>

चित्रकला, एनसीसी याकरिता द्विलक्षीमध्येच वाढीव गुण का?
अकरावी प्रवेशाची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू झाली आहे. पालक व मुलांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे अनेक मुद्दे एक पालक म्हणून लक्षात आले. विज्ञान शाखेकडे ओढा असणाऱ्या मुलांना द्विलक्षी अभ्यासक्रम घेण्याची इच्छा असते. त्यायोगे जीवशास्त्र (१०० गुण) व एक भाषा (१०० गुण) याऐवजी कॉम्प्युटर वा इलेक्ट्रॉनिक्स आदी २०० गुणांचे विषय इंजिनीअरिंगकडे जाणाऱ्यांना सोयीचे वाटतात. साहजिकच या विषयांकरिता स्पर्धा असते. याचा बारकाईने अभ्यास केल्यावर काही मुद्दे लक्षात आले.
१) दहावीपर्यंत ज्यांनी टेक्निकल विषय म्हणजे वेल्डिंग, सुतारकाम असे विषय घेतले असतील त्यांना वरिष्ठ द्विलक्षी अभ्यासक्रमात ४० टक्के जागा ठेवल्या आहेत. जी मुले जाणूनबुजून लहान वयात व्होकेशनल अभ्यासक्रम इतर विज्ञान विषयांऐवजी किंवा पूरक म्हणून घेतात त्या मुलांनी दहावीत नियमित विषयांच्या ९० टक्क्य़ांच्या वर गुण मिळविणाऱ्यांशी स्पर्धा ठेवणे व ६० टक्के गुण मिळवूनसुद्धा ती जागा मागणे कितपत योग्य आहे? तसेच त्यांना म्हणे १५ गुण वाढवून दिले जातात. पूर्वी ७५० पकी १५, आतासुद्धा ५०० पकी १५च गुण वाढवून देताहेत. म्हणजे किती गुणात्मक वाढ (२ टक्क्य़ाचे ३ टक्के) आणि कशाकरिता?
२) सीबीएससी/आयसीएसईमध्ये कॉम्प्युटर हा ऐच्छिक विषय असणाऱ्या मुलांना मात्र हा फायदा का दिला जात नाही? त्यांना खरे तर हक्काने मिळायला हवे, कारण वर दिल्याप्रमाणे कमी गुण असलेला टेक्निकल विद्यार्थी ९० टक्के गुण मिळविणाऱ्या  सीबीएससी/आयसीएसईपेक्षा सहज प्रवेश मिळविताना दिसतो.
३) तसेच चित्रकला परीक्षा, एनसीसी, स्काऊट याकरिता फक्त द्विलक्षीमध्येच वाढीव गुण का असावे? जेव्हा विद्यार्थी अभ्यास सांभाळून खेळ वा कलेमध्ये प्रावीण्य मिळवतो त्याला प्रवेशाच्या वेळी जो फायदा दिला जातो तसाच फायदा एनसीसी, स्काऊट, चित्रकला परीक्षा देणाऱ्यांना प्रवेशाच्या वेळी द्यावा. द्विलक्षी अभ्यासक्रमांत त्याचा खास फायदा काय होतो, हे कोडेच आहे.                                                
पी.एच. राऊत

संवेदना बधीर गृहमंत्री
निवडणुकीच्या आधी मुंबईच्या नाक्या-नाक्यावर पुरुषांबरोबर महिला पोलीस कर्मचारी २४ तास तनात करण्यात आले होते. या पोलीसांना उन्हा-पावसापासून काही संरक्षण नाही. बसण्यासाठी, विश्रांतीसाठी व्यवस्था नाही. स्वच्छतागृहांची वानवा असते. या पोलीस महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना अमानुष पद्धतीने राबवून घेतले जात आहे.  या कर्मचाऱ्यांची अवहेलना थांबवणे हे राज्याच्या गृहमंत्र्यांचे काम नाही का? लहान-सहान अन्यायाविरोधात ओरडणारे मानवी हक्क आणि महिला संरक्षण समितीचे कार्यकत्रे याकडे मला वाटते डोळे बंद करून फिरत असावेत अथवा आबांसारखी त्यांचीही संवेदना बधीर झाली असावी. संघटन करण्याचा अधिकार नसल्याने हे पोलीस वेठबिगाऱ्यासारखे राबत आहेत. आबांनी याकडेही लक्ष द्यावे. डॉ. रमेश डी. पंडित, बोरिवली (प.), मुंबई

झोपाळू खासदार काय कामाचे?
काँग्रेसचे तरुण नेते राहुल गांधी लोकसभेत महागाईसारख्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना चक्क झोपलेले पाहून संताप आला. अशा लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा ठेवणार? वास्तविक जनतेने विरोधी बाकांवर बसवल्याने त्यापासून बोध घेऊन काँग्रेस नेत्यांनी जागरूक असले पाहिजे. सत्ताधारी चुकत असतील तर त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. असे झोपाळू खासदार काय कामाचे?    
विवेक तवटे , कळवा

.. म्हणून हवा जाणवत नाही?
‘सोशल मीडियावरची मोदी यांची हवा ओसरली ’ हे राज ठाकरे यांचे वक्तव्य   (१२ जुल) वाचले. मोदी हे गुजरातचे शिल्पकार आहेत, त्यांचे काम मी पाहिले आहे, ते पंतप्रधान होण्यास योग्य उमेदवार आहेत असे मीच सर्वप्रथम म्हटले होते, असा जप करणाऱ्या राज यांना हा साक्षात्कार आता का व्हावा हे काही आता गुपित राहिलेले नाही. मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन  दिवसेंदिवस क्षीण होत चाललेल्या मनसेला काही धुगधुगी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न करून पाहिले. ‘माझे खासदार मोदी यांनाच पंतप्रधान होण्यासाठी मदत करतील’ असा ‘मान न मान, मं तेरा मेहमान’ असा त्यांनी प्रकार केला. कुणीच निवडून आले नाही.
 नाशिक या बालेकिल्ल्यात पडू पाहणारे िखडार आणि ब्लू िपट्र ही परिकल्पना वाटावी अशी ती काढण्यासाठी केलेली अक्षम्य दिरंगाई यामुळे मनसे हा येत्या विधानसभेत पूर्ण नामोहरम होणार हे त्यांना उमगले असावे आणि त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळेच मोदींची वरची हवा त्यांना जाणवत नसावी.                                                                
देवयानी पवार, पुणे</strong>