22 November 2017

News Flash

मलिकमूर्खाचा संप्रदाय

पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक हे मूर्ख आहेत की महामूर्ख, असा प्रश्न पाकिस्तानातील जनतेलाच पडलेला

मुंबई | Updated: December 17, 2012 1:56 AM

पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक हे मूर्ख आहेत की महामूर्ख, असा प्रश्न पाकिस्तानातील जनतेलाच पडलेला आहे. चार दिवसांच्या भारतभेटीसाठी आले असता मलिक यांनी अकलेचे जे तारे तोडले ते त्यांच्या लौकिकास साजेसेच आहेत. त्यांच्या मते अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याची घटना आणि २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला या एकाच मापाने मोजण्याच्या घटना आहेत, २६/११ चा सूत्रधार अबू जुंदाल हा पाकिस्तानी नागरिक भारतीय गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करीत होता आणि लष्कर- ए- तय्यबाच्या प्रमुखासंदर्भात पुरेसा पुरावा नाही. अशी एकापाठोपाठ एक बेजबाबदार विधाने करीत मलिक यांनी त्यांना गंभीरपणे घेण्याची का गरज नाही, हे सोदाहरण स्पष्ट केले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांत मलिक यांची विधाने ही टिंगलटवाळीचा विषय असतात आणि भारतासारख्या महत्त्वाच्या देशाचा दौरा करीत असताना तरी या सवयीस मुरड घालण्याची गरज मलिक यांना वाटत नाही, यातच काय ते आले. मध्यंतरी तरुण पाकिस्तान्यांतील वाढत्या हिंसक प्रवृत्तीविषयी चिंता व्यक्त करताना मलिक यांनी तरुणांच्या तिखट खाण्याचा संबंध दहशतवादाशी जोडला होता. या तरुणांनी तामसी खाणे सोडले तर दहशतवाद कमी होईल, असा सल्ला त्यांनी दिला होता. तो खरा मानला तर समस्त पश्चिम आशियास शाकाहारी भोजनाची सवय लावण्याची जबाबदारी मलिक यांनी घ्यावी. या कामी बाबा रामदेव यांची त्यांनी मदत घेण्यास हरकत नाही. मलिक यांनी असे केल्यामुळे हिंसाचार कमी होईल न होईल, पण हजारो बोकड आदींचे प्राण वाचून त्यांचे दुवे मलिक यांना मिळतील. पाकिस्तानात वेगवेगळय़ा हत्याकांडांत जे मारले जातात त्यातील सत्तर टक्के बळी हे पत्नी वा प्रेयसी यांनी घेतलेले असतात, असाही धक्कादायक निष्कर्ष या गृहमंत्र्यांनी काढला होता. तसे असेल तर मलिक हे अजूनही सुरक्षित कसे, असा प्रश्न पडल्यास तो अनाठायी म्हणता येणार नाही. पाकिस्तानच्या या गृहमंत्र्याने काही महिन्यांपूर्वी देशातील खंडणीखोरांना इशारा दिला होता आणि त्यांनी ही खंडणी मागण्याची सवय सोडावी नपेक्षा त्यांना बाहेर काढले जाईल, असेही बजावले होते. खंडणीखोरांनी धर्मादाय कामास लागावे अशी उदात्त इच्छा मलिक यांची असावी. त्यास किती प्रतिसाद मिळाला हे कळण्यास मार्ग नाही. इल्यास काश्मिरी या वादग्रस्त व्यक्तीच्या हत्येसंदर्भातही मलिक यांनी आपल्या बुद्धिमत्तेची अशीच चुणूक दाखवून दिली होती. ‘माझ्यासमोर जो काही पुरावा सादर करण्यात आला आहे त्यानुसार इल्यास काश्मिरी जिवंत नाही, तो नक्की मेला आहे याची ९८ टक्के खात्री मी देऊ शकतो,’ असे गहन विधान मलिक यांनी केले होते. त्यावर राहिलेल्या दोन टक्क्यांचे काय, असा प्रश्न त्यांना विचारणे गरजेचे होते. गृहमंत्र्यांसमोरचा पुरावा जर काश्मिरी मेल्याचे सांगत असेल तर त्याच्या मृत्यूची ९८ टक्के हमी देणे म्हणजे काय? तेव्हा या लायकीचा गृहमंत्री ज्या देशाचा असेल त्या देशाचे भवितव्य कुडमुडय़ा ज्योतिषीदेखील १०० टक्के अचूक वर्तवू शकेल, यात शंका नाही.
तेव्हा या मलिक महाशयांना त्यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भेटण्याची काहीच आवश्यकता नव्हती. राजनैतिक शिष्टाचार हे अशा वेडपट व्यक्तींसाठी पाळले गेले नाहीत तरी काही बिघडत नाही. ते पाळले गेले नसते तर अधिक शोभून दिसले असते. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे वगळता काही अन्य मंत्र्यांची मलिक यांच्याशी गाठच घालून द्यायची होती तर त्यासाठी बेनीप्रसाद वर्मा हे अधिक योग्य होते. मलिक यांना त्यांच्याच शैलीत तोंड देण्याची क्षमता आपल्यात आहे हे या वर्मा यांनी गेल्या काही महिन्यांत दाखवून दिलेच आहे. तेव्हा सिंग या आचरट मंत्र्यास भेटले नसते तर बरे झाले असते. या मलिक यांच्या मते जुंदाल हा भारतीय होता वा भारतीय गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करीत होता. तसे होते तर मलिक ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतात त्या पाकिस्तानने सौदी अरेबियास त्या वेळी पाठवलेल्या खलित्यात जुंदाल याच्या राष्ट्रीयत्वाची जबाबदारी का घेतली? जुंदाल याचे पारपत्र पाकिस्तानी होते आणि तो त्याच्या मायदेशी, म्हणजे पाकिस्तानात वारंवार जाऊन आल्याचा तपशीलही उपलब्ध आहे. तेव्हा त्या पुराव्याचे काय करावयाचे याचेही काही मार्गदर्शन मलिक यांनी करावे. या हल्ल्यात गुंतलेले अन्यदेखील भारतीयच असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मलिक हे गृहमंत्री आहेत. तेव्हा त्याबाबतचा काही तपशील त्यांच्याकडे असायला हवा. नसल्यास त्यांनी तो मिळवून सादर करावा. अन्यथा गृहमंत्र्यास अशी वरवरची विधाने करणे शोभत नाही. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली जाणे आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला यांची तुलना करणे हा तर मूर्खपणाचा कळस म्हणावयास हवा. परंतु तसे मलिक यांच्याबाबत म्हणता येणार नाही. याचे कारण असे की असे नवनवे वाग्बाणांचे विक्रम करण्याची त्यांची क्षमता. यापेक्षाही अधिक काही असे अघटित ते बोलू शकतात. परंतु मलिक यांच्या या वेडपटपणामागेदेखील एक शहाणपण आहे, त्याची नोंद घ्यायला हवी. ही वा अशा संदर्भातील विधाने त्यांनी प्रामुख्याने भारतासंदर्भातच केलेली आहेत. पाकिस्तानच्या माजघरात येऊन अमेरिकी फौजांनी तेथे राहात असलेल्या ओसामा बिन लादेन यास टिपले. इतकेच काय ९/११ च्या आधी , १९९३ मध्ये न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ रामझी यास रावळपिंडीत येऊन अमेरिकी फौजांनी अटक केली होती. त्याबद्दल अवाक्षर काढण्याची हिंमत मलिक यांच्यात नाही. कारण वेळ पडल्यास अमेरिका पाकिस्तानच्या या य:कश्चित गृहमंत्र्यास घरचा रस्ता दाखवू शकते वा त्याचे दात घशात घालू शकते. याची जाणीव असल्याने मलिक हे अमेरिकेच्या संदर्भात कान पाडून असतात आणि भारताच्या बाबतीत मात्र गुरगुरत राहतात. याचे कारण असे की भारताबाबत बोटे मोडीत राहणे या एककलमी कार्यक्रमावर अनेक पाकिस्तानी राजकारणी तगून आहेत. या मंडळींना त्यांच्या देशात काहीही स्थान नाही. आपल्याकडील भारत पाकिस्तान संबंधांतील भंपक आशावादी या मंडळींच्या जेवढे मागे धावतात तेवढी किंमत त्यांना त्यांच्या मायदेशातदेखील दिली जात नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांच्याबद्दलही काही बरे बोलावे असे नाही. आपले श्वशुर झुल्फिकार अली भुत्तो यांच्या राजकीय पुण्याईवर ते अजून तगून आहेत आणि पत्नी बेनझीर पंतप्रधान असताना केलेल्या खंडणीखोरीवर अद्याप जगत आहेत. झरदारी यांना त्या देशात कवडीइतके राजकीय स्थान नाही.
तरीही आपली वा अन्यांची अडचण ही की या बिनबुडाच्या मंडळींखेरीज पाकिस्तानात बोलावे असे अन्य कोणी नाही. तो देश एक कोसळता डोलारा बनलेला असून एकंदर परिस्थिती काळजी वाटावी अशीच आहे. अडलेल्या हरीस ज्याप्रमाणे गाढवाचे पाय धरण्याखेरीज पर्याय नसतो, तसे आपले झाले आहे. अन्य कोणी पर्याय दिसतच नसल्याने अशा गणंगासाठी आपल्याला पायघडय़ा घालाव्या लागतात. तेव्हा अंगप्रत्यंगांच्या प्रदर्शनासाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी ‘प्रसिद्ध’ असलेली पाक अभिनेत्री वीणा मलिक असो वा हे रेहमान मलिक. पाकिस्तानातील हा नवा मलिकमूर्ख संप्रदाय आपली डोकेदुखी वाढवणारा आहे, यात शंका नाही.

First Published on December 17, 2012 1:56 am

Web Title: stupid rehman malik