वयाच्या तिसऱ्या वर्षी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतल्याचा दावा करत पेन्शन व सवलतींची मागणी करणाऱ्या नव-स्वातंत्र्यसैनिकाचा आदर कसा करणार? पुराणातील अभिमन्यूचे हे वर्तमानातील वारस हा आजचा चमत्कार ठरणार आहेत.
इतिहास ही भविष्याची प्रेरणा असते. या इतिहासाच्या प्रेरणेतूनच शेकडो स्वातंत्र्यसनिकांनी दीडशे वष्रे ब्रिटिशांच्या शक्तिमान राजवटीशी लढा देऊन त्यांना जेरीस आणले आणि देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती मिळवून दिली. स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांत या लढय़ाच्या रोमांचक कहाण्यांनी आपल्याला भविष्याच्या उज्ज्वल वाटचालीसाठी दिशा दिली आहे. स्वातंत्र्यलढय़ाचा हा इतिहास ही भारताच्या भावी पिढय़ांची प्रेरणा असल्याने, या लढय़ात ज्यांनी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, तुरुंगवास भोगले, ब्रिटिश सत्ताधीशांच्या अनन्वित अत्याचाराला असीम धर्याने तोंड देत स्वातंत्र्यदेवतेची गीते उच्चरवाने गायिली अशा सर्व स्वातंत्र्यवीरांबाबत कृतज्ञ असावे आणि या स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथांचे पोवाडे भविष्यातही दुमदुमत राहावेत, या उदात्त हेतूने स्वातंत्र्योत्तर काळात या स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान राखण्याचे केंद्र आणि राज्य सरकारांनी ठरवले यात काही गर नाही.
स्वातंत्र्यलढय़ाची ही गाथा आपल्या अवतीभवती अजूनही जिवंत आहे, हा केवळ अनुभवच अतीव रोमांचकारी आहे. गेली ६७ वष्रे हा अनुभव आपण घेतच आहोत, हे वर्तमानाच्या पिढीचे खरे म्हणजे परमभाग्य आहे. आपल्या संपूर्ण सदिच्छा असल्याने, भविष्यातील जास्तीत जास्त पस्तीस वर्षांनी स्वातंत्र्यलढय़ाचा हा चालताबोलता इतिहास नक्कीच काळाच्या पडद्याआड जाईल आणि केवळ इतिहासाची छापील पाने आपल्या हाती उरतील. इतिहासाची ही पानेच आपल्याला भविष्याची प्रेरणा देत राहतील. पण काळ पुढे जात असल्याने त्यालादेखील नाइलाजच आहे. राज्य सरकारने अशा स्वातंत्र्यसनिकांच्या सन्मानासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तिवेतनादी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या, तेव्हा स्वातंत्र्यसनिक असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची अट घातली होती. स्वातंत्र्यलढय़ात थेट सहभाग असल्याचे, तुरुंगवास भोगल्याचे, घरादाराची, संसाराची आहुती देऊन स्वातंत्र्ययज्ञात स्वत:च्या आयुष्याची समिधा अर्पण केल्याचे पुरावे द्या आणि या सुविधा मिळवा, असे राज्य सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या १८ वर्षांनी जाहीर केले, तेव्हापासून राज्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांचे स्वातंत्र्यानंतरचे जिणे सुकर झाले. सवलती आणि पेन्शन मिळवण्यासाठी विशिष्ट मुदतीतच पुरावे सादर करण्याची अट घालणे हा देशासाठी केलेल्या त्यागाचा उपमर्द आहे, या जाणिवेने पुढे काही वर्षांनी, म्हणजे १९८९ नंतर तीही एक अट शिथिल करण्यात आली. तो काळच देशभक्तीने भारावलेला होता. त्या वातावरणात, अंगी सळसळणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात स्वातंत्र्याचे वारे इतके तेजस्वीपणे वाहात होते, की या लढय़ात सर्वस्वाची आहुती देण्यासाठी वयाच्या कोणत्याच मर्यादा आड येऊ शकत नव्हत्या.
कोवळ्या वयात अनेक बालकांनी छातीवर ब्रिटिश सन्याच्या गोळ्या झेलल्या आणि प्राणांची आहुतीही दिली. याच वयात बाबू गेनू हुतात्मा झाला, तर कोल्हापुराच्या चौकात िबदुमाधवाने इतिहास निर्माण केला. अशा असंख्यांनी आपले कौमार्य स्वातंत्र्यदेवतेच्या चरणी अर्पण केल्याने, स्वातंत्र्यलढय़ातील सहभागासाठी १६ वर्षांची अट घालणे हादेखील त्या वयातील भारावलेपणाचा अपमान होईल, या भावनेने पुढे सरकारने ती अटही काढून टाकली आणि स्वातंत्र्यलढय़ातील सहभागाचे तकलादू पुरावे पुढे करून अनेक जण सवलतींसाठी सरसावले. वयाची ही अट कायम असती, तर स्वातंत्र्यसनिक म्हणून निवृत्तिवेतन आणि सवलती घेणारी पिढी आज वयाच्या ८० वर्षांपलीकडे पोहोचली असती. आज राज्यात सरकारी सवलतींच्या आधाराने स्वातंत्र्य उपभोगणाऱ्यांची संख्या जवळपास १५ हजारांच्या घरात आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांत या यादीतील प्रत्येकाचे किमान वय ६७ वर्षांचे असावे, असा ढोबळ अंदाज करता येऊ शकतो, कारण स्वातंत्र्यलढय़ातील सहभागाचा दावा करणारे अनेक महाभाग आज, ६७ वर्षांनीदेखील पुढे येत आहेत. स्वातंत्र्यसनिकांची ही चालतीबोलती इतिहासगाथा अशीच जिवंत राहावी आणि आपल्याला उज्ज्वल इतिहासाची प्रेरणा देत राहावी हे प्राक्तन असल्याने, आता नव्याने पुढे सरसावणाऱ्या दावेदारांबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.
शौर्यगीते हा स्वातंत्र्यलढय़ाचा आणि देशभक्तीचा झरा अखंडपणे वाहता ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग ठरला आहे. अशा शौर्यगीतांनी आपल्यासमोर तेजस्वी इतिहासाचा वारसा ठेवला असला, तरी ही शौर्यगीते आणखीही वेगळ्या प्रकारे प्रेरणादायी ठरली आहेत. महाभारतकाळातील चक्रव्यूह भेदण्याचे रहस्य अभिमन्यूने आईच्या गर्भात असताना श्रीकृष्णाच्या तोंडून ऐकले आणि पुढे जन्मानंतर उमलत्या वयात त्याच गर्भसंस्कारातून त्याने अभेद्य चक्रव्यूहाचा लीलया भेद केला, ही पुराणकथा प्रत्येकाच्याच मनात प्रेरणा जागवणारी आहे. अशाच कथांतून पुढे स्वातंत्र्यसमरातील वीरांच्या मनामनात शौर्याचे अंगार उमलले आणि त्याच प्रेरणेतून पुढे शौर्यगीतांचे सूर उमटू लागले. जिंकावं वा कटून मरावं, हेच ठावं असणारे शूर, निर्भय सरदार याच शौर्यगीतांच्या प्रेरणेतून निर्माण झाले. आईच्या गर्भात उमगलेल्या झुंजारपणाच्या रीतीचा गाभादेखील अभिमन्यू हाच होता आणि चक्रव्यूह भेदण्याचे गर्भसंस्कार घेऊनच या शूरवीरांनी देव, देश आणि धर्मापायी प्राण तळहाती घेतले होते. त्यामुळे स्वातंत्र्यसनिकांच्या वयाची अट नष्ट झाल्यानंतर याच गर्भसंस्काराचे पुरावे पुढे करून कुणी स्वातंत्र्यलढय़ातील सहभागाचा दावा करेल, हे कल्पनातीत असले, तरी वास्तव ठरले आहे.

स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या आईच्या उदरात असल्यामुळे आणि तुरुंगाच्या गजाआडच जन्म झाल्यामुळे आपणही स्वातंत्र्यसनिक आहोत, असा अजब दावा करून पेन्शनसाठी हात पसरणाऱ्या महाभागांनी नव्या यादीत आपलीही भर घालण्यासाठी तयारी सुरू केली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतल्याचा दावा करत पेन्शनची आणि सवलतींची मागणी करणाऱ्या नव-स्वातंत्र्यसनिकाचा आदर सरकार कसा करणार? इतिहासकाळाच्याही मागे असलेल्या पुराणातील अभिमन्यूचे हे वर्तमानातील वारस हा स्वातंत्र्यलढय़ाच्या तेजस्वी इतिहासाचा आजचा चमत्कार ठरणार आहेत. या जिवंत इतिहासाचे काय करायचे हा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याआधीच त्याची वासलात लावली पाहिजे. पण त्याची योग्य ती चिंता सरकारे करतच असतील, असे समजावयास सध्या तरी हरकत नाही.
स्वातंत्र्यसनिकांना निवृत्तिवेतनाबरोबरच इतरही अनेक फायदे मिळत असतात. मोफत प्रवास ही त्यांना मिळणारी एक दृश्य सवलत असते. शहरी किंवा ग्रामीण भागात रस्तोरस्ती फिरणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसगाडीतील एक बाकडे स्वातंत्र्यसनिकासाठी राखीव असते. त्याच्यासोबत त्याचा एक सहकारीदेखील या सवलतीतून मोफत प्रवास करू शकतो. या बाकडय़ाकडे पाहण्याची सामान्यांची दृष्टी आदराची असते. भविष्यातही त्याचा आदरच राखला जाईल. पण उद्याची, आणखी पंचवीस वर्षांनंतरची पिढी मात्र, स्वातंत्र्यसनिक हा एक इतिहास असल्याचेच मानणार आहे. त्या वेळी पेन्शन आणि प्रवासात राखीव जागांची सवलत मागणारे कुणी असलेच, तर त्याला जाब विचारला जाईल.
इतिहास केव्हा तरी इतिहासाच्या पानात गेलाच पाहिजे. इतिहासाची सावली जिवंतपणे वावरत राहिली, तर वर्तमान आणि भविष्यकाळ काळवंडून जाईल, याची जाणीव आपण ठेवायलाच हवी.