स्वत:साठी जगणाऱ्यांच्या जगात, दुसऱ्यासाठी जगण्याच्या आनंदाचा अनुभव घेणारी आणि तो इतरांना वाटणारी माणसंही फारच अभावाने आढळतात. एखादा निखळ पाण्याचा खळाळता झरा आपल्याच आनंदात वाहत असतो, आणि कुणी तरी एखादा अनोळखी त्याच्या काठाशी बसून त्याच्या ओंजळभर पाण्याने एका आगळ्या तृप्तीने न्हाऊन निघतो, तरीही त्या झऱ्याला मात्र, आपण फार अलौकिक असं काही केलं आहे, याची साधी गंधवार्ताही नसते. अशा झऱ्यासारखं एक निर्मळ आयुष्य म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सुधाताई वर्दे यांचं नाव अनेकांच्या ओठावर कायमचे कोरलेले राहणार आहे.
सुधाताई वर्दे नावाच्या एका सदा आनंदी ‘झऱ्याची गोष्ट’ मराठी साहित्यविश्वातही आपुलकीने वाचली, ऐकली गेली. महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या आघाडी सरकारमध्ये, जनता सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. सदानंद वर्दे यांच्या पत्नी एवढीच सुधाताईंची ओळख नाही. कारण सुधा वर्दे हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाच्या माध्यमातून देशभर भ्रमंती करताना हजारो माणसं सोबत जोडलेल्या निरपेक्ष कार्यकर्त्यांची जी मोजकी नावे आजही घेतली जातात, त्यामध्ये सुधाताई हे नाव वरचे होते. आपलं व्यक्तिगत जीवनदेखील सेवादलमय व्हावं, आणि आयुष्याचा संसारही सेवादलाशीच जोडलेला असावा या भावनेने झपाटलेल्या कोतवाल कुटुंबातील अनुताईंनी सदानंद वर्दे यांच्याशी विवाहाची गाठ बांधली, तेव्हाही त्यांच्या मनात केवळ इच्छापूर्तीचाच आनंद तरळला होता, तोच आनंद त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनातही जपला आणि त्याच आनंदात त्यांनी अखेरचा श्वास घेतला..
सुधाताई स्वत: उत्तम नृत्यांगना होत्या. पण या कलेचा वापरही त्यांनी सेवादलाच्या कलापथकाच्या माध्यमातून लोकशिक्षणासाठीच केला.  दुसऱ्यासाठी जगण्याचा आनंद यातून मिळतो, या विचारावर श्रद्धा असलेल्या सुधाताईंनी अनेकांना आनंद वाटून घ्यायलाही शिकवलं. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात सदानंद वर्देना तुरुंगवास भोगावा लागला, आणि सुधाताई आणीबाणीच्या विरोधात घराबाहेर पडल्या. मुलगी झेलम आणि सुधाताई, दोघींनी सत्याग्रह सुरू केले, आणि त्यांना अटक झाली. मग तुरुंगातील गुन्हेगार महिलांना साक्षर बनविण्याचे काम त्यांनी स्वीकारले. आणीबाणीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारात प्रा. वर्दे शिक्षणमंत्री झाले, पण या कुटुंबाचे घर सत्तेच्या झगमगाटापासून मात्र जाणीवपूर्वक दूरच राहिले. सुधाताई आणि सदानंद वर्दे हे दाम्पत्य म्हणजे, त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचा आनंदाचा झरा ठरला..