कबीराने हिंदूंचे वेद, कर्मकांड, जातीपाती व मूर्तिपूजा नाकारल्या, पण ईश्वरशरणतेवर भर दिला. तसेच हिंदू  आणि मुस्लीम या दोन धर्मीय जनतेत सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.कबीराच्या नंतर काही दशकांनी आलेल्या गुरू नानक यांनीसुद्धा अशाच प्रकारचे धर्मसमन्वयाचे कार्य उत्तर भारतात केले.
असे म्हणतात की, इस्लाम धर्माचा संस्थापक प्रेषित महंमद याने स्वत:च म्हटले होते की, त्यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये ७२ पंथ (संप्रदाय) निर्माण होतील. आज जगात प्रत्यक्षात इस्लाममध्ये त्याहून जास्त पंथ निर्माण झालेले असावेत. त्यांपैकी शिया व सुन्नी हे दोन मुख्य पंथ आहेत. मुळात प्रेषित महंमदाच्या मृत्यूनंतर त्याचा जावई ‘अली’ यांच्याकडे खलिफापद यावे की न यावे या वादावरून हे दोन पंथ निर्माण झालेले आहेत. अलीची बाजू रास्त व न्याय्य मानणारे ते शिया व विरुद्ध बाजूचे ते सुन्नी होत. जगभर सुन्नीपंथीय लोक शियापंथीय लोकांपेक्षा संख्येने जास्त आहेत. फक्त इराणसारख्या काही देशांत शियापंथीय बहुसंख्य आहेत. आज जगभरात इस्लाम धर्मीयांत, वहाबी, अहमदिया, सुफी इत्यादी व दुसरे अनेक पंथ आहेत. परंतु त्या विषयाच्या खोलात न शिरता या लेखात आपण ‘इस्लामला लागलेले गूढवादी वळण’ असे ज्याला काही लोक ओळखतात व ज्याचा नंतरच्या काळात मुख्यत्वे भारतात प्रसार झालेला आहे त्या सुफी पंथाबद्दल थोडीशी माहिती या लेखाच्या सुरुवातीला घेणार आहोत.
सुफी पंथ : अबू याझीद (इ.स. ७९६ ते ८७४)- या संताने इराणमध्ये इस्लाम अंतर्गत सुरू केलेल्या सुफी पंथात ‘सृष्टी आणि ईश्वर एकच आहेत’ म्हणजेच ‘जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे’ असे अद्वैत मत जे कुराणाच्या तत्त्वज्ञानाशी साफ ‘विसंगत’ आहे ते सांगितले. उदाहरणार्थ, ‘मीच ईश्वर आहे’ हे त्याचे प्रसिद्ध वाक्य, उघडपणे ‘अहं ब्रह्मास्मि’ या बृहदारण्यकोपनिषदांतील वाक्याचे सरळ भाषांतर आहे. प्रो. झीनर या विद्वानाने असे दाखवून दिले आहे, की सुरुवातीच्या सुफी संतांनी ही मते त्या काळी इराणपर्यंत पोहचलेल्या, भारतातील हिंदूंच्या वेदांत तत्त्वज्ञानातून घेतलेली आहेत. कित्येक सुफी संतांचा, अशा इस्लामशी न जुळणाऱ्या मतांसाठी अरबस्तानादी देशांत, त्यांना वेडे ठरवून, भयंकर छळ झालेला आहे.
पुढील काळात हे सुफी संत इराणमधून जगात इतरत्र गेले, भारतातही आले व मुसलमान राज्यकर्ते असलेली भारतभूमी धर्मप्रसारासाठी त्यांना फार मानवली. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती (इ.स. ११४२ ते १२३६) हा त्यांचा भारतातील पहिला मोठा धर्मप्रसारक. त्याचा राजस्थानातील अजमेरचा दर्गा आजही अत्यंत लोकप्रिय असून, सर्व पंथांचे मुसलमान व हिंदू लोकसुद्धा तिथे नवस करतात. हे सुफी संत चमत्कार करतात असे मानले जात असे. इतिहासात या संतांना राजाश्रयही मिळत गेला. खरे तर सुफी संतांच्या दग्र्याच्या पूजा, नवस व ताबूतांच्या मिरवणुका यांना कट्टर मुसलमानांचा विरोध असूनही, भारतात मात्र या गोष्टी, इस्लामी संस्कृतीचा भाग बनलेल्या आहेत.
सुफी संत भारतात येण्यापूर्वी आणि नंतरही त्यांच्यात पुष्कळ पंथ आणि उपपंथ निर्माण झाले होते व त्यात काहींनी अद्वैत मत राखले होते, तर दुसरे काही विरुद्ध टोकाच्या द्वैत मताकडे वळले होते असे दिसते. मात्र या सर्व पंथोपपंथांपैकी कुणीही मोठे ‘धर्मसमन्वयवादी’ होते असे दिसत नाही. त्यांच्यापैकी भारतातील सुऱ्हावर्दी, नक्षबंदी असे काही पंथ तर, मुसलमान राज्यकर्त्यांनी हिंदू प्रजेला बळजबरीने मुसलमान केले पाहिजे असे त्यांना शिकवत होते व काही सुलतानांनी काही प्रकरणांत तसे केलेसुद्धा. ते सर्व राहो.
संत कबीर (इ.स. १४४० ते १५१८)
जन्माने बहुधा मुसलमान असलेला पण खराखुरा ‘धर्मसमन्वयवादी’ असलेला, उत्तर भारतात होऊन गेलेला एक लोकप्रिय महात्मा म्हणजे संत कबीर होय. कबीराने हिंदूचे वेद, कर्मकांड, जातीपाती व मूर्तिपूजा नाकारल्या, पण ईश्वरशरणतेवर भर दिला. तो रामभक्तही होता. देव देवळात नाही, दगडाच्या मूर्तीत नाही, तर तो प्रत्येकाच्या हृदयात आहे अशी शिकवण त्याने लोकांना दिली. मुसलमानांचा आणि हिंदूंचा असे दोन वेगळे ईश्वर नसून, सर्वाचा एकच ईश्वर आहे, असे त्याने सांगितले. हिंदूंच्या जातींबद्दल तो म्हणतो की, ‘एकाच ज्योतीपासून सगळे झाले तर कोण ब्राह्मण आणि कोण शुद्र?’ कबीरावर संत नामदेवांच्या विचारांचाही मोठा प्रभाव होता असे स्पष्ट दिसते. हे सारे महात्मे मानवतावादी होते व सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची त्यांची दृष्टी होती.
संत कबीराने उत्तर भारतात त्याच्या आयुष्यकाळात लोकांना भक्तिमार्ग शिकविला. खरे तर कबीराच्या काळापूर्वीच भारताच्या बऱ्याच मोठय़ा भागावर मुसलमानांची राज्ये होती व त्यांच्यापैकी काही सुलतान स्वत: धर्मवेडे होते किंवा धर्मवेडय़ा मुल्ला मौलवींच्या तंत्राने वागणारे होते. हिंदू धर्मीय जनतेचा विनाकारण छळ करणारे होते. त्यामुळे या दोन धर्मीय सामान्य जनतेत सामंजस्य निर्माण करणे, निदान तसा प्रयत्न करणे आवश्यक होते व तेच कार्य कबीराने केले. त्याने हिंदूंची मूर्तिपूजा नाकारली खरी, पण भक्तिमार्ग मात्र प्रेमपूर्वक स्वीकारला व शिकविला. कबीराच्या नंतर काही दशकांनी आलेल्या गुरू नानकांनीसुद्धा अशाच प्रकारचे धर्मसमन्वयाचे कार्य उत्तर भारतात केलेले आहे. मुसलमानांतील सुफी संतांच्या काही विचारांचा आणि हिंदूंतील भक्तिमार्गी संतांच्या शिकवणुकीचा या दोघांवर बराच परिणाम झाला असावा असे उघडच दिसते.
गुरू नानक (इ.स. १४६९ ते १५३९)
पंजाब प्रांतात जिथे मुसलमानांतील सुफी संत विचारांचा प्रभाव निर्माण झाला होता, तिथे काही लोक अंतर्मुख होऊन, दोन्ही धर्मातील आचारविचारांवर एकत्रित मनन करू लागले होते. त्यांपैकीच एक असलेल्या नानक या आदर्श आचरणाच्या चिंतनशील माणसाने, मुसलमानांचा एकेश्वरवाद आणि हिंदूंचे कर्मविपाक व पुनर्जन्म हे सिद्धांत एकत्र करून पण हिंदूंच्या चातुर्वण्र्याला व मूर्तिपूजेला विरोध करून, समतेवर आधारित शीख हा धर्म स्थापन केला. या धर्माचे सुमारे दीड कोटी अनुयायी मुख्यत्वे भारतात व अलीकडच्या काळात कामधंद्यासाठी जगात इतरत्रही पसरलेले आहेत. गुरू नानक हा शीख धर्माचा पहिला गुरू आणि गुरू गोविंदसिंह हा दहावा व शेवटचा गुरू होय. या दहा गुरूंची आणि नामदेवादी इतर संतांची वचने एकत्र करून त्यांच्या गुरू ग्रंथसाहिबाची रचना झालेली आहे. हा ग्रंथ गुरुमुखी, मुलतान, पर्शियन, प्राकृत, हिंदी व मराठी अशा सहा भाषांत असून, त्यात शीखेतर संतांची वचनेही आहेत. हाच त्यांचा धर्मग्रंथ. याहून वेगळा धर्मग्रंथ ते मानीत नाहीत. शीख धर्मात स्त्रियांना समान वागणूक सांगितलेली आहे, जी मला वाटते इतर कुठल्याही धर्मात सांगितलेली नाही. न्याय व सत्यासाठी शिखांनी मरणाला नेहमी तयार असावे अशी या धर्माची आज्ञा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने ‘श्रम’ करून उदरनिर्वाह करावा अशी गुरुनानकांची शिकवण आहे. राम, कृष्ण, अल्ला ही सर्व एकाच ईश्वराची वेगवेगळी नावे आहेत असे नानक म्हणत. या धर्मात बसवेश्वरांच्या धर्माप्रमाणे श्रमाला प्रतिष्ठेचे स्थान आहे. काही लोक शीख धर्माला इस्लामचा काहीसा प्रभाव असलेली पण ती हिंदू धर्म सुधारणेचीच चळवळ आहे असे मानतात. शीख धर्माची मूलतत्त्वे थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील.
१) या धर्मात एकेश्वरवादावर भर आहे. २) हा एकमेव सर्वशक्तिमान ईश्वर जगाचा निर्माता, सांभाळकर्ता व नाशकर्ता आहे. या धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा आहेत, पण ते ईश्वरनिर्मित आहेत, स्वयंभू नव्हेत. ३) जग हे ईश्वराचे, त्याच्या इच्छेने झालेले आविष्करण असून त्याच्या पलीकडेही तो उरलेला आहे. म्हणजे ईश्वर जगाहून श्रेष्ठ आहे. ४) ईश्वर, जग व त्यातील बदल हे सर्व सत्य आहेत. ईश्वर सर्व गुणांचा सागर आहे. त्याला कशाचीही कमतरता नाही व तो ‘अवतार’ घेत नाही. ५) मनुष्याने ‘संन्यास’ न घेता, शिस्तबद्ध संसारी (ऐहिक) जीवन जगावे. ६) मानवी मन व आत्मा आध्यात्मिक व श्रेष्ठ असून ते स्वार्थाने मलिन होतात. हा दुष्ट स्वार्थ टाकून तुम्ही शुद्ध व्हा. ७) जिवाला कर्मफलसिद्धांत व पुनर्जन्म आहेत. सत्कृत्ये व खऱ्या मनाने केलेली ईश्वरभक्ती यामुळे त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटका होते व ईश्वराशी तादात्म्य मिळते. आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो किंवा त्याच्यासारखा होतो. दोन्ही अर्थ. ८) मनापासून केलेले नामस्मरण, भजन व कीर्तन ही आवश्यक सत्कृत्ये होत. ९) मुक्तीसाठी ईश्वरकृपा आवश्यक व त्यासाठी गुरूचे मार्गदर्शन. १०) मानवी दु:ख हे अज्ञान व मोहामुळे उत्पन्न होते. आपल्या दु:खाला ईश्वर कारण नाही. पण कधी कधी तो आपल्या भल्यासाठी दु:ख देतो. ११) शीख धर्माचा मूर्तिपूजा, जातिभेद, उच्चनीचता, तीर्थयात्रा आणि सर्व बाह्य़ दांभिक उपचार यांना कडाडून विरोध आहे. १२) शीख धर्मात गुरू नानक, गुरू अर्जुनसिंह, गुरू गोविंदसिंह आणि त्यांचा धर्मग्रंथ ‘ग्रंथसाहिब’ यांना फार मान आहे. १३) ‘सत्नाम अकाल’ म्हणजे ‘ईश्वर कालातीत आहे’ ही शीख धर्माची प्रमुख घोषणा आहे.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !