ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे स्वाभिमानी नेते राजू शेट्टी यांनी भाजपशी निवडणुकीच्या तोंडावर ‘सोयरीक’ केली आणि त्यांचा पक्ष भाजपचा ‘पाव्हणा’ झाला. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवारांच्या राष्ट्रवादीशी असलेले हाडवैर, हेच या सोयरिकीचे निमित्त. कारण, साखर उत्पादक पट्टय़ातील मतदारसंघांवर आणि तेथील साऱ्या साखर कारखान्यांवरही राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांची पकड आणि त्यामुळे, या भागातील राजकारणावरही राष्ट्रवादीचाच वरचष्मा. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपच्या ‘सोयरिकी’मागचा हा समान दुवा आता लपून राहिलेला नाही. राष्ट्रवादी आणि भाजप हे मित्र नाहीत, हे विधानसभा निवडणुकीनंतरच्या पाठिंबा नाटय़ानंतर स्पष्ट झाले आहेच. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या खच्चीकरणासाठी हत्याराच्या या शोधात असलेल्या भाजपचे राजू शेट्टींच्या पक्षाशी सूत जुळले. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भाजपशी ‘महायुती’ करूनही त्यांच्या हाती पुरेसे यश आले नाहीच, पण राष्ट्रवादीला शह देण्यात मात्र स्वाभिमानीचा भाजपला उपयोग झाला. पण अजूनही भाजपचे नेते केवळ मंत्रिमंडळ- विस्ताराची गाजरेच मित्रपक्षांना दाखवत राहिल्याने, राजू शेट्टींचा स्वाभिमान जागा होणेही सहाजिकच होते. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर लगोलग राजू शेट्टींनी उसाला रास्त भाव देण्यास साखर कारखान्यांना भाग पाडावे अशी गळ घातली व त्यासाठी महिन्याची मुदतही दिली. ती उलटल्यानंतरही सरकारने फारसे काही केले नाही, हेच दिसत असताना राजू शेट्टी सरकारविरोधात उभे राहण्यास कचरतात का, अशी शंका व्यक्त होऊ लागली. अशा दुहेरी कोंडीत सापडल्यानंतर, अनुयायांचा विश्वास सांभाळायचा, की सत्ताधाऱ्यांचा अनुनय करायचा असा दुहेरी पेच निर्माण होणारच. राजू शेट्टींना बहुधा याच पेचाने पछाडले. गेल्या नोव्हेंबरात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊनदेखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दर देण्यात साखर कारखानदार टाळाटाळ करीत असल्याचा आणि सरकार मूग गिळून बसल्याचा आरोप करीत अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात साखर आयुक्तालयावर चाल केली, आणि मोडतोड करून संताप व्यक्त केला. साखर कारखान्यांच्या विरोधात राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्याने, आता राष्ट्रवादी साखरसम्राटांची कोंडी करण्याची संधी भाजप सरकारलाही आपोआप मिळाली आहे. साखर कारखानदारीत भ्रष्टाचार असताना सरकार काहीच कारवाई करत नाही, असा आरोप करीत भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्वाणीचा इशाराही राजू शेट्टींनी दिल्याने, पुढचे पाऊल टाकण्याची तयारी भाजप सरकारला सोपी झाली आहे. राष्ट्रवादी साखर कारखानदारीच्या मुसक्या आवळायला राजू शेट्टींच्या आक्रमक आंदोलनामुळे निमित्त मिळाले आहे. येथपर्यंत तर सारे भाजपच्या मनासारखे झाले आहे. पाव्हण्याच्या काठीने विंचू मारावा, असा संदेश देणारी एक म्हण ग्रामीण महाराष्ट्रात प्रचलित आहे. राजू शेट्टींचे आंदोलन याच न्यायाचे प्रात्यक्षिक रूप असावे. ते यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांचा अशी शेट्टींची प्रतिमा उजळ होईल, आणि राष्ट्रवादीला झटका देण्यासाठी राजू शेट्टी या ‘सोयरिकीतल्या पाव्हण्या’च्या काठीचा उपयोग होईल, असा दुहेरी डाव भाजपने केला आहे. तेव्हा स्वाभिमानीने पत्करलेला हिंसक मार्ग योग्य की अयोग्य, वगैरे शहरी चर्चाना काही अर्थ उरत नाही. शेवटी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्षही ग्रामीण भागातून, शेतकऱ्याच्या घरातूनच आले आहेत..