राजकारणाचा खेळ करायचा आणि खेळात राजकारण करायचे, यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार सुरेश कलमाडी यांनी क्रीडा क्षेत्रातील शेवटचे सत्तापदही आता गमावले आहे. गेल्या काही दशकांत खेळामध्ये राजकारण्यांनी जी घुसखोरी केली आहे, त्यामुळे खेळाचा खेळखंडोबा होऊ लागला आहे. मग ते हॉकी असो, क्रिकेट असो की अ‍ॅथलेटिक्स. सगळय़ा क्रीडा संघटनांमध्ये राजकारण्यांनी सत्तास्थाने काबीज करून तेथेही भ्रष्ट कारभाराला चालना देण्यात हातभार लावला आहे.  कलमाडी यांनी क्रीडा क्षेत्रात गेली काही वर्षे जी अर्निबध सत्ता उपभोगली, त्यातूनच भ्रष्टाचाराचा उगम झाला आणि राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने तो जगासमोर आला. आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदाची सत्ता उपभोगल्यानंतर त्यांनाही या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. १९७८ मध्ये राजकारणात आल्यानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये आपल्याला सत्ता गाजविण्याकरिता भरपूर संधी आहे हे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीतून सुटले नाही. मिठास वाणी, लोकांकडून कामे करवून घेण्याची शैली व एकाधिकारशाही याच्या जोरावर त्यांनी हळूहळू राज्य व त्यानंतर राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात आपले पाय मजबूत केले. १९८९मध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली आणि तेव्हापासून भारतीय क्रीडा क्षेत्रात त्यांची सद्दी सुरू झाली. २००६पर्यंत ते या महासंघाच्या अध्यक्षपदी होते. २००६नंतर त्यांना या महासंघाचे आजीव अध्यक्ष करण्यात आले. देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च संघटना असलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाची (आयओए) सत्ता आपल्याला मिळवायची असेल तर विविध खेळांच्या पदाधिकाऱ्यांशी जवळीक निर्माण केली पाहिजे. हे ओळखूनच राजकीय क्षेत्रातील बडय़ा बडय़ा व्यक्तींबरोबर ऊठबस असल्यामुळे केवळ अ‍ॅथलेटिक्स नव्हे तर अन्य खेळांच्या राष्ट्रीय संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी दृढ संबंध निर्माण केले. त्यामुळेच त्यांनी १९९६मध्ये आयओएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष बी. शिवांथी आदित्यन यांचा पराभव केला. २०१२पर्यंत त्यांनी हे अध्यक्षपद स्वत:कडे राखण्यात यश मिळविले. राजकीय समंजसपणा क्रीडा क्षेत्रातही लागू करून कलमाडी यांनी आपल्या खास शैलीत आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना देशपातळीवर रोखू शकणारे कुणी नव्हते. त्यामुळे भारतात ऑलिम्पिक भरवण्याचे गाजर दाखवून कलमाडी यांना केंद्रीय सत्तेच्या जवळ जाण्यात यश मिळाले. राष्ट्रकुल स्पर्धा ही त्याची रंगीत तालीम आहे, असेही ते सांगू लागले. तेथील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात जाऊन आल्यानंतरही आशियाई अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला विजय होईल, असे वाटणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनातील विहार होता. आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघ व आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ या दोन्ही संघटनांवर काम करताना त्यांनी अनेक देशांच्या प्रतिनिधींना आपलेसे करून घेतले होते. त्याचा उपयोग या निवडणुकीत होईल, असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात सात मते बाद करून मतदारांनी आपला रोख स्पष्ट केला आहे. कलमाडी यांचा हा पराभव म्हणजे उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी आहे. क्रीडाक्षेत्रातील पायाभूत काम करायला आता वेळ मिळेल, ही कलमाडी यांची प्रतिक्रिया त्यांनी आजवर काय केले नाही, हेच दर्शवणारी आहे.