सूरक्षेत्राचा व्यापार व त्याचे कुरुक्षेत्र करणारे राजकारण यामागे खेळ असतो मानवी भावनांचा. तो समजून घेतला तर दोहोंच्याही आहारी न जाता मानवी कल्याणाची त्यापलीकडील ओढ आपण समजून घेऊ शकतो..
आशा भोसले यांचे सूरक्षेत्र आणि त्याला झालेल्या विरोधाने आठवडाभर माध्यमांना चांगले खाद्य पुरविले. वाद घालायला काहीतरी विषय हवा ही फक्त माध्यमांची गरज नसते, ती सामान्य माणसाचीही असते. वाद घालण्याचा खेळ माणसाला आवडतो. तो कधी कधी हाताबाहेर जातो व त्यातून दंगलीसारख्या घटना घडतात हे खरे असले तरी वादाची सवय सुटत नाही. वाद, गॉसिप ही मानसिक गरज आहे. माध्यमे त्यावर पोसली जातात इतकेच.
सूरक्षेत्राचा वाद माध्यमांतून रंगविला गेला तो राजकीय वाद म्हणून. या वादानंतर झालेल्या तडजोडीकडेही राजकीय दृष्टीनेच पाहिले गेले. त्यामागचे आर्थिक हितसंबंधही उलगडून दाखविण्यात आले. राजकारण व अर्थकारण या वादामागे होते यात शंकाच नाही, परंतु बारकाईने पाहिले तर हा वाद माणसात खोल रुजलेल्या उदारमतवाद व पुराणमतवाद या दोन प्रवृत्तींमधील होता. इथे एक बाब कटाक्षाने लक्षात ठेवली पाहिजे की, चांगले व वाईट अशा अर्थाने या प्रवृत्तींकडे पाहिलेले नाही. माणसाला कृती करायला लावणाऱ्या प्रेरणा म्हणून पाहिले आहे. यातील एक प्रवृत्ती स्वातंत्र्याची अपेक्षा धरते तर दुसरी संयमाचा आग्रह धरते. स्वातंत्र्य व संयम यांतील हा संघर्ष स्वार्थासाठी झालेला नाही, मात्र त्यामागचा व्यापार व राजकारण हे स्वार्थासाठी आहे. हा फरक ध्यानात ठेवला पाहिजे.
अर्थात कधी स्वातंत्र्याचा आग्रह हा स्वैराचारात होतो. अमली पदार्थाचे सेवन, मुक्त लैंगिक संबंध ही यातील काही उदाहरणे. संयमाची जागा काही वेळा दडपशाही घेते. मुस्लीम व आफ्रिकी देशांमध्ये याची अनेक उदाहरणे सापडतात. लोकशाहीवादी देशात मात्र अशा वादांमागील खरी प्रेरणा ही स्वातंत्र्य व संयम हीच असते.
स्वातंत्र्य व संयम हे फक्त भारतात समोरासमोर ठाकलेले नाहीत. रशिया, ब्रिटनमध्ये अशा घटना घडत आहेत. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारामध्ये तर याच दोन प्रवृत्तींचा तिखट संघर्ष होणार आहे. ओबामा हे उदारमतवादाचे प्रतिनिधित्व करतात तर मिट रोम्नी हे पुराणमतवादाचे. अर्थात हे स्थूल वर्गीकरण झाले. पण डेमोक्रॅटस् व रिपब्लिकन यांच्या अधिवेशनातील भाषणे पाहिली तर ही वैचारिक झटापट सहज लक्षात येईल.
उदारमतवाद चांगला आणि पुराणमतवाद वाईट असे सर्वसाधारणपणे मानले जाते. उजवे गट हे पुराणमतवादी मानले जातात. प्रस्थापित चौकट त्यांना मोडायची नसते. आपले कोण व परके कोण याची स्पष्ट व्याख्या ते करतात व परक्यांना सवलती देण्यास विरोध करतात. धर्मावर त्यांचा विश्वास असतो. आर्थिक क्षेत्रातही ते प्रस्थापित व्यवस्थेच्या बाजूने असतात. अर्थातच या गटांवर माध्यमांतून जोरदार टीका होते.
डावे गट उदारमतवादी मानले जातात. ते शोषणाच्या विरुद्ध असतात. महिलांच्या हक्कांचा आग्रह धरतात. अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची काळजी घेतात. कल्याणकारी योजनांचा पुरस्कार करतात. त्यासाठी कर वाढविण्याची शिफारस करतात. जगातील माध्यमे बहुधा या गटांच्या बाजूची असतात.
भारतात ढोबळमानाने हे वर्गीकरण उजवा संघ परिवार व डावा कम्युनिस्ट परिवार असे करता येईल. काँग्रेस सोयीनुसार दोन्हीकडे झुकते वा दोघांच्यात झुंज लावून सत्ता शाबूत ठेवते. काँग्रेसमध्येही उजवे बरेच असले तरी काँग्रेसच्या चेहऱ्यावर डाव्या विचारांची झाक राहील याची दक्षता घेतली जाते. कारण अल्पसंख्याक हे नेहमी डावीकडे असतात. भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र हेच दिसते.
माध्यमांतून या प्रवृत्तींचे चांगले व वाईट असे वर्गीकरण होत असले तरी मूलत: या प्रवृत्ती ही मानवी व्यवहारात काही व्यवस्था निर्माण करण्यासाठी जन्माला आल्या आहेत हे विसरले जाते. समाजात व्यवस्था राहावी, शांतपणे जगत उत्कर्ष करून घेता यावा या गरजेपोटीच उदारमतवाद व पुराणमतवाद निर्माण झाले. वैचारिक वादांत एकमेकांबद्दल दुष्ट चित्र रंगविले गेले तरी जीवनात सुव्यवस्था राहावी हीच इच्छा या दोन्ही प्रवृत्तींमागे असते.
मानववंशशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास यांचा एकत्रित अभ्यास करून समाजशास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षांतून ही बाब स्पष्ट होते. स्वत:च्या व समाजाच्या जीवनात व्यवस्था असावी अशी इच्छा ही नीतिमत्तेच्या आग्रहामागची प्रेरणा असते. ही नीतिमत्ता उजवे गट धर्मातून राबवू पाहतात तर डावे स्वातंत्र्यातून. मात्र चळवळ करणाऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली नसते, ती अशी की आजूबाजूला सर्व काही ठाकठीक असावे ही प्रेरणा माणसात उपजत, जन्मजात असते. कित्येक प्रयोगांतून शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, पाच प्रमुख नैतिक प्रेरणांचा संच घेऊनच प्रत्येक बालक जन्माला येते. त्या समाजाने शिकविलेल्या वा लादलेल्या नसतात तर निसर्गानेच त्या बहाल केलेल्या असतात.
या पाच प्रेरणा अशा- १) परस्परांचे कल्याण (केअर) २) एकमेकांना सहकार्य, प्रामाणिकपणा व वाजवीपणा (फेअरनेस, रेसिप्रोसिटी) ३) गटात सामील होणे व गटाशी निष्ठा राखणे (इन ग्रुप लॉयल्टी) ४) गटनेता वा अधिकारी व्यक्तीबद्दल आदर (अ‍ॅथॉरिटी, रिस्पेक्ट) ५) शुचिता, पावित्र्य (प्युरिटी, सँक्टिटी)
उजवे, डावे व मध्यममार्गी यांच्यामध्ये या पाच प्रेरणांची कमीअधिक तीव्रता कशी असते हे तपासण्याचा उद्योग ब्रायन नोसेक व जेसी ग्रॅहम यांनी जगातील पाचही खंडांत केला. त्यांना असे आढळून आले की, परस्परांचे कल्याण व प्रामाणिकपणा या प्रेरणा उदारमतवाद्यांमध्ये अत्यंत तीव्र असतात तर शुचिता, पावित्र्य यांची ओढ कमी असते (हे गुण लोकांच्या शोषणासाठी वापरले जातात असे त्यांचे म्हणणे असते). मात्र मध्यममार्गी लोकांमध्ये शेवटच्या तीन प्रेरणांची तीव्रता उदारमतवाद्यांपेक्षा वाढते. उजव्या गटांमध्ये शेवटच्या तीन प्रेरणा आणखीन तीव्र होतात. इतक्या की शुचितेला प्रामाणिकपणापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. यातील सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे परस्परांचे कल्याण ही पहिली प्रेरणा सर्वच गटांमध्ये पहिल्या स्थानावर असते आणि तिची तीव्रताही साधारण सारखीच असते. मानवाची ही सर्वात जमेची बाजू आहे.
परस्पर कल्याणाची प्रेरणा सोडून अन्य चार प्रेरणांमध्ये कशाला अग्रक्रम द्यायचा यावरून सूरक्षेत्र व कुरुक्षेत्र अशी संघर्षांला सुरुवात होते. डाव्या गटांचा नैतिक आग्रह हा पहिल्या दोन प्रेरणांवर आधारलेला असतो. अन्य तीन प्रेरणा त्यांना मानवाचे खच्चीकरण करणाऱ्या वाटतात. तर मध्यममार्गी व उजव्या गटांचा पाया पाचही प्रेरणांवर आधारलेला असतो. मात्र शुचिता व स्वातंत्र्य यामध्ये संघर्ष आला तर उजवे शुचितेच्या बाजूने असतात. आदर, निष्ठा, शुद्धता यांना परस्पर सहकार्यापेक्षा अधिक महत्त्व दिले पाहिजे असे उजव्यांना वाटते. लिव्ह इन रिलेशन, समलिंगी संबंध, घटस्फोट, पार्टी कल्चर यावरून भारतात उठणारे वाद पाहिले तर या पाच प्रेरणांमधील संघर्ष सहज लक्षात येईल.
उजव्यांच्या या विरोधालाही सबळ कारण आहे. ते माणसाच्या जडणघडणीत दडलेले आहे. पहिली बाब म्हणजे परस्पर कल्याण, प्रामाणिकपणा, वाजवी व्यवहार हे गुण सर्वानी एकाचवेळी पाळले तरच त्यावर समाजाचा विश्वास बसतो. एकाने जरी त्यामध्ये खोट आणली तरी समाजातील बहुसंख्यांचा त्यावरील विश्वास उडतो. एक नासका आंबा संपूर्ण आडी नासवतो.
दुसरी बाब म्हणजे स्वातंत्र्य माणसाला मुक्त करते. त्याच्यातील सर्जनशीलता जागृत करते. जगण्याला मौज आणते. हे खरे असले तरी स्वातंत्र्यामुळेच बंधने सैल होतात व सामाजिक विघटनालाही सुरुवात होते. सुव्यवस्था टिकवायची असेल तर बंधने आवश्यक असतात हे माणूस अनुभवातून शिकला आहे. सुव्यवस्थेसाठी लागणारे नियंत्रण हे शुचिता, निष्ठा, अधिकारी व्यक्तीविषयी आदर यांतून मिळते. शुचिता म्हणजे लैंगिक शुद्धता नव्हे तर काय घ्यावे व काय टाकावे याचे नियमन करणे. कौटुंबिक संबंधांपासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सर्वत्र शुचितेचे नियम अप्रत्यक्षपणे काम करीत असतात. धर्म या गोष्टी सहज देतो व म्हणून तो बहुसंख्यांना आकर्षित करतो. धर्म एक व्यवस्था लावून देतो. त्यामध्ये मौज नसते, पण स्थिरता असते. त्यामुळे माणसाला सुरक्षित वाटते.
भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये जास्तीत जास्त सहकार्य असावे, दोन्ही देशांनी एकत्र येऊन लढायांत खर्च न करता परस्परांचे कल्याण करावे ही इच्छा अनेकांच्या मनात असते. त्या इच्छेचे व्यापारीकरण करून सूरक्षेत्रसारखे कार्यक्रम तयार होतात, तर परस्पर कल्याणाचे स्वप्न चांगले असले तरी अशा सहकार्यातून, अतिरिक्त स्वातंत्र्यातून आपली सुरक्षा धोक्यात येणार नाही ना, सामाजिक विघटन होणार नाही ना, अशी धास्ती बहुसंख्यांच्या मनात असते. या धास्तीचे राजकारण करून काहीजण कुरुक्षेत्र उभे करतात. सूरक्षेत्र व कुरुक्षेत्रच्या निर्मात्यांना बाजूला काढून याकडे पाहिले तर यामागे चाललेला मानवी प्रेरणांचा खेळ आपल्याला दिसेल. त्यामागे एका बाजूला असलेली स्वातंत्र्य व परस्पर कल्याणाची तर दुसऱ्या बाजूची सुरक्षेची, स्थैर्याची ओढ आपल्या लक्षात येईल. मग आपण डाव्या किंवा उजव्या गटात सामील होणार नाही तर प्रसंग व काळ पाहून योग्य प्रेरणांची साथ घेऊ. कारण डावे व उजवे मिळूनच आपले मन बनले आहे.
आधार : समाजशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ जोनाथन हाइड यांचे संशोधन. नीतिमत्तेमागील मानसशास्त्र हा त्यांचा विशेष अभ्यासविषय आहे.