ग्रँडस्लॅम स्पर्धाची जेतेपदे गेल्या काही वर्षांत रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच या त्रिकुटाकडेच असतात. या त्रिकुटाची सद्दी मोडून काढण्याचा इंग्लंडचा अँडी मरे निकराने प्रयत्न करीत आहे. मात्र नोव्हाक जोकोव्हिचने अँडी मरेसारख्या लढवय्या खेळाडूवर मात करून सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हे करताना जोकोव्हिचने त्रिकूटच जेतेपदाचे खरे हकदार असल्याचे सिद्ध केलेच; पण या त्रयीतील रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांना मागे टाकून आगेकूच करण्यातही जोकोव्हिचने यश मिळवले. या तिघांपैकी फेडरर आता कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. फेडररच्या नावावर १७ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. मात्र वाढत्या वयानुसार जेतेपदाच्या शर्यतीपासून फेडरर दूर जात आहे. दुसरीकडे राफेल नदाल दुखापतींच्या फेऱ्यात अडकला आहे. ग्रँडस्लॅम जेतेपदांवरचा या द्वयीचा प्रभाव कमी होत असताना जोकोव्हिचने हे जेतेपद पटकावत स्वत:चा ठसा उमटवला आहे. फेडरर शैलीदार खेळासाठी ओळखला जातो. प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास करून, त्याला चुका करायला भाग पाडणे हे फेडररचे गुणवैशिष्टय़ आहे तर नदाल म्हणजे आक्रमणावर आधारित खेळ. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या सामन्यातही तितक्याच ऊर्जेने, त्वेषाने आणि कुठल्याही क्षणी पुनरागमन करू शकणे ही नदालची खासियत आहे. जोकोव्हिचने या दोघांच्या खेळातून काही चांगल्या गोष्टी टिपून सुवर्णमध्य साधला आहे. फोरहँड आणि बॅकहँड या दोन्ही मूलभूत फटक्यांवर त्याचे प्रभुत्व आहे. याव्यतिरिक्त ड्रॉप, क्रॉसकोर्ट, स्लाइस हे फटकेही तो आवश्यकतेप्रमाणे खुबीने उपयोगात आणतो. जेतेपदापर्यंत पोहोचण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे काटक शरीर. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या सामन्यांसाठी लागणारा फिटनेस त्याने मोठय़ा मेहनतीने जपला आहे. जोकोव्हिचला अस्थमाच्या विकाराने ग्रासले होते. मात्र हा आजार आपली कारकीर्द धोक्यात आणू शकतो, हे लक्षात आल्यावर त्याने तात्काळ उपचार घेतले. रॉजर फेडररचा खेळ विम्बल्डनच्या ग्रासकोर्टवर बहरतो तर फ्रेंच खुल्या स्पर्धेची लाल माती हा राफेल नदालचा बालेकिल्ला. या दोघांप्रमाणे आता जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे हार्ड कोर्ट हे आपले माहेरघर बनवले आहे. सहापैकी चार ग्रँडस्लॅम जेतेपदे याच कोर्टवर त्याच्या नावावर आहेत. गेल्या वर्षीच्या जेतेपदासाठी जोकोव्हिचला नदालविरुद्ध ५ तास ५३ मिनिटे झुंज द्यावी लागली. यंदाही मरेने त्याला चांगलीच टक्कर दिली. मात्र लाडक्या मैदानावर जोकोव्हिचने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. मात्र त्याच वेळी अन्य स्वरूपाच्या कोर्ट्सवरही जोकोव्हिचने तेवढीच चांगली कामगिरी केली आहे हे लक्षात घ्यायला हवे. ऑस्ट्रेलियन, अमेरिकन आणि विम्बल्डन स्पर्धाची जेतेपदे नावावर असणाऱ्या जोकोव्हिचला आता ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करायचे आहे. यासाठी त्याला पुढच्या अर्थात फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद खुणावत आहे. एक विशिष्ट ग्रँडस्लॅम जेतेपद सलग तिसऱ्यांदा पटकावण्याचा विक्रम याआधी बियॉन बोर्ग, जॉन मॅकेन्रो, इव्हान लेंडल, पिट सॅम्प्रस, रॉजर फेडरर, राफेल नदाल यांच्या नावावर आहे. मात्र यापैकी कोणालाही ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक करता आलेली नाही. यावरूनच जोकोव्हिचच्या विक्रमाचे महत्त्व अधोरेखित होते. हार्ड, क्ले आणि ग्रास अशा तिन्ही कोर्ट्सचा स्वामी या उपाधीसह जोकोव्हिच ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या मांदियाळीत प्रवेश करायला आतुर आहे.