साधनेचा हेतू आत्मकल्याण, परमानंदाची प्राप्ती हा असला तरी ती प्रक्रिया अत्यंत दीर्घ आहे आणि सद्गुरूंच्या आज्ञेनुरूप जगल्याशिवाय पूर्णत्वास जाऊच शकत नाही. प्राथमिक टप्प्यावर मात्र साधनेचा हेतू मनाला, चित्ताला, बुद्धीला वळण लावून जगण्यातली भ्रामकता, अज्ञान, मोह यांचं भान आणणं हा आहे. ते भान टिकवणं आणि सद्गुरू बोधानुरूप जीवन जगण्याचा प्रयत्न करणं ही जीवनसाधना आहे. मनाला, चित्ताला, बुद्धीला वळण लावण्यासाठी मन, चित्त, बुद्धीला संस्कारित करण्यासाठी काही उपासना, मौन-उपवासादि नियम, स्तोत्र वा पोथ्यांचे पठण-पारायण यांचा निश्चितच उपयोग आहे. पण हे सारं सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय स्वत:च्या मनाच्या ओढीनं करण्यामागे देहबुद्धीच आहे. साईबाबांकडे एक रामदासी काही दिवस राहात होता. त्याच्या झोळीत अनेक पोथ्या होत्या. त्यांना तो फार जिवापाड जपत असे. कुणालाही हात लावू देत नसे. त्यातील विष्णुसहस्त्रनाम, अध्यात्म रामायण यांची तर पारायणावर पारायणं करीत असे. एकदा काही कारण काढून बाबांनी त्याला बाजारात पाठवलं आणि शामाला म्हणाले, ‘‘शामा त्या झोळीतलं ‘विष्णुसहस्त्रनामा’चं पुस्तक तुला ठेव आणि रोज ते वाचत जा.’’ शामा म्हणाला, ‘‘बाबा मला संस्कृत येत नाही आणि आता ते स्तोत्र वाचून काय करायचं आहे?’’ तरी बाबा पुन्हा म्हणाले, ‘‘नाही, आत्ताच ते पुस्तक घे आणि वाच.’’ शामाने ते स्तोत्र घेतलं आणि वाचण्याची धडपड करू लागला. काही वेळात तो रामदासी आला आणि शामानं आपलं पुस्तक घेतलेलं पाहून अत्यंत संतापला. बाबा म्हणाले, ‘‘अरे मीच त्याला ते पुस्तक घ्यायला सांगितलं आहे.’’ तो आणखीनच चिडून शामाला म्हणाला, ‘‘ठीक तर मग, मला त्या बदल्यात तू पंचरत्न गीता द्यायला पाहिजे.’’ शामा म्हणाला, एक काय मी तुला दहा गीता आणून देतो! आता साईसच्चरित्रातही हा प्रसंग आहे आणि त्यात शामाला काहीतरी नेम घालून द्यावा म्हणून बाबांनी हे केलं, असं म्हटलं आहे. आता याच प्रसंगातून दोन गोष्टी साधकासाठी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे इतक्या वेळा विष्णुसहस्त्रनाम वाचल्यानं त्या पठणाचा लाभ म्हणून बाबांजवळ पोहोचता आलं तरी तो बाबांना ओळखू शकला नाही. इतकंच नव्हे तर जी गीता सर्व मनोधर्माचा त्याग करून सद्गुरूला शरण यायला सांगते ती गीता त्यानं मागितली! तेव्हा छापील शब्दांतला भाव जर हृदयात उतरला नाही आणि केवळ शब्दांच्या टरफलांचीच गोडी लागली तर अशा अनंत कोरडय़ा शब्दांच्या उच्चारांनी काय साधणार आहे? उच्चारापाठोपाठ विचार आणि त्यापाठोपाठ आचार साधत नसेल तर काही उपयोग नाही, हे या प्रसंगातून जाणवतं. याउलट शामा! बाबांजवळ पोहोचलो आता आणखी स्तोत्रबित्रं कशाला, हा त्याचा अगदी सरळ प्रश्न. तरीही बाबा पुन्हा म्हणाले, वाच, तेव्हा तो वाचू लागला. तर मी जी काही उपासना करीत असेन त्यातून सत्याची जाण किती वाढली, याला महत्त्व आहे. शब्दज्ञान किती वाढले, याला नाही! शाब्दिक ज्ञानाची कामना अर्थात टरफलांची गोडीही वाईटच!