प्रपंचातली गोडी आटून परमार्थपथावर पावलं पडू लागली की अभावाचा त्याग होतो, संशयाचा त्याग होतो आणि अज्ञानाचा त्याग होतो! अभावाचा पोथीतला अर्थ नास्तिकपणा असा दिला आहे. शब्दार्थानुसार पाहिलं तर नास्तिकपणाचा त्याग होतो, मग संशयाचा त्याग होतो आणि मग अज्ञानाचा त्याग होतो, हा अर्थही बरोबर वाटतो. पण या अभावाचा वेगळा अर्थही आहे. आपल्या जीवनात पूर्णता असते का हो? नाही. जीवनात सदोदित आपल्याला कशाची ना कशाची तरी उणीव भासत असते, अपुरेपणा भासत असतो. हा अपुरेपणा, ही उणीव  हाच अभाव! आपलं जीवन अभावग्रस्त असतं. नेमकं काय मिळालं म्हणजे ही उणीव भरून निघेल, हेदेखील आपल्याला माहीत नसतं. श्रीगोंदवलेकर महाराज सांगत, ‘‘नेमकं किती मिळालं म्हणजे पुरे, हे माणसाला माहीत नाही आणि त्यामुळेच कितीही मिळालं तरी त्याला पुरेसं वाटत नाही!’’ तेव्हा जीवनातला अभाव कधीच संपत नाही. परमार्थपथावर खऱ्या अर्थानं पावलं पडू लागली ना की, हे जे काही तरी हवंसं वाटणं आहे, भौतिकाच्या उणिवेची चिंता आहे, अभावग्रस्त असण्याची चिंता आणि अभावग्रस्त होण्याची भीती आहे, तिचाच त्याग सहज घडला पाहिजे, असं समर्थ सांगतात. आता हा त्याग कोणत्या आधारावर घडतो? तर सद्गुरूंचा संग घट्ट असेल तर घडतो. सद्गुरू पाहून घेतील, हा साधकाचा भाव पक्व होतो. तो पक्व नसतो तेव्हाच संशय असतो! त्यांना सांगितलंय खरं, पण ते करतील का, हा संशय. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत, ‘महाराज, माझी अमक्या ठिकाणी बदली झाली आहे, ती रद्द करा’, अशी माझी आळवणी कुणी करतो. यात, तो सांगेपर्यंत त्याची बदली झाली आहे, हे मला माहीत नसतं, ही पहिली गोष्ट अध्याहृत आहे आणि जर मला माहीत असलीच तरी ती बदली मी होऊ दिली याचा अर्थ मला त्यातलं काही कळत नाही, हा दुसरा अध्याहृत अर्थ आहे! तेव्हा माझ्या जीवनातली प्रत्येक घडामोड त्याच्याच सत्तेनं होत असेल तर मग माझ्या देहबुद्धीच्या ओढीतून त्यानं अमुकच घडवावं, अशी आळवणी मी करीत राहाणं, हेच अज्ञान! तेव्हा एका अभावाचा त्याग झाला की त्यांच्यावरील संशयाचाही त्याग होतो, त्यांच्या स्वरूपाबाबतच्या अज्ञानाचाही त्याग होतो. हा त्याग शनै शनै म्हणजे हळूहळूच होतो. प्रसंगानुसार जसजसे अनुभव येतात त्यानुसार होतो. हा सूक्ष्म त्याग प्रापंचिक साधकासाठीही अनिवार्य आहे आणि प्रपंचाचा वरकरणी त्याग केलेल्या साधकासाठीही अनिवार्यच आहे. फरक एवढाच की सांसारिक भक्ताला बाह्य़त्याग करणं शक्य नसतं. त्याला घर-दार, मुलं-बाळं, आप्तस्वकीय यांच्यातच वावरावं लागतं. प्रपंच नसलेल्या साधकाकडून या बाह्य़ाचाही त्याग सहज होतो. सांसारिक भक्त असा बाह्य़त्याग करीत नाही खरे, पण त्याच्याकडूनही असा बाह्य़त्याग अनेकदा होतोच. नित्यनेम आणि उपासनेसाठी भौतिकातलाच वेळ काढावा लागतो! भौतिकातील वेळेतील काही भागांचा त्याग केल्याशिवाय तो वेळ साधनेकडे वळवता येत नाही. तेव्हा प्रापंचिक साधकालाही त्यागाच्याच महाद्वाराकडे नकळत जावेच लागते.