जगण्यातला संकुचितपणा नष्ट होऊन जगणं व्यापक होणं, हे सद्गुरूशिवाय केवळ अशक्य आहे. त्यासाठी सद्गुरूच्या बोधानुरूपच जगण्याचा अभ्यास हवा. यातूनच सद्गुरूमयता साधेल. अर्थात ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सद्गुरूच स्वत: माझ्या जीवनात माणसाच्याच रूपात येतात. जीवन जगत असताना परमात्म्याचं, शाश्वताचं अखंड स्मरण कसं राखता येतं, हे तेच त्यांच्या जगण्यातून शिकवतात. एकदा हा सद्गुरू जीवनात आला आणि त्याची खूण पटली की तो सांगेल त्यापेक्षा अधिक काही करावंस वाटता कामा नये किंवा त्याच्यापेक्षा अन्य कुणी आध्यात्मिक प्रगती साधून देईल, असा भ्रमही मनात उत्पन्न होता कामा नये. स्वामी स्वरूपानंद एकदा म्हणाले, ‘‘एका बिंदूने जर अमरत्व लाभत असेल तर अमृताच्या कुंभात बुडवल्यामुळे आणखी काही विशेष लाभ होण्याचा भ्रम कशाला?’’ (स्वामी म्हणे अमलानंदा, पृ. ८). अमरत्वासाठी अमृताचा एक बिंदूही पुरेसा आहे. तो हाती आला तर त्याकडे दुर्लक्ष करून अमृताचा कुंभ गवसावा, ही आस आणि त्यासाठीची धडपड कशाला? मग तो कुंभही मिळाला नाही अन् हा अमृताचा थेंबही चाखला नाही आणि आयुष्यही तसंच सरलं तर काय उपयोग? त्यामुळे सद्गुरू मला जे काही सांगतात आणि ज्या प्रमाणात सांगतात ते माझी परिस्थिती, शक्ती आणि तयारी पाहून सांगतात. मला झेपेल इतपतच सांगतात. एकदा मी ती उपासना, त्यांच्या बोधानुरूप आचरण सुरू केलं तर त्यातूनच माझी तयारी आणि शक्ती वाढत जाते. मग ते कर्म मी जर टाळलं तर ती माझीच आत्मिक हानी नाही का? त्यामुळे सद्गुरू लाभल्यावर जर मी कर्माचा कंटाळा केला तर माझ्यासारखा अडाणी मीच! आता हे ‘कर्म’ नेमकं कोणतं हो? स्वामींच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘‘प्रथम गुरुकृपा संपादन करावी. मग आपल्या मनात कसल्याही संकल्प-विकल्पास थारा न देता गुरुवचनावर अढळ व पूर्ण श्रद्धा ठेवून, अनन्यभक्तीने गुरुसेवा करून आपल्या आचरणाने गुरुच्या अंत:करणात आपल्याबद्दल प्रेमाचा ओलावा निर्माण करून त्याच्या कृपेस आपण पात्र असल्याचे सिद्ध करावे!’’ (स्वामी म्हणे अमलानंदा, पृ. ९, १०). किती व्यापक कर्म आहे हे! थोडक्यात पूर्ण शरणागत भावानं सेवाच यात अभिप्रेत आहे. आता ही सेवा नेमकी कशी आहे, तिची व्याप्ती काय आणि त्या सेवेने काय साधते, हे आपण ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ४७ ते ५१ या ओव्यांच्या चिंतनात अगदी तपशीलात पाहणार आहोतच. पण गुरुकृपा प्राप्तीसाठीचं स्वामींच्या शब्दांत वर दिलेलं ‘कर्म’ वाचून कुणी म्हणेल की, ‘‘हे कर्म जर पार पाडायचं असेल, सदोदित भगवद्चिंतनात आणि गुरूसेवेत जर रहायचं असेल तर मग आमची व्यावहारिक आणि प्रापंचिक कर्तव्यं पार पाडता येणार नाहीत.’’ तर अशा साधकाला स्वामींचाच आधार घेत सांगावं लागेल की, मी त्याच परमात्म्याचा अंश आहे ही व्यापकत्वाची, शाश्वताची जाणीव टिकविण्याचा अभ्यास अशाश्वत, संकुचित जिणं जगत असतानाच केला पाहिजे. त्यासाठी प्रापंचिक कर्तव्यं सोडण्याची काहीच गरज नाही. उलट त्या प्रामाणिक अभ्यासासाठी हा प्रपंचच माझ्या मदतीला येईल!