आता अ-स्व-स्थ असलेले आपण स्व-स्थ म्हणजे स्वरूपात स्थित कसे होणार? त्यासाठीची युक्ती अर्थात योग कोणता? स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘चित्त हे नेहमीच आपल्या शुद्ध स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असते, पण इंद्रिये त्याला बाहेर खेचीत असतात. चित्ताचा संयम करणे, त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीला आळा घालणे आणि त्याला त्या चिद्घन पुरुषाकडे परत फिरावयास लावणे हीच योगाची पहिली पायरी आहे. यामुळेच ते (चित्त) उचित मार्गाने वाटचाल करू शकेल’’ (राजयोग, पृ. १११). म्हणजे इंद्रियांची बाह्य़ाकडे असलेली धाव किंवा अधिक अचूकतेनं सांगायचं तर इंद्रियांच्या साह्य़ानं बाह्य़ जगाकडे असलेली मनाची धाव कमी करणं, बहिर्मुख प्रवृत्तीला आत वळवणं आणि चित्ताचा संयम अर्थात चित्तवृत्तींचा संयम करणं हीच या योगाची पहिली पायरी आहे. यातूनच चित्ताचं समत्व साधणार आहे. पण ते माझ्याच ताकदीनं साधणार आहे का? मन आणि बुद्धी यांचं ऐक्य सोपं आहे का? त्यासाठी स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे ‘चित्ताला चिद्घन पुरुषाकडे परत फिरावयास लावलं’ पाहिजे. आता हा चिद्घन पुरुष म्हणजे आत्मा हे खरं तरी आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारा सद्गुरू हाच खरा चिद्घन पुरुष नाही का? तेव्हा सद्गुरूंच्या आधाराशिवाय चित्ताच्या समत्वाची ही प्रक्रिया शक्य नाही. आता हे चित्त चार रूपांत व्यक्त होत असतं असं स्वामीजी सांगतात. यानुसार ते एकतर क्षिप्त (विखुरलेलं) असतं, मूढ (अज्ञानानं व्याप्त) असतं, विक्षिप्त (गोळा झालेलं) असतं किंवा एकाग्र असतं. आता आपण विक्षिप्त या शब्दाचा अर्थ नकारात्मकच मानतो. एखादा माणूस विक्षिप्त असतो तेव्हा तो तऱ्हेवाईक असतो, कुणाची पर्वा न करणारा असतो, हेकेखोर असतो, असं आपण मानतो. विक्षिप्तचा खरा अर्थ मात्र सकारात्मक आहे आणि तसा विचार केला तर ज्याचं चित्त केवळ परमतत्त्वातच गोळा होऊ पाहातं त्याला भौतिक जगातील लोक तऱ्हेवाईकच मानतात. अर्थात लोक आपल्याला आत्ताच तऱ्हेवाईक मानत असतील तर आपण योगात प्रगती केली आहे, असा गैरसमज मात्र करून घेऊ नका! असो, विनोदाचा भाग सोडून द्या.   स्वामीजी सांगतात, ‘‘या चार अवस्थांत मनही चार वेगवेगळी रूपे धारण करीत असते. पहिल्या म्हणजे विखुरलेल्या वा क्षिप्त अवस्थेत मन चहूकडे विखुरलेले असते. या अवस्थेत कर्मवासना म्हणजे कर्म करण्याची इच्छा प्रबल असते. या अवस्थेत मनाची प्रवृत्ती सारखी सुख आणि दु:ख या रूपांत अभिव्यक्त होण्याची असते. त्यानंतर मूढ अवस्था ही जाडय़ाची वा तमोगुणात्मक असते. ही माणसाला केवळ दुसऱ्यांचं अनिष्ट करण्यास प्रवृत्त करते. मनाची विक्षिप्त अवस्था ही की जिच्यात मन आपल्या केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करीत असते. टीकाकारांच्या मते मूढावस्था ही असुरांची तर विक्षिप्त अवस्था ही देवांची स्वाभाविक अवस्था होय. मन ज्या वेळी एकाग्र बनण्याचा प्रयत्न करते त्या वेळच्या अवस्थेला एकाग्रावस्था म्हणतात आणि चित्ताची ही एकाग्रावस्थाच आपल्याला समाधीप्रत घेऊन जाते’’ (राजयोग, पृ. १११ व ११२).