कीर्तनाच्या निमित्तानं स्वामींनी आपल्या मित्राशी, पटवर्धन मास्तर यांच्याशी सलगी वाढवली. त्यानंतर प्रदीर्घ पत्राद्वारेही स्वामींनी त्यांच्याशी संवाद साधला. अशाच एका पत्रातील काही भाग आपल्यासाठी प्रेरक आहे. स्वामी लिहितात, ‘‘आपण कित्येक वेळा एखाद्या गोष्टीत इतके दंग होऊन जातो की आपली वृत्ती प्रकृतीशी तादात्म्य पावते. ही स्थिती अर्थातच स्वरूपाचे स्मरण होईपर्यंत टिकते.. भजन चालू असते, म्हणजे भजनाची जाणीव (म्हणजे आपण उपासना करीत आहोत ही जाणीव) आपणाला असते; (पण त्याच जोडीला) आणखी एका विषयाकडे मन वेधून राहाते. हा विषय नेहमी एकच नसतो तर क्षणोक्षणी त्यात स्थित्यंतरही होऊ शकते.. एकाच वेळी दोन ठिकाणी मन राहाते. त्या दोहोंपैकी सोहंकाराकडे जाणीव ही एक गोष्ट असावी लागते.. तेव्हा स्वरूपाची जाणीव ठेवून इतर गोष्टींकडे लक्ष पुरविणे हीच पायरी आपल्याला स्वच्छ आणि प्रज्वल केली पाहिजे. हीच स्थिती अखंड राहीपर्यंत याच मार्गानं गेलं पाहिजे.’’ साधना करीत असतानाही प्रपंचाचं विस्मरण झालेलं नसतं. कधीकधी प्रापंचिक विषयाचा विचार मनात येताच मन त्याच्याशी इतकं तादात्म्य पावतं की परमार्थाचं विस्मरण होऊन जातं. परमार्थाची आठवण आल्यावर मात्र मन पुन्हा साधनेकडे वळतं. तरी काय होतं? आपण साधना करीत आहोत, ही जाणीव मनाला असतेच. अर्थात मन साधनेत स्वत:ला पूर्ण विसरलं नसतं. मी साधना करीत आहे, मी जप करीत आहे, ही जाणीव असल्यानं त्यात कर्तेपणाचा वासही उपासनेला असतो. या जाणिवेसोबतच आणखीही एक जाणीव मनाला असते ती अर्थातच प्रापंचिक विषयाची असते. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे तो विषय क्षणोक्षणी बदलताही असतो. जप चालू आहे आणि आठवलं की अमक्या माणसाशी परवा असं असं भांडण झालं होतं. झालं! मग जपही चालू आहे आणि त्या माणसाबद्दलचे विचारही. ते विचार दुरावतात तोच आठवतं, परवा अमुक ठिकाणी जायचं आहे. मग जप चालू असतानाच जिथं परवा जायचं आहे तिथं काय काय होईल, याचे विचार सुरू होतात. तर असे विचारविषय बदलत असतात पण मन निर्विचार कधीच होत नाही. म्हणजेच उपासनेची जाणीव आणि प्रपंचाची जाणीव, या दोन्ही जाणिवा एकाचवेळी मनात असतात. स्वामी सांगतात त्याप्रमाणे मनात दोन विचार सुरू असले तरी त्यातला एक विचार परमार्थाचा असतो, उपासनेचा असतो एवढं तरी समाधान आहे. दोन्ही विचार प्रपंचाचे नसतात, हा तरी दिलासा आहे. तेव्हा प्रपंचाचे विचार पूर्ण सुटणार नाहीत पण मनानं परमार्थाचा विचार सोडू नये, हा अभ्यास दृढ करायला स्वामी सांगतात. बरं साधकासमोर आणखी एक पेच असतोच. स्वामी सांगतात, ‘‘होते काय की भजन (साधना) जास्तीत जास्त व्हावे अशी मनाची तळमळ फार! आणि भजन भरपूर झाले तर कसा अप्रतिम आनंद अनुभवता येईल, याची कल्पनाही डोळ्यांसमोर असते. परंतु प्रत्यक्ष आचरण मात्र मनाजोगे होत नाही! म्हणजे मुद्दाम भजनाला बसले तर तितकी गोडी वाटत नाही!’’