स्वरूपप्राप्तीचा ध्यास ज्याच्या मनात उत्पन्न झाला आहे आणि त्यासाठी जो धडपडत आहे, तोच खरा साधक आहे. अशाश्वतावर पूर्ण विश्वास आणि शाश्वत परमात्म्याबाबत साशंकता, या एकमात्र अवगुणाचा त्याग ज्याला साधला आहे, तो साधक. अशाश्वताची ओढ ज्याच्या मनात उरलेली नाही आणि ज्यानं सद्गुरूचा आधार घेतला आहे, त्यांच्या बोधानुरूप जगण्याचा जो प्रयत्न करीत आहे, तोच खरा साधक. समर्थ सांगतात, ‘‘प्रवृत्तीचा केला त्याग। सुहृदांचा सोडिला संग। निवृत्तिपथें ज्ञानयोग। साधिता जाला।। सावध दक्ष तो साधक। पाहे नित्यानित्य विवेक। संग त्यागूनि येक। सत्संग धरी।।’’ आजवर जगण्याची प्रवृत्ती काय होती? ती देहबुद्धीनुसार होती. भौतिकामागे धावण्याची होती. त्या प्रवृत्तीचा त्याग केला. सुहृद म्हणजे आप्तस्वकीय, असा अर्थ आहे त्याचप्रमाणे हृदयाशी जपलेल्या इच्छा, असाही अर्थ आहे. तर अशा हृदयाशी जपलेल्या इच्छांचा संग सोडला. प्रवृत्तीकडची ओढ खुंटली आणि मन निवृत्तीपर झालं. मग जगाच्या भ्रामकपणाचं शाब्दिक ज्ञान मावळून अनुभवसिद्ध ज्ञान त्याच्यात उत्पन्न होतं. मग नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, हे त्याला सहज समजतं. जे अनित्य आहे त्याचा संग धरण्याची ओढ संपते आणि जे नित्य आहे, सत्य आहे त्याचा संग घेतला जातो. अनित्याचा त्याग होतो आणि नित्याचा पूर्ण स्वीकार होतो. मग कुणाच्याही मनात शंका येईल, ती समर्थही सांगतात. समर्थ म्हणतात- ‘‘येथें संशय उठिला। निस्पृह तोचि साधक जाला। त्याग न घडे सांसारिकाला। तरी तो साधक नव्हे कीं।।’’ जो नि:स्पृह आहे, अनित्याचा, अशाश्वताचा पूर्ण त्याग ज्याला साधला आहे तोच साधक होत असेल तर मग अशाश्वताचा त्याग ज्यांना करता येत नाही, असा सांसारिक माणूस कधीच साधक होऊ शकत नाही, नव्हे का? त्यावर समर्थ सांगतात, ‘‘सन्मार्ग तो जीवीं धरणें। अन मार्गाचा त्याग करणें। संसारिका त्याग येणें। प्रकारें ऐसा।। कुबुद्धि त्यागेंविण कांहीं। सुबुद्धि लागणार नाहीं। संसारिकां त्याग पाहीं। ऐसा असे।। प्रपंची वीट मानिला। मनें विषयेत्याग केला। तरीच पुढें अवलंबिला। परमार्थ मार्ग।। त्याग घडे अभावाचा। त्याग घडे संशयाचा। त्याग घडे अज्ञानाचा। शनै शनै।। ऐसा सूक्ष्म अंतर्त्यांग। उभयतांस घडे सांग। निस्पृहास बाह्य़त्याग। विशेष आहे।। संसारिकां ठाईं ठाईं। बाह्य़त्याग घडे कांहीं। नित्यनेम श्रवण नाही। त्यागें विण।।’’ सन्मार्ग जो आहे तो स्वीकारायचा आणि अन्य मार्गाचा त्याग करायचा, हा संसारी माणसाचा त्याग आहे. सन्मार्ग कोणता हे कळणं आणि त्यावरून चालावंसं वाटणं, हे सुबुद्धीशिवाय शक्य नाही. मनात जोवर कुबुद्धी आहे तोवर ही सुबुद्धी उत्पन्न होणार नाही. त्या कुबुद्धीचा त्याग हा संसारी माणसासाठी मोठाच त्याग आहे. कुबुद्धी आणि कुमार्गानंच आजवर देहबुद्धी पोसली आणि तिच्या ओढीतूनच जीवन संकुचित ‘मी’केंद्रित झालं होतं. अशा स्थितीत प्रपंचाचा वीट मनाला कधी वाटलाच नाही. आता सुबुद्धीमुळे संसाराचं खरं रूप लक्षात येऊन प्रपंचातली गोडी आटू लागते. परमार्थाकडे पावलं पडू लागतात.