जेव्हा भक्ताचं जगणं म्हणजे भक्तीचं दिव्य साकार स्वरूपच बनतं, तेव्हा भगवंत त्याच्या पूर्ण अधीन होतो. शबरी, सुदामा आणि गोपालेर माँ यांच्या कथा आपण ‘पूर्ण-अपूर्ण’ व अन्य सदरांमध्ये पाहिल्या आहेतच. काय दिव्य चरित्रं आहेत ती! शबरीला अनुग्रह दिला म्हणून मातंग ऋषींचा आश्रम बहिष्कृत झाला. त्या जंगलात हा एकमेव आश्रम उरला. मातंगमुनींनी देह सोडताना शबरीला सांगितलं की, भगवान या झोपडीत येतील आणि तुला पूर्ण ज्ञान देतील. आपण शबरीची कथा ऐकतो की, तिनं कशी बोरं आणली होती, आश्रम कसा सुशोभित केला आणि दाराशी उभं राहून ती प्रभूची कशी वाट पाहात होती.. पण हे एका दिवसापुरतं नव्हतं! मातंग ऋषी गेल्यापासून ते प्रभू येईपर्यंत अनेक वर्षांचा हा रोजचा क्रम होता. सायंकाळ सरली की फळं ग्रहण करून ती झोपत असे. पहाटे पुन्हा वनातून ताजी फळं, बोरं आणायची असत. नंतरचा अख्खा दिवस प्रभूंची वाट पाहण्यात जात असे! तिच्या निमित्तानं प्रभूंनी नवविधा भक्तीचं ज्ञान दिलं आणि शबरीही पूर्ण स्वरूपात विलीन झाली. प्रभूंच्या ओढीनं द्वारकेत आलेल्या गरीब सुदाम्याकडे मूठभर पोहे होते. स्वत:हून ती पुरचुंडी खेचून प्रभूंनी ते पोहे ग्रहण केले आणि दिव्य भक्तीचा महाल त्याच्या जीवनात उभारला. लहानपणी लग्न होताच आठवडाभरात नवरा गेला. नंतरचं उपेक्षित वैधव्याचं जिणं एका मंदिरालगतच्या खोलीत कंठणाऱ्या अघोरमणी देवींनी कृष्णाच्या मूर्तीचंच आईपण स्वीकारलं. लोक त्यांना ‘गोपालेर माँ’ म्हणजे गोपाळची आई म्हणू लागले. दिवसातून एकदा स्वत:च्या हातानं रांधलेलं खावं आणि दिवस-रात्र जपात सरावी, हे त्यांचं आयुष्य. रामकृष्ण परमहंस यांच्या दर्शनाला एकदा त्या गेल्या आणि परमहंस त्यांच्याकडे सतत खायचं मागू लागले. दर भेटीत हीच खा-खा! कंटाळून त्यांनी ठरवलं, हा कसला साधू? याच्या भेटीला काही यायचं नाही! त्या रात्री जप सुरू असताना जाणवलं, शेजारी कोणीतरी आहे. पाहातात तो रामकृष्ण परमहंस! या अवेळी हे इथे कसे, असा प्रश्न मनात आला मात्र, रामकृष्णांच्या जागी लहानगा बाळकृष्ण दिसू लागला. गोपालेर माँ यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ‘‘मला खायला दे, दूध दे, लोणी दे..’’ असं तो बोबडय़ा स्वरांत सांगू लागला. ‘‘अरे, मी गरीब बाई, कुठून आणू दूध-लोणी..’’ असं म्हणत त्या स्वयंपाकाला लागल्या. रात्रभर लहानगा बाळकृष्ण अवतीभवती नाचत होता, बागडत होता आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षांव करताना गोपालेर माँ भान विसरून गेल्या होत्या. सकाळी गोपाळला कडेवर घेऊन त्या दक्षिणेश्वरी जायला निघाल्या तेव्हा रामकृष्ण अचानक रांगायला लागले! लोकांना कळेना, थोडय़ाच वेळात गोपालेर माँ धावत आल्या आणि रामकृष्णांना रडत विचारू लागल्या, ‘‘तुम्ही हे काय केलंत?’’ तोच कडेवरचा बाळकृष्ण उतरला आणि धावत जाऊन रामकृष्णांच्या देहात घुसला! सर्वत्र तोच आहे, सद्गुरू रूपातही तोच आहे, सद्गुरूच सर्वत्र आहे, अशी भक्ताची परिपूर्ण भावतन्मय अवस्था होते तेव्हा जगण्यात अपूर्णता उरतेच कुठे? भक्त म्हणून तो शरीरानं वेगळा दिसतो एवढंच!