जो देहालाच सावली मानतो त्याच्या अंतरंगात देहबुद्धीच्या जाणिवांनुरूप द्वंद्वात्मक प्रतिक्रिया उमटतील तरी कशा? समर्थाची ती ओवी आहे ना? ‘‘जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रूची प्राप्त कैची!’’ शब्दन् शब्द कसा चपखल आहे पहा! जाणिवेला इथे माशी म्हटलं आहे. आपण खात असतो तेव्हा प्रत्येक क्षणी यात मीठच जास्त आहे, ही भाजी छान झाली आहे, यात तिखट हवं होत अशा किती जाणिवांच्या माशा घोंगावत असतात मनात! पण ज्यानं ही जाणिवेची माशीच खाऊन टाकली आहे त्याला त्या भोजनात काय रूची आहे हो? पोट भरायचं म्हणून तो खातो, जिभेसाठी, मनाच्या चोचल्यांसाठी नव्हे! आता हे जे खाणं आहे, हा जो आहार आहे तो काय केवळ मुखावाटेच होतो का? डोळ्यांनीही माझा आहार सुरू असतो, कानांनीही आहार सुरू असतो, त्वचेद्वारे स्पर्शानंही आहार सुरू असतो. आणि या प्रत्येक आहारात देहबुद्धीच्या जाणिवेची माशी घोंगावतच असते. तेव्हा जो देहालाच सावली मानतो त्याच्या मनात ही देहबुद्धीची माशीही उरणार नाही. मग द्वैतही भावणार आणि भोवणार नाही. त्याच्यात द्वैतभावच उरणार नाही आणि हा प्रपंच कसा आहे? तो यश-अपयश, निंदा-स्तुती, लाभ-हानी, संयोग-वियोग अशा समस्त द्वैतानंच भरला आहे. देहालाच सावली मानत असल्यानं सत्पुरुषाच्या अंतरंगावर या प्रपंचाचा प्रभाव कणमात्रही पडत नाही. स्वामी स्वरूपानंद यांचा जो अभंग आपण पहात आहोत त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणात स्वामी म्हणतात, ‘‘जन्म-मरणाचा संपला संसार। झाला साक्षात्कार स्व-रूपाचा।। कैचा देश-काळ विश्व चि केवळ। माया-मृगजळ कळो आलें।।’’ द्वैत संपलं मग जन्म आणि मरण, देश आणि काळ यातला भेदही लोपला. अहो ज्या विश्वात मी देहबुद्धीनं जखडून होतो, त्याचं मृगजळवत्, मायावत् स्वरूप मला उमगलं, इतकंच नाही तर त्या मायेपलीकडे याच विश्वात तोच परमात्मा कसा भरून आहे, याची जाणीव झाली. संसार कसा आहे? जन्म-मरणाचा आहे. इथे क्षणोक्षणी नवनवी इच्छा जन्म पावत असते. आपल्याच इच्छांचं मरणही आपल्याला भोगावं लागत असतं. इच्छा मारूनही जगावं लागत असतं. या द्वैतमय संसारात आपली स्थिती एकदेशी कधीच नसते. कालच्या आठवणी आणि उद्याची चिंता यात वर्तमानाकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. थोडक्यात काळाच्या पकडीत अत्यंत वेगानं संसाराचा प्रवाह वाहात असतो. जेव्हा स्व-रूपाचा खरा साक्षात्कार होईल तेव्हाच हा संसार ओसरेल! साधकाची ही स्थिती व्हावी, अशीच सद्गुरूंची इच्छा असते. ही स्थिती साधेल तर ती केवळ सद्गुरूमयतेनेच! सद्गुरू हा केवळ एकात विलीन असतो. त्यामुळे सद्गुरूमयतेमुळेच एकतानता, एकलयता, एकरसता जगण्यात येईल. त्या स्थितीचं वर्णन स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘नित्यपाठा’तील ७८व्या ओवीत आहे आणि तिच्या विवेचनाच्या वेळी आपण ते पाहूच. पण या स्थितीच्या प्राप्तीसाठी जो योग आचरायचा आहे त्याचं सूचन पुढील ३८व्या ओवीत आहे. ही ओवी सांगते, ‘‘देह तरी वरिचिलीकडे। आपुलिया परी िहडे। परि बैसका न मोडे। मानसींची!!’’