आता मनुष्य रूपातील परब्रह्मच असा हा सद्गुरू माझ्या जीवनात आला तर मी काय केलं पाहिजे? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवी तेच सांगते. ती ओवी, तिचा नित्यपाठातला क्रम, ज्ञानेश्वरीतला क्रम, प्रचलितार्थ व विवरण पाहू. ही ओवी अशी :
तें ज्ञान पैं गा बरवें। जरी मनीं आथी जाणावें। तरी संतां यां भजावें। सर्वस्वेंसीं।। ४७।।
(अ. ४ / १६५).
प्रचलितार्थ :  अरे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल, तर या संतांना सर्वस्वेकरून तू भजावेस.
विशेषार्थ : कर्म करतानाही कर्मफळाच्या साखळीतून सुटण्याचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूंना सर्वभावे शरण जाणं आणि त्यांच्या बोधानुरूप जीवन जगणंच अनिवार्य आहे.
विशेषार्थ विवरण:  स्वामी स्वरूपानंद यांनी या ओव्यांचा केलेला अभंगानुवाद असा- बरवें तें ज्ञान। प्राप्त व्हावें ऐसी। उत्कंठा मानसीं। असे जरी।। तरी सर्वभावें। भजावें संतांसी। माहेर ज्ञानासी। होती जे का।। (अभंग ज्ञानेश्वरी/ ओव्या २८७, २८८). आता या सद््गुरूंना ‘सर्वस्वे भजावे’ म्हणजे काय तसंच स्वामींनी वापरलेल्या ‘माहेर ज्ञानासी’ या शब्दयोजनेतील हृदयंगम असा गूढार्थ कोणता, ते नंतर पाहूच आधी हे ज्ञान नेमकं कोणतं, याचा विचार करू. ‘तें ज्ञान पैं गा बरवें’! आता हे कोणतं ज्ञान आहे हो? गेल्या भागापर्यंत आपण पाहिलं की अज्ञानजन्य अशा कर्मपसाऱ्यात आपण गुंतलो आहोत आणि त्याच जीवनात सहजकर्म करणारा सद्गुरू प्रकटतो. तेव्हा या कर्मपसाऱ्यातून सुटून खरी कर्तव्यर्कम करीत परमतत्त्वाशी ऐक्य पावण्याची दिव्य कला केवळ हा सद्गुरूच शिकवू शकतो. त्या श्रेष्ठ कलेचंच हे ज्ञान आहे! ही ओवी चौथ्या अध्यायातली आहे. पू. मामासाहेब दांडेकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘तिसऱ्या अध्यायात प्रत्येकाने कर्म केले पाहिजे, असा निर्णय भगवंतांनी केला आहे. परंतु कर्म आचरीत असता त्यात अज्ञानाचे जे बंध आहेत, त्या बंधांपासून सोडवणूक करून मोक्षापर्यंत जावयाचे असेल तर ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करणे जरूर आहे. शरीर, वाणी व मन याद्वारे जे विहित कर्म उत्पन्न होईल, ते एका ईश्वराच्या प्रीत्यर्थ करणे जरूर आहे. ही उपासना सांगण्यास इथे आरंभ झाला आहे.’’ थोडक्यात जीवनोपासनेचं हे ज्ञान आहे. मनुष्य जन्म ज्या मोक्षप्राप्ती व आत्मकल्याणासाठी लाभला आहे त्याचं हे ज्ञान आहे. कर्म, कर्मप्रभाव, कर्मफळ या साखळीतून सुटल्याशिवाय खरा मोक्ष आणि खरं आत्मकल्याण लाभणं शक्य नाही आणि महत्त्वाची गोष्ट ही की, त्यासाठी कर्म सोडावं लागत नाही! आता ही श्रेष्ठ कलाच नाही का? तेव्हा कर्म करतानाही कर्माच्या गुंत्यात न अडकण्याच्या कलेचं ज्ञान हेच ते दिव्य ज्ञान आहे! इथे याच ज्ञानाला ‘बरवे’ म्हटलं आहे. बरवे म्हणजे चांगलं, आपल्या सोयीचं, आपल्या खऱ्या हिताचं. कारण कर्माचा जसा गुंता असतो तसाच ज्ञानाभासाचाही गुंता असतो! त्यामुळे खऱ्या ज्ञानाचा आधार नसेल तर कर्माच्या गुंत्यातून सुटण्याचे प्रयत्न नुसते चुकीचेच होतील असं नव्हे तर आत्मघातकीही होतील!

 

balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!