‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पहिली ओवी ‘ॐ नमोजी आद्या’ ही आद्यगुरू भगवान शंकर आणि श्रीसद्गुरू स्वरूपाला वंदन करणारी आहे. त्यात ‘वेदप्रतिपाद्य’, ‘स्वसंवेद्य’ आणि ‘आत्मरूप’ ही श्रीसद्गुरूंची तीन लक्षणंही सांगितली आहेत. आता दुसऱ्या ओवीची निवड ही स्वामींनी आपल्या सद्गुरूंची नाममुद्रा उमटविण्यासाठी केली आहे. तसंच सद्गुरूंच्या कृपेनं काय साधतं आणि ती कृपा कशी प्राप्त होऊ शकते, याचा उल्लेखही या ओवीत आहे. आपल्या आकृतिबंधाचा क्रम लक्षात ठेवा- प्रथम स्वामी स्वरूपानंद यांनी संपादिलेली ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तली ओवी, कंसात ‘ज्ञानेश्वरी’त ती कोणत्या अध्यायात कितवी आहे त्याची नोंद, नंतर तिचा प्रचलित अर्थ, नंतर तिचा विशेषार्थ वा गूढार्थ आणि त्यानंतर त्या अर्थाचं विवेचन. काही ओव्यांत प्रत्येक शब्दाचाही गूढार्थ व्यापक असेल तर प्रचलित अर्थ मांडून होताच, एकदम ओवीचा पूर्ण गूढार्थ न सांगता, प्रत्येक शब्दाचा गूढार्थ आपण पाहणार आहोत आणि नंतर विवेचनाच्या अखेरीस त्या ओवीचा तो गूढार्थ एकत्रितपणे पुन्हा वाचणार आहोत. तर स्वामींच्या नित्यपाठातील दुसऱ्या ओवीकडे वळू-
देवा तूं चि गणेश। सकलमतिप्रकाश। म्हणे निवृत्तिदास। अवधारिजो।।२।। (१/ ओवी २).
प्रचलितार्थ : देवा, सर्वाच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश, तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, महाराज (हा देव म्हणजेच गणेश कसं ते) ऐका.
गूढार्थ : साक्षात देव असलेल्या हे श्रीसद्गुरो, तू सकल इंद्रियगणांचा ईश आहेस. तुझ्या बोधानं साधकाची मति तूच पूर्ण प्रकाशित करतोस. अर्थात जो निवृत्तीचा दास आहे तोच हा बोध नीट ऐकू आणि धारण करू शकतो, असं म्हणतात.
गूढार्थ  विवरण : श्रीसद्गुरू हाच साक्षात देव आहे. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष दिसणारा! सद््गुरू हा सदोदित परमात्म्याशी ऐक्य पावला असल्याने तोच परमात्मस्वरूप असतो. परमेश्वराला या डोळ्यांनी पाहाता येत नाही, परमेश्वराबरोबर संवाद साधता येत नाही, परमेश्वराला स्पर्श करता येत नाही. प्रत्यक्ष सद्गुरू जो आहे त्याला मात्र पहाता येतं. त्याच्याशी बोलता येतं. त्याच्या सहवासात राहण्याचा आनंद अनुभवता येतो. त्याची चरणसेवा करता येते. अर्थात आपलं पाहाणं, बोलणं, ऐकणं, सेवा हे सारं पूर्ण शरणागत भावानं नसलं आणि स्थूलबुद्धीनं असलं तरीही हा खरा सत्संग आपला ठसा उमटवल्यावाचून राहात नाही. परमात्मप्राप्तीसाठी साधकाची वाटचाल सुरू होते आणि सद्गुरूप्राप्तीनंतर त्यांच्या पूर्णत्वाचं भान जसजसं वाढू लागतं तेव्हा देव आणि सद्गुरू यांच्यातली अभिन्नताच उमगू लागते.  सद्गुरू निवृत्तिनाथांकडून ‘पसायदान’ मागून घेतल्यानंतर ज्ञानेश्वरीचा वाणीरूप यज्ञ पूर्णत्वास गेला तेव्हा  आपल्या सद्गुरूच्या कृपावर्षांवाच्या जाणिवेनं ज्ञानेश्वरांच्या चित्तवृत्ती उचंबळून आल्या. अरे जो पांडुरंग म्हणतात ना, तो हा माझ्यासमोर बसला आहे. हाच खरा, सहजप्राप्य असा विठ्ठल आहे, या भावनेनं ते गाऊ लागले- तो हा विठ्ठल बरवा! तो हा माधव बरवा!!