श्रीसद्गुरूचा अनुग्रह होताच पूर्णत्व प्राप्त होतं, मग तो अनुभव मला का नसावा? मी तत्क्षणीच पूर्ण का होऊ नये? असा प्रश्न स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या सद्गुरूंना विचारला. प्रत्यक्षात हा प्रश्न सर्व साधकांसाठीच त्यांनी केलेला आहे आणि त्यावर महाराजांचं जे उत्तर आहे, त्याचा लाभही सर्वाना दिलेला आहे! अपूर्ण जीव स्वत:हून पूर्णत्व पावू शकत नाही. पूर्ण सद्गुरूच जेव्हा अपूर्णाला आपल्यात विलीन करून घेतो तेव्हाच अपूर्णही पूर्ण होतो. सर्व अपूर्णता संपून जाते. केवळ पूर्णत्वानंच जीवन भरून जातं. पूर्ण आनंद, पूर्ण समाधान, पूर्ण शांती. पूर्णात पूर्णम् उदच्यते! जोवर अपूर्ण हा स्वतंत्रपणे जगू पाहातो, ‘मी’ आणि ‘माझे’ची ओळख पुसू इच्छित नाही तोवर जीवनात अशा पूर्णत्वाचा अनुभव येऊ शकत नाही. तेव्हा अनुग्रह तर लाभला पण तत्क्षणीच आपल्या अंतरंगातली सर्व अपूर्णता नष्ट का होत नाही, हे साधकांना उमगावं या हेतूनंच स्वामींचा प्रश्न आणि त्यावर महाराजांचं उत्तर आहे. महाराज सांगतात, दुधाला विरजण लावल्यावर लगेच दही होत नाही! पुढे ते आणखी खुबीनं सांगतात की, पण विरजण लागलेलं दूध हे दूधही राहिलेलं नसतं! सद्गुरूंनी परमतत्त्वाचं बीज अनुग्रहाच्या माध्यमातून माझ्या अंतरंगात पेरलं. आता ते अंतरंग क्षणार्धात पूर्णत्वाला जरी पोहोचलं नसलं तरी ते पूर्वीसारखंही राहिलं नसतं! बदलाची प्रक्रिया आतमध्ये सुरू झालीच असते. ती मला जाणवो किंवा न जाणवो. जितकी तळमळ असेल तितकी ती प्रक्रिया वेगानं होईल आणि दुनियेच्या ओढीची राख जितकी पडेल तितकी ती ठिणगी त्याखाली दबेल, पण विझणार मात्र नाही. माझ्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक अनुभवातून सद्गुरू ती राख फुंकून ती ठिणगी फुलविण्याचाच प्रयत्न क्षणोक्षणी करीत राहातील. तेव्हा मी सोऽहं म्हणजे, स: अहं.. तोच मी, मी त्या परमात्म्याचाच अंश या भावानं माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी जितकं जागृत राहीन तितकं जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाचं वास्तविक स्वरूप मला उकलेल आणि मग त्या प्रसंगातलं माझं वर्तन हे सोऽहं भावानंच होईल. ज्या क्षणी हा भाव सुटेल तेव्हा ‘स:’ची अर्थात परमात्मतत्त्वाची जाणीव सुटेल आणि केवळ अहंच्याच भावनेतून मी पूर्ववत जगू लागेन. तेव्हा सोऽहंचा भाव सुटू नये म्हणून गुरुगम्य अर्थात सद्गुरूकडून समजलेल्या मार्गानं मी आत्मसुखाची गोडी अनुभवण्याचा अभ्यास केला पाहिजे. तसा अभ्यास मुरला की त्यानंतरच साक्षीभाव येईल आणि मग जीवनातील यथोचित कर्मे ही त्यात न गुंतता पार पाडता येतील. १९२३मध्ये स्वामींना गणेशनाथ यांचा अनुग्रह लाभला आणि जीवनात सोऽहं साधना दृढावू लागली. पुढील ११ वर्षे ही मुख्यत्वे देशकार्यानंच व्यापली होती. तरी त्यातही सद्गुरूसेवेचा तंतूही बळकट होत होता. या ११ वर्षांत आपल्या सेवेच्या निमित्तानं सद्गुरू गणेशनाथ यांनी स्वामींकडून अशा काही गोष्टी करून घेतल्या ज्यांचा त्यांच्या भावी जीवनाशी फार दृढ आत्मीय संबंध राहणार होता. नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात उतरवण्यापासून ते नऊ ओव्यांचा नवरत्नहार गुंफण्यापर्यंतची ही विराट लेखनसेवा होती!