लोकशिक्षण हाच तमाशाचा पाया बनल्यामुळेच त्याला लोककलेचे स्थान मिळाले आहे. हे स्थान मिळवून देण्यासाठी अनेकांची अनेक पिढय़ांची साधना होती. ही परंपरा जपणाऱ्या आणि जोपासत नव्या पिढीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तमाशाला नवे रूप देणाऱ्या कलावंतांमध्ये काळू आणि बाळू खाडे कवलापूरकर या जुळ्या भावंडांचे नाव अग्रक्रमावर आहे. तीन पिढय़ांची तमाशा परंपरा असलेल्या एका घरात या भावंडांनी जन्म घेतला, तेव्हा याच कलेची साधना या भावंडांकडून सुरू राहणार, हे जणू ठरलेलेच होते. काळू-बाळू या जोडगोळीने म्हणजे, लहू आणि अंकुश खाडे या भावंडांनी आपल्या फडातून सादर केलेल्या ‘जहरी प्याला’ या वगनाटय़ातील काळू-बाळू नावाच्या हवालदारांच्या भूमिकेने या भावंडांनी ग्रामीण महाराष्ट्राला एवढे वेड लावले, की या जोडगोळीची दखल राज्याच्या संपूर्ण कलाक्षेत्राला घ्यावीच लागली आणि लहू आणि अंकुश यांची मूळ नावेच पुसली गेली. काळू-बाळू या नावानेच हे भाऊ कलाक्षेत्रात ओळखले जाऊ लागले.
एकाच नाळेतून जन्माला आलेल्या या जुळ्यांची जन्मकथाही मोठी विलक्षण होती. काळूचा जन्म झाल्यावरचा उरलेला नाळेतील मांसाचा गोळा टाकून देण्यासाठी नेला जात असताना त्यात हालचाल जाणवली आणि बाळूचे, म्हणजे अंकुशचे प्राण वाचले व महाराष्ट्राच्या लोककलेला एक जुळा आधारस्तंभ मिळाला. केवळ शब्दांच्या, अभिनयाच्या आणि हजरजबाबी संवादांच्या जोरावर तमाशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या या भावंडांपकी कोणाही फक्त एकाचे नाव घेतले जाणारच नाही, एवढी अमाप लोकप्रियता दोघाही भावांना मिळाली होती. तमाशा म्हणजे, शिट्टय़ा, दौलतजादा आणि दिलखेचक, कामुक अदाकारी असे आजही मानणारा एक शहरी वर्ग आहे. पण हे लोकशिक्षणाचे साधन आहे, या भावनेतून ही परंपरा जोपासणाऱ्या या काळू-बाळू यांनी या परंपरेला बाजारूपणापासून वाचविण्यासाठी आपली हयात वेचली. काळू-बाळू ही भावंडे म्हणजे तमाशा क्षेत्रातील चमत्कार आहे, असा त्या वेळी अनेकांचा समज होता, तो त्यांच्या जुळ्या अभिनयामुळे.. विनोद हा त्यांच्या वगाचा आत्मा होता आणि लोकशिक्षण हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी अनेक सामाजिक कामांनाही हातभार लावला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने गेल्या वर्षी बाळू खाडे यांना सन्मानित करण्यात आले, तेव्हा त्यांच्यासोबत काळू खाडे नव्हते.. त्यांच्या आठवणीने त्या क्षणी बाळू खाडे गहिवरले होते. एका जुळ्या प्रेमाची साक्ष त्या वेळी लोककलेच्या रसिकांना अनुभवता आली. बाळू खाडे यांच्या निधनानंतर तमाशाचे एक पर्व संपले असले, तरी त्यांच्या पुढच्या पिढीचा प्रवास मात्र याच ध्येयाने याच परंपरेच्या जोपासनेसाठी सुरू राहणार आहे..