आपल्याकडे ११ वर्षांचा मुलगा असतो सहावी-सातवीच्या वर्गात. शाळा संपल्यानंतर कॉलनीत क्रिकेट खेळणे हाच त्याचा सर्वसाधारण छंद. मोठा होऊन डॉक्टर, इंजिनीअर वा पायलट बनणार असे काही तरी सांगण्याचे हे वय. मात्र अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या तनिष्क अब्राहमची बातच निराळी. ११व्या वर्षी त्याने गणित, विज्ञान आणि विदेशी भाषेत तब्बल तीन पदव्या मिळविण्याचा विक्रम केला असून इतक्या लहान वयात त्याने केलेल्या शैक्षणिक प्रगतीची जगभरातील माध्यमांना दखल घ्यावी लागली आहे.
तनिष्कचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे झाला. त्याचे वडील बिजोऊ अब्राहम सॉफ्टवेअर इंजिनीअर, तर आई डॉ. ताजी या पशुवैद्यकशास्त्राच्या पदवीधर आहेत. मूळचे केरळचे रहिवासी असलेले हे दाम्पत्य २० वर्षांपूर्वी अमेरिकेत आले. तनिष्कचा बुद्धय़ांक (आयक्यू) इतक्या उच्च दर्जाचा आहे की वयाच्या चौथ्या वर्षीच त्याला अमेरिकेतील मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. अफलातून बुद्धय़ांक असणाऱ्या लोकांची ही संस्था जगप्रसिद्ध आहे. तनिष्क वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच हायस्कूल तसेच महाविद्यालयीन स्तरावरचे ऑनलाइन वर्ग घेत होता, तेही जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र यांसारख्या जटिल विषयांचे.
सुरुवातीला घरी राहूनच तो अभ्यास करीत असे. आईवडील हेच त्याचे शिक्षक. नंतर गेली सात वर्षे तो रिव्हर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २०१४ मध्ये, वयाच्या दहाव्या वर्षी त्याने पदविका मिळविली. तेव्हाही त्याचे खूप कौतुक झाले. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वत: पत्र पाठवून त्याचे अभिनंदन केले होते. वर्गातही तो नेहमी अव्वल असतो. गेल्या आठवडय़ात, २० मे रोजी मात्र त्याने इतिहास रचला! रिव्हर महाविद्यालयात पदवीदान समारंभ होता.. सुमारे १८०० तरुणांना या वेळी पदवी प्रदान केली जाणार होती.. खच्चून भरलेल्या सभागृहात तनिष्कचे नाव पुकारले गेले.. गणित, विज्ञान आणि विदेशी भाषा अशा तीन विषयांत तो पदवीधर झाल्याची घोषणा करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. रिव्हर महाविद्यालयातून पदवी मिळवणारा सर्वात कमी वयाचा विद्यार्थी म्हणून तनिष्कच्या नावाची नोंद झाली. पदवी घेतल्यानंतर साहजिकच त्याला भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता डॉक्टर आणि नंतर वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्षपदही मी मिळवणार, असे उद्गार त्याने काढताच उपस्थितांनी त्यालाही मनसोक्त दाद दिली.