वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असला तरी त्याचे स्थान आता भारतातच नव्हे तर इतर देशातही डळमळीत होताना दिसत आहे. अलीकडच्या काळात वृत्तपत्रांची काही नैतिक बांधीलकी असते हे कुणी मानायला तयार नाही. त्यातूनच ‘डेली टेलिग्राफ’ या ब्रिटनमधील वृत्तपत्राचे राजकीय भाष्यकार असलेले पीटर ओबोर्न यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन या चौथ्या स्तंभाची वाचकांप्रति असलेली बांधीलकी जपली आहे.
 सध्या काळ्या पैशांचा जो वाद सुरू आहे त्यात अलीकडेच ‘संडे टाइम्स’ने एचएसबीसी बँकेतील काळ्या पैशांच्या खातेधारकांचे पोलखोल केले होते. या बँकेचेच लोक हा पैसा ठेवण्यास धनदांडग्यांना कसे भरीस पाडतात याचा तो लेखाजोखा होता. ओबोर्न यांनीही त्याविषयी सत्यान्वेषण करणाऱ्या बातम्या त्याआधीच दिल्या होत्या. ‘बारक्ले ब्रदर्स’ या डेली टेलिग्राफच्या मालकांनी आपल्या बातम्या जाहिरातींचा महसूल जाईल म्हणून दाबून टाकल्या, असा आरोप ओबोर्न यांनी केला आहे. पीटर ओबोर्न हे काही मामुली पत्रकार नाहीत तर कणा असलेले पत्रकार आहेत म्हणूनच ते असले धाडस करू शकले. ‘ओपन डेमोक्रसी’ या संकेतस्थळावरील ब्लॉगमध्ये त्यांनी एचएसबीसी कर घोटाळ्यात ‘द टेलिग्राफ’वर टीका केली आहे. या वर्तमानपत्राने आपल्या एचएसबीसीविषयीच्या लिखाणावर २०१३ पासून र्निबध आणले आहेत व त्यांनी आता या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करावी तसेच वर्तमानपत्राची मार्गदर्शक तत्त्वे नेमकी काय आहेत हे सांगावे, अशी मागणी केली आहे. ‘डेली मेल’मधून पाच वर्षांपूर्वी ओबोर्न हे ‘द डेली टेलिग्राफ’मध्ये आले होते.  ‘द राइज ऑफ पॉलिटिकल लाइंग’, ‘द ट्राइम्फ ऑफ पॉलिटिकल क्लास’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. राजकारण, पत्रकारिता यांसारख्या अनेक क्षेत्रातील ढोंगबाजीवर त्यांनी सतत कोरडे ओढले आहेत. खरे तर ते दूरचित्रवाणी पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मुगाबेज सिक्रेट फेमाइन, अफगाणिस्तान-हिअर इज वन वुइ इनव्हेडेड अर्लियर व नॉट क्रिकेट द बेसिल ऑलिव्हेरा कॉन्स्पिरसी हे माहितीपट त्यांनी प्रदर्शित केले. इलेक्शन अनस्पन व व्हाय पॉलिटिशियन्स कान्ट टेल द ट्रथ यात त्यांनी ब्रिटनमधील राजकीय पक्षांवर कोरडे ओढले आहेत. टेलिग्राफ मीडिया ग्रुपचे प्रमुख मॅकलेनन यांनी असे कबूल केले आहे की, जाहिरातींचा वृत्तपत्रातील संपादकीय धोरणांवर परिणाम होत आहे. लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा ओबोर्न यांच्यासारख्या पत्रकाराला ब्रिटनसारख्या प्रगत लोकशाही असलेल्या देशात देण्याची वेळ येते ही सुन्न करणारी गोष्ट आहे.