‘कळणे आणि वळणे’ हे शनिवारचे संपादकीय (लोकसत्ता, २२ नोव्हें.)  डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारे आहे. आपली एखाद्या गोष्टीच्या आहारी जाण्याची सवय ओळखून, अनेक दिवसांपासून सोशल मीडिया व अशा अन्य माध्यमांतून वेगवेगळ्या विचारांच्या गटांकडून, आपल्याला न रुचणाऱ्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करणारे, त्यांना लाखोली वाहणारे मजकूर पाठवले जात आहेत व बहुतांशी लोक त्याची खातरजमा न करता, बेमालूमपणे खरे समजून, हा मजकूर पुढे पाठवत आहेत.
स्वतंत्र भारतात गांधीजींना शिव्या देणे म्हणजे जणू फॅशन झाली आहे. आपली उभी हयात आणि कुटुंब देशासाठी उधळून देणारा हा ‘संतांमधला राजकारणी आणि राजकारण्यांमधला संत’ सर्वाधिक टीकेचा धनी झाला आहे. अनेक कपोलकल्पित घटना त्यांच्या नावावर खपवल्या जात आहेत. पण मार्टनि ल्यूथर किंगपासून बाबा आमटेंपर्यंत साऱ्यांनीच ज्यांची प्रेरणा घेतली आणि हिमालयाएवढे कार्य केले, त्यांची निंदा करण्यात कसली धन्यता? भारताला औद्योगिक-वैज्ञानिक मार्गाने नेणारे पंडित नेहरूसुद्धा केवळ टीकाविषयच कसे काय ठरू शकतात? पंडित नेहरूंच्या मखमली हाताखाली, सरदार पटेलांचा पोलादी पंजा होता; म्हणजेच वैयक्तिक मतभेद बाजूला सारून हे दोन्ही नेते देशासाठी प्राणपणाने काम करीत होते, हा इतिहास दिसेनासा कसा झाला?  सावरकरांचे टीकाकार केवळ त्यांच्या एका पत्रावर बोट ठेवतात. सावरकरांबद्दल भरभरून बोलणारेही त्यांचा परखड वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जातीपातींना असणारा विरोध या बाबी सोयीस्करपणे विसरतात.
वास्तविक सारेच राष्ट्रपुरुष माणूसही होते; साऱ्यांच्याच हातून कधी ना कधी चुका झाल्या होत्या, पण त्यात अधोरेखित करावा असा भाग म्हणजे, त्यापैकी अनेक चुका वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच नव्हत्या, तर देशसेवेसाठी झटताना झाल्या होत्या आणि त्या या साऱ्यांनी मोठय़ा मनाने मान्य केल्या होत्या.
अपेक्षा एवढीच आहे की टीका शालीन भाषेत व्हावी आणि ती करताना, भारतीयांनी  किमान गुणग्राहकता दाखवावी.

समविचारी, समसंस्कारी शेजाराचा हक्क!
‘मांसाहारींना सदनिका नाकाणाऱ्यांवर कारवाई’ ही बातमी (२८ नोव्हें.) वाचली. मांसाहाराचे दुष्परिणाम आता जगजाहीर आहेत. पाश्चिमात्य देशांतही शाकाहार चळवळ जोर धरू लागली आहे. शिवाय मांसाहार करणाऱ्या मंडळींचा ओला कचरा ही एक मोठी समस्या सोसायटय़ांना होते. एखाद्या वसाहतीची संस्कृती शाकाहारी ठेवायची असेल तर त्यांना ती तशी ठेवून देण्यास काय हरकत आहे? हा काही जातीयवाद वा वंशवाद नाही. खाण्या-पिण्याच्या सवयी मानवी जीवनात महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या नकाराकडे समविचारी, समसंस्कारी शेजाराचा हक्क या दृष्टिकोनातून पाहावे
– डॉ. श्रीकांत तापीकर, पुणे

आत्मपरीक्षण आवश्यक
फिल ह्य़ुजेसच्या मृत्यूमुळे क्रिकेटविश्व सुन्न झाले. डोक्यावर हेल्मेट असूनही सीन अ‍ॅबॉटचा चेंडू डोक्यावर आदळल्यानंतर असा मृत्यू यावा हे दुर्दैवी आहे. या मदानावरील अपघातानंतर डॉ. जॉन ऑर्चर्ड यांनी ज्या प्रकारे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले त्याची सर्व क्रिकेटविश्वाने नोंद घेणे आवश्यक आहे. विशेषत: हेलिकॉप्टरने ह्य़ुजेसला रुग्णालयात नेण्यापर्यंत त्यांचे प्रयत्न! या घटनेवरून क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट मंडळ गेली काही वर्षे ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय व भारतीय खेळाडूंचा ट्वेंटी-२० षटकांचा ‘आयपीएल’ कुंभमेळा भरवते त्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना मदानावर घडल्याच तर त्या अशा प्रकारे विद्युत वेगाने (हेलिकॉप्टर वगरेची सोय) हाताळण्यास समर्थ आहे काय, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
– प्रवीण आंबेसकर, ठाणे

पात्र ठरलेल्या शिक्षण सेवकांना नवे सरकार तरी न्याय देणार का?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी २ मे २०१० रोजी ‘प्राथमिक शिक्षण सेवक’ या पदाच्या १५००० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती, ज्यामध्ये १० प्रश्न चुकीचे तपासले होते. उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने आदेश दिल्यानंतर १४००० उमेदवारांचे पुनर्मूल्यांकन केले गेले असता ३१३९ उमेदवार शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरवले गेले, परंतु गेली पाच वष्रे या उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. म्हणजे निवड २०१०ची व नोकरी २०१५ मध्ये. या मुलांनी गेल्या पाच वर्षांत १८ वेळा मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड या ठिकाणी निदर्शने, धरणे आदी प्रकारे आंदोलन सुरू ठेवले. अजूनही त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. शिक्षण संचालक, शिक्षणमंत्री हे फक्त पोकळ आश्वासने देतात व अतिरिक्त शिक्षकांच्या नावाने खडे फोडतात, पण मूळ प्रश्न सोडवावा असे कोणालाही वाटत नाही.
  नियुक्त्या न मिळाल्याने त्यांच्या आयुष्यात अत्यंत नाजूक गुंतागुंत निर्माण झाली आहे. प्रत्येक मुलाने आयुष्याची २७ वष्रे पूर्ण केली असून आई-वडिलांच्या खूप अपेक्षा असतानाही त्या पूर्ण करू शकत नसल्याने त्यांना निराशेने ग्रासले आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असून त्यांच्या विवाहाचे वय निघून चालल्याने त्यांच्याशी कोणी विवाह करायला तयार नसल्याने आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. याला कंटाळून दोन मुलींनी आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ही सर्व मुले उच्च गुणवत्ताधारक आहेत, परंतु पोट भरण्यासाठी हमाली, गवंडीकाम, सेतू ऑपरेटर अशी कोणतीही कामे त्यांनी स्वीकारली आहेत आणि मुलींना २००० रुपये पगारावर खासगी शाळांत काम करावे लागते आहे.
या मुलांचा दोष काय?  यांची पाच वष्रे वाया गेली व आणखी तीन वष्रे शिक्षणसेवक म्हणून करावी लागतील..म्हणजे एकूण आठ वष्रे या मुलांनी स्वप्नं मारून टाकायची का? या मुलांनी जीवन जगण्यासाठी, पसे  मिळवण्यासाठी विघातक मार्ग स्वीकारावेत असे सरकारला वाटते काय? गडचिरोली भंडारा, गोंदिया, नंदुरबार, यवतमाळ अशा आदिवासी व नक्षलग्रस्त भागांतील मुलेही आहेत. या मुलांच्या हातून असे काही विपरीत घडलेच तर यात या मुलांचा दोष काय? पोटासाठी माणूस काहीही करू शकतो.  शिक्षण संचालकापासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करूनही हाती काही लागत नाही. केवळ पोकळ आश्वासने दिली जातात, असा अनुभव आहे. तसाच अनुभव हेही सरकार देणार का?
– पृथ्वीराज वाघाडे