जे लोक शब्दांवर प्रेम करतात, ते त्यांच्या जपणुकीसाठी प्रसंगी जीव धोक्यात घालूनही काम करू शकतात. चीनमधील शब्दांचे पुजारी असलेले विद्वान टी.एच. शिएन यांनी ग्रंथसंस्कृती जपण्यासाठी असेच संस्मरणीय काम केले. शिएन यांचे नुकतेच, वयाच्या १०५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यासारखा ग्रंथप्रेमी आता होणे नाही. जेव्हा परचक्र येते तेव्हा पहिला बळी संस्कृतीचा जातो. त्यात पुस्तके आलीच, अनेक कलाकृतीही तोडूनफोडून टाकल्या जातात. जपानने शांघायचा ताबा घेतला, त्या वेळी (सन १९३७) शिएन यांनी अनेक दुर्मीळ पुस्तके जीव धोक्यात घालून वाचवली होती. चिनी माओवादी क्रांतीपासून अमेरिकेत राहणारे शिएन शिकागो विद्यापीठात ते पूर्व आशियाई भाषांचे मानद प्राध्यापक, तसेच पूर्व आशियाई ग्रंथालयाचे प्रमुख होते.
खरे तर गटेनबर्गच्या आधी चीनमध्ये मुद्रणकलेचा शोध लागला; त्यामुळे चीनचा इतिहास त्या काळापासून शब्दबद्ध झाला. त्यावर आधारित अनेक पुस्तके व लेख त्यांनी इंग्रजीत आणून चीनमधील लिखित ज्ञान जगाला उपलब्ध करून दिले. जेव्हा जपानने आक्रमण केले, त्या वेळी चीनमधील संस्कृतीचा ठेवा असलेली ६० हजार पुस्तके वाचवली होती. त्यापैकीच काही नंतर शिएन यांनी अमेरिकेला पाठवली. त्यांनी वाचवलेल्या पुस्तकांना अमेरिकी काँग्रेसच्या वाचनालयात स्थान मिळणार होते, पण ते ३० हजार खंड शांघाय येथून अमेरिकेत नेणे अवघड होते, कारण सर्व मार्गावर जपानचा कब्जा होता. जर शिएन यांचा हा उद्योग उघड झाला असता, तर त्यांना ठार करण्यात आले असते. योगायोगाने १९४१ मध्ये त्यांचा शाळकरी मित्र सपत्नीक त्यांना भेटला. तो सीमाशुल्क विभागात कामाला होता. त्याच्या मदतीने ही पुस्तके १०२ खोक्यांत भरून खास युक्तीने शांघायकडून वॉशिंग्टनकडे मार्गस्थ झाली. अमेरिकेने ही पुस्तके तैवानला दिली. तेथून ती पुन्हा चीनच्या राष्ट्रीय वाचनालयात आणण्याचा शिएन यांचा प्रयत्न होता, पण ते शक्य झाले नाही.
शिएन यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी पूर्व चीनमधील जिंगासू प्रांतात झाला. लहानपणापासून त्यांना पुस्तके, त्यांचे संपादन याची गोडी होती. अमेरिकेतील वास्तव्यात शिकागो विद्यापीठातून त्यांनी ग्रंथशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली व नंतर विद्यावाचस्पतीही झाले. ‘अ हिस्टरी ऑफ रायटिंग अँड रायटिंग मटेरियल्स इन एन्शन्ट चायना’, ‘रिटर्न ऑन बाम्बू अँड सिल्क- द बिगिनिंग ऑफ चायनीज बुक्स अँड इनस्क्रिप्शन’ व ‘कलेक्टेड रायटिंग्ज ऑफ चायनीज कल्चर’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.