‘अनुत्तीर्णाचा आनंद’ हा अग्रलेख (लोकसत्ता, १३ फेब्रु) वाचला . शिवसेनेच्या दांभिकपणावर आणि विघ्नसंतोषीपणावर अग्रलेखाने नेमके बोट ठेवले आहे. मात्र अग्रलेखात राज ठाकरे यांनी दिल्ली पराभवाचे विश्लेषण करताना प्रतीकांचा आधार घेतला नाही, असे जे म्हटले आहे, ते मात्र चुकीचे आहे.
काही मराठी वृत्तपत्रांत ठाकरे यांनी भाजपच्या पराभवाची तुलना अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याशी केली आहे. मोदी आणि अमित शहा यांचे ‘ट्विन टॉवर्स’ केजरीवालांच्या विमानाने पाडले आणि तरीदेखील विमान सुरक्षित राहिले अशा अर्थाचे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले आहे.
ठाकरे बंधूंनी प्रथम आपापले घर नीट लावावे आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवावे. दिल्लीतला एक पराभव ही भाजपला आत्मपरीक्षण करण्याची एक संधी आहे, आणि मोदी-शहांसारखे मुरलेले राजकारणी त्यातून योग्य तो बोध घेतीलच. पण ठाकरे बंधूंनी मात्र आपली भाजपमागे झालेली फरपट (शिवसेना) आणि अस्तित्वावरच उभे ठाकलेले प्रश्नचिन्ह (मनसे) यापासून निदान अजून तरी काहीच धडा घेतलेला नाही, असेच या अपरिपक्व टीकेतून दिसून येते.

पास वा नापास करणारे जागच्या जागीच राहतात
भाजपचा भुगा झाल्यामुळे इतर पक्षाना आनंद झाला आणि हल्ली प्रत्येक विचार जाहीरपणे बोलून दाखवण्याची रीत असल्याने त्यांनी तो  व्यक्त केला. शिवसेनेच्या प्रतिक्रियेवरील ‘अनुत्तीर्णाचा आनंद’ या अग्रलेखातले भाष्य मार्मिक (मर्मावर बोट ठेवणारे) आहे. मात्र  तळे राखणारे राजकारणी बदलले तरी तळ्याचे मालक असलेल्या जनतेला हा तरी प्रामाणिकपणे तळे राखील अशी दरवेळी खुळी आशा बाळगत राहणे हा एकच पर्याय खुला असल्याचे जाणवले आणि विषण्ण वाटले. उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण करणारे जागच्या जागीच राहतात हे वास्तव विदारक आहे.
-गजानन गुर्जर पाध्ये, दहिसर (मुंबई)

हे वादंग ‘मध्यावधी’कडे नेणारे
युती सरकारच्या दोन घटक पक्षांतील वाढत जाणारा  तणाव या राज्याला ‘अच्छे दिन’ येण्याच्या मार्गातील अडथळा होऊ नये. अशा वादांमुळेच युती सरकार पाच वष्रे तरी पूर्ण करेल की नाही याची शंका वाटते. याचे गंभीर परिणाम मध्यावधी निवडणुकांच्या माध्यमांतून शेवटी जनतेलाच सोसावे लागणार आहेत. एकमेकांचे जमत नसेल तर वेळीच विभक्त होणे, हाच एक पर्याय वाटतो. पुनश्च निवडणुका झाल्यास ज्यांच्याप्रती रोष व्यक्त करायचा आहे तो जनता करेलच. त्यामुळे राज्यात आज जो काही कलगीतुरा सुरू आहे त्याकडे जनतेचे लक्ष नाही, असे  युतीच्या नेत्यांनी गृहीत धरू नये.
 -जयेश राणे, भांडुप ( मुंबई)

भाजप +शिवसेना म्हणजेच काँग्रेस+राष्ट्रवादी?
दिल्लीच्या निकालामुळे भाजप नेतृत्वाने शिवसेनेशी संबंध कसे ठेवायचे याचा पुनर्वचिार करणे गरजेचे झाले आहे, असे युतीच्या हितचिंतकांना वाटणे अगदी साहजिक आहे. ज्या प्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी असताना दोन्ही पक्ष  एकमेकांना सहकारी समजण्यापेक्षा एकमेकांवर कशी कुरघोडी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत असत, त्याचीच री युतीमधील भाजप व शिवसेना हे घटक पक्ष ओढत आहेत असे दिसते.
 निवडणुकीपूर्वी युतीच्या दोघा घटक पक्षांनी एकमेकांविरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढवली व महाराष्ट्रात कोणाची किती ताकद आहे हे अजमावले, इतपत ठीक आहे. पण निवडणुकीनंतर सरकार स्थापन करताना राष्ट्रवादीच्या नादाला लागून शिवसेनेची गरज असतानाही तिची जास्तीत जास्त अवहेलना केली व त्यांना देऊ ते मंत्रिपदाचे तुकडे टाकले. ही गोष्ट केवळ राजकीय डावपेच डोळ्यासमोर ठेवूनच केली गेली. पण जर तुम्हाला एकत्रितपणे पाच वष्रे एकत्र सरकार चालवायचे आहे तर ते चांगल्या प्रकारे म्हणजे एकजिनसीपणाने चालवून लोकाभिमुख कारभार करून लोकांची मने जिंकणे गरजेचे नव्हे का?
जशी एखाद्या राजकीय पक्षात गट-तट असूनही ते बाहेरच्यांना जाणवणार नाही याची काळजी घेतली जाते, त्या प्रमाणेच युतीच्या घटक पक्षांनी आपापले वेगळे अस्तित्व जनतेपुढे दाखवण्यापेक्षा एकदिलाने व एकजीवपणे राज्यकारभार करावा ही जनतेची अपेक्षा आहे. आता लोकसभा निवडणुकीसारखी मोदी लाट संपून जनता सुनामी आली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये जनतेच्या अपेक्षांकडेच दुर्लक्ष करणे म्हणजे आत्मघात करून घेणे होय.
-ओम पराडकर, सातारा

शेरेबाजी आणि रंगलेला कलगीतुरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपविषयी बोलायचा तसे पाहता काही अधिकार नाही हे खरेच आहे. शिवसेनेचा मुंबई, औरंगाबाद येथील कारभार खाबुगिरीने व्यापलेला आहे.तसे असले तरीही एक नागरिक, एक राजकीय नेता म्हणून त्यांनी दिल्ली निकालाबद्दल मोदी, शहा यांना दोष दिला तर भाजपच्या नेत्यांनीही थयथयाट करण्याचे कारण नव्हते. याची कारणे दोन : एक म्हणजे किरण बेदी यांनी तसेच वक्तव्य करीत पराभवाची संपूर्ण जबाबदारी भाजपची म्हणजेच मोदी-शहा द्वयीची असे सांगत बचाव केला होता. किरण बेदींना कोणी दटावल्याचे वाचनात आले नाही. दुसरे कारण म्हणजे भाजपच्या अनुयायांना हायसे वाटायला हवे होते की आत्मकेंद्री, हुकूमशाही वृत्तीला चपराक मिळाली.  
आम्ही कोणालाही उत्तरदायी नाही आहोत, ही शाही वृत्ती, भपकेबाज समारंभ ही कार्यपद्धती एरवीही संघाच्या अनुयायांना न पटणारीच असावी, असा माझा समज आहे! पंतप्रधान काही दोषमुक्त नाहीत, त्यांच्यावर कोणी टीका केली तर बिथरून तोल ढळू देऊ नये, स्वत: मोदीच एका मुलाखतीत असे म्हणाले होते. तेव्हा शेलारांसारख्या नवख्याने उगाचच आव्हाने देत फिरावे व टीका करायची तर राजीनामा द्या सांगावे ही राजकोटी मंदिरात देवाला संपूर्ण लोटांगण घालण्याची निदर्शक वृत्ती आहे.
 त्यांना शिवसेनेची टीका आवडली नसेल तर त्यांनीच पुढाकार घेऊन सेनेला सत्तेतून दूर करावे, मंत्र्यांना बडतर्फ करवावे. आशीष शेलारांमध्ये तेवढी ताकद आहे हेही कळेल, नमोपूजेतून एवढी कमाई नक्कीच झाली असेल. ते शक्य नसेल तर इतरांचे भाषणस्वातंत्र्य मान्य करावे.
-नितीन जिंतूरकर, मालाड (प)

शिवरायांच्या नावाला काळे फासू नका!
दिल्लीत  पराभव झाला, तरी भाजप नेते काहीच धडा घेत नाहीत. तर मित्र असूनही भाजपच्या पराभवाने शिवसेनेला आनंद झालाय. एकमेकांची उणीदुणी काढण्यातच दोन्ही पक्ष धन्यता मानत आहेत. दोन्ही पक्षांनी शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागितली असून महाराजांच्या नावाला काळे फासू नका, हे सांगावे वाटते.
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वर्सोवा (मुंबई)