News Flash

ठाकूरदास बंग

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी, जमनालाल बजाज, विनोबा भावे यांच्या वास्तव्याचे ऐतिहासिक वलय आहे. त्यांचा कार्य-वारसा जपणाऱ्यांच्या यादीतील ज्येष्ठ गांधीवादी प्रा. ठाकूरदास बंग

| December 19, 2012 03:40 am

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी, जमनालाल बजाज, विनोबा भावे यांच्या वास्तव्याचे ऐतिहासिक वलय आहे. त्यांचा  कार्य-वारसा जपणाऱ्यांच्या यादीतील ज्येष्ठ गांधीवादी प्रा. ठाकूरदास बंग यांचे नाव महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)च्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने तरुण पिढीसमोर आले. नि:स्वार्थ समाजसेवा, साधी राहणी व गांधीविचारांवरील निष्ठा जपणाऱ्या निवडक नेत्यांत ठाकूरदास बंग यांनी भारतात आदराचे स्थान मिळवलेले आहे. पंचविशीत गांधीजींच्या प्रभावाने प्राध्यापकी  सोडून स्वातंत्र्यलढय़ात उतरलेले बंग १९४७नंतर प्रत्येक क्षण समाजासाठी जगले. दिल्ली-मुंबईत अनेक पदांवर काम करण्याची संधी त्यांनी धुडकावून गांधीभूमीत रचनात्मक प्रयोग केले. दारिद्रय़ायामुळे आजोळी मिणमिणत्या पणतीच्या प्रकाशात शिक्षण घेणाऱ्या प्रा. बंग यांना प्राध्यापकाची नोकरी करून सुखासीन आयुष्य जगण्याची संधी चालून आली होती. परंतु, ‘चले जाव’ चळवळीतील सहभागाने त्यांच्या जीवनाला वेगळे वळण दिले. सार्वजनिक जीवन जगताना क्षणोक्षणी येणाऱ्या अनुभवातून धडे घेतानाच स्वत:लाही घडवावे लागते, याची परिपक्व जाण असलेल्या ठाकूरदास यांनी  महात्मा गांधींची हत्या, जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरुद्ध दिलेला लढा, अशी महत्त्वाची स्थित्यंतरे पाहिली. महात्मा गांधी यांची वर्धा आश्रमात हत्या करण्याचा एक प्रयत्न झाला होता. त्यावेळी नाथुराम गोडसेला अटकही झाली होती. परंतु, गांधीजींनी क्षमा केल्याने त्याला सोडून देण्यात आले होते. या प्रसंगाचे बंग साक्षीदार होते. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण क्रांती लढयात ते अग्रभागी राहिले. केवळ स्वदेशीचा वापर व ग्रामस्वराज्याचा जागर करण्यास ते भारतभर फि रले. गांधी-विनोबा-जयप्रकाश यांच्या मुशीत घडलेल्या प्रा.बंग यांच्या कार्याचा दीप कधीही मंदावला नाही. जमनालाल बजाज स्मृती पुरस्कारांसह असंख्य पुरस्कार त्यांना लाभले. पुरस्कारापोटी मिळालेली लक्षावधीची रक्कम हातोहात स्वयंसेवी संस्थांनाही वाटून टाकली. आदर्श समाजाची निर्मिती, अहिंसा, स्वदेशी आणि शेतक री हितासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या ठाकूरदास बंग यांचे वेगळेपण म्हणजे त्यांनी सेंद्रीय शेतीचा नेहमीच आग्रह केला. म्हणून ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ आयुष्य जगणारे प्रा. बंग म्हणूनच खरे सवरेदयी व्रतस्थ ठरतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 3:40 am

Web Title: thakurdas bang
टॅग : Vaktivedh
Next Stories
1 व्यक्तिवेध : व्हिक्टोरिया सोटो
2 कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर
3 विनोद राय
Just Now!
X