महाभारतातील संजय आणि यूपीए-१ मधील संजय या दोघांत कमालीचा फरक आहे. पहिल्याने जे घडले त्याचा इत्थंभूत वृतान्त कथन केला, तर दुसऱ्याने त्यात सरमिसळ, असत्य, विपर्यास यांची भर घातली.
हा प्रसंग जानेवारी २०१४ मधला. तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील अवघी तिसरी पत्रकार परिषद सुरू असताना सिंग म्हणाले, ‘‘आजच्या प्रसारमाध्यमांच्या तुलनेत, इतिहास माझ्याबाबतीत नक्कीच अधिक दयाळू असेल’’..  रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपासून नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदापर्यंत आणि केंद्रीय अर्थमंत्रिपदापासून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत ज्या व्यक्तीने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली, त्याच          डॉ. सिंग यांना अखेरच्या दिवसांत स्वत:ला ‘न्याय’ मिळवून देण्यासाठी इतिहासाकडे डोळे लावावे लागले, अशी कबुली या वक्तव्यातून मिळत होती आणि हे लवकरच इतिहासजमा होणार अशी खूणगाठही बांधली जात होती! पंतप्रधानपदाच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देशाचे नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘हिरो’ ठरलेले डॉ. सिंग उरलेल्या पाच वर्षांत जनतेच्या दृष्टीने ‘ना-लायक’ ठरतात, हे कसं घडलं, हे पटवून देणारी अनेक कारणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत; पण मनमोहन यांचा हा उतरता प्रवास ज्यांनी त्यांच्या सोबत राहून अनुभवला, ते अधिक साक्षेपाने ही कारणे मांडतील, अशी अपेक्षा असते. डॉ. सिंग यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कालखंडात त्यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजया बारू यांचे ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर – द मेकिंग अ‍ॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ हे पुस्तक तसे भासवण्याचा प्रयत्न करते; पण प्रत्यक्षात त्यात पारदर्शीपणा अभावाने आढळतो.
हे पुस्तक सर्वप्रथम प्रकाशात आले ते ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत. एकीकडे, नरेंद्र मोदी आपल्या प्रचारसभांमध्ये डॉ. सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात रान पेटवत असतानाच या पुस्तकातील ‘निवडक’ उतारे माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आले. डॉ. सिंग हे कसे ‘अपघाती’ पंतप्रधान होते आणि देशाच्या कारभाराचा रिमोट कसा सोनियांच्या हाती होता, असे या पुस्तकातून सिद्ध झाल्याचे सांगत भाजपने या ‘निवडक’ उताऱ्यांचा प्रचारासाठी वापर केला. त्यामुळे डॉ. सिंग यांना इतिहासही दगाच देणार की काय, अशी शंकाही निर्माण झाली.
‘आपले पंतप्रधान होणे हा केवळ एक ‘अपघात’ आहे’, असे मनमोहन सिंग यांनीच एकदा म्हटल्याचे बारू म्हणतात. त्यांचे संपूर्ण पुस्तक अनेकदा हे विधान घोळवत राहते. अर्थात डॉ. सिंग पंतप्रधान झाले त्या वेळची राजकीय परिस्थिती या विधानाला पोषक वातावरणनिर्मिती करते. २००४मध्ये काँग्रेससाठी सत्तेची दारे खुली झाली; पण ही वाट सोपी नव्हती. पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची मोट बांधावी लागणार होतीच; शिवाय डाव्यांशीही संधान बांधावे लागणार होते. आधीच्या पाच वर्षांत भाजपप्रणीत एनडीएने आघाडी सरकारचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. मात्र, काँग्रेससाठी हा नवाच प्रयोग होता. त्यातच सोनिया गांधी यांच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्दय़ावरून काही मित्रपक्षांमध्ये कुरबुरी असल्याने त्यांच्या पंतप्रधानपदाचा मार्गही कठीण दिसत होता. अशा परिस्थितीत सोनिया यांनी ‘अंतर्मनाचा आवाज’ ऐकून पंतप्रधानपदासाठी डॉ. सिंग यांची निवड केली; पण तो अपघात होता का, याचे उत्तर ‘नाही’ असे अनेक बाबतीत म्हणता येईल. खुद्द बारूंच्या पुस्तकातच मांडण्यात आलेली डॉ. सिंग यांची आधीची कारकीर्द त्यांच्या त्यांच्यासाठी किती अनुकूल आणि योग्य होती, हे सांगते. वरिष्ठ सरकारी पदांवर सक्षमपणे कामकाज करून दाखवणाऱ्या डॉ. सिंग यांची अर्थमंत्रिपदाची कारकीर्द भारताच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन आणि बळकटी देणारी ठरली. त्यानंतर भाजपप्रणीत एनडीएची सत्ता आली तेव्हा ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते राहिले. त्यामुळे मनमोहन सिंग यांना ‘अपघाती पंतप्रधान’ म्हणताना बारू हे विरोधी पक्षाच्या बाकांवरील नेतेमंडळींपैकी वाटतात.
बारू आणि डॉ. सिंग आधीपासून एकमेकांना चांगले परिचित होते. एक अर्थशास्त्रातील कुशल धोरणी आणि दुसरा अर्थविषयक वृत्तपत्राचा ज्येष्ठ पत्रकार त्यामुळे हा परिचय असणे स्वाभाविकच होते. त्यामुळे बारू यांनी पंतप्रधान होण्याआधीच्या डॉ. सिंग यांच्या कारकिर्दीचा सखोल परिचय करून दिला आहे. पंतप्रधानपदी नियुक्त झाल्यानंतर डॉ. सिंग यांनी अवलंबलेली कार्यपद्धती, आर्थिक विकास घडवतानाच त्या अनुषंगाने सामाजिक विकासालाही प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या कल्पक योजना, पाकिस्तानसह जगभरातील देशांबाबतचे त्यांचे धोरण, देशाच्या शैक्षणिक प्रगतीबाबतची त्यांची तळमळ अशा अनेक गोष्टींचे बारू यांनी सकारात्मक चित्रण केले आहे. कृषी कर्जमाफी, सर्वशिक्षा अभियान, जम्मू काश्मीर गोलमेज, नागरी अणुकरार अशा अनेक मुद्दय़ांबाबत डॉ. सिंग यांचा दृष्टिकोन फलदायी ठरल्याचे बारू आवर्जून सांगतात.
मात्र, हे सर्व सांगत असतानाही बारू आपल्या पुस्तकाचे शीर्षक सार्थ करण्याचा प्रयत्नही वारंवार करतात. डॉ. सिंग यांचा स्वभाव मुळात शांत, अबोल, संयमी आणि गंभीर असल्याने त्यांच्या कारकिर्दीला नुकसान पोहोचवणारा ठरला, असे बारूंचे विश्लेषण आहे. डॉ. सिंग यांना ‘राजकारणी’ होणे कधीच जमले नाही. तसेच सरकारवर आपली पकडही त्यांना जमवता आली नाही, असे सांगणारे किस्से बारूंनी या कथन केले आहेत. त्यांचा मुख्य रोख डॉ. सिंग आणि सोनिया गांधी यांच्यातील समीकरणावर आहे. सोनिया गांधी याच सत्तेची सूत्रे हाताळत होत्या, असे बारू अप्रत्यक्षपणे दाखवू पाहतात. डॉ. सिंग यांना स्वत:चे मंत्री निवडण्याचाही अधिकार गाजवता आला नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक काँग्रेस नेते त्यांच्यापेक्षा सोनियांच्या प्रति अधिक कृतज्ञ असत. विशेषत: प्रणब मुखर्जी, अर्जुन सिंह, ए. के. अँटोनी हे मंत्री मनमोहन यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असत. तसेच, मंत्रिमंडळातील कनिष्ठ मंत्र्यांना आपलेसे करणे डॉ. सिंग यांना जमले नाही, असे बारूंनी  काही घटनांचे संदर्भ देत म्हटले आहे. सोनिया यांनी डॉ. सिंग यांच्यावर अधिकार गाजवण्याचा थेट प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी डॉ. सिंग यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये आदरभाव राहील, याची खबरदारी घेतली. मात्र, त्यांचे निकटवर्तीय काँग्रेस नेते, सल्लागार अहमद पटेल, पंतप्रधानांचे सचिव पुलोक चॅटर्जी यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षश्रेष्ठी सरकारवर नियंत्रण ठेवून होते, असे बारूंनी म्हटले आहे. हे सर्व डॉ. सिंग यांना समजत होते. मात्र, तरीही ते शांत राहिले, कारण त्यांना पंतप्रधानपद हातातून जाऊ द्यायचे नव्हते, असा दावा बारूंनी केला आहे.
डॉ. सिंग हे स्वत:च्या अध:पतनासाठी जबाबदार असल्याचे विश्लेषण बारू यांनी केले आहे. यूपीए १ आणि २च्या काळात भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात येत असताना ते शांत व निष्क्रिय राहिल्यानेच त्यांची प्रतिमा ढासळत गेली. ‘इतरांनी काही करू दे, मी माझी कामगिरी स्वच्छ आणि प्रामाणिकपणे करेन’ असा त्यांचा दृष्टिकोन होता. ही भूमिका एखाद्या सरकारी बाबूला योग्य असेल, पण देशाचा प्रमुख म्हणून हे चुकीचे होते. याचाच फटका डॉ. सिंग यांना बसल्याचे निदान बारू करतात.
बारू यांच्या पुस्तकातून डॉ. सिंग यांचे चांगल्या प्रकारे स्वभावचित्रण होते. त्याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. सकारात्मक बाजू बारू थेट मांडतात, तर नकारात्मक बाजूंची मांडणी करताना ते वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ देतात. मात्र, बऱ्याचदा ही सर्व मांडणी अनुभव अथवा आठवणी या पातळीवर न राहता विश्लेषणाच्या पातळीवर जाते आणि त्यातून बारू काय दाखवू पाहात आहेत, हेही समजते.
‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पंतप्रधान कार्यालयात काम केलेल्या एखाद्या सचिव वा सल्लागार पदावरील व्यक्तीने केलेले पहिले अनुभवकथन आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयातील वातावरण, कामकाजाची पद्धत, प्रशासकीय पातळीवरील घडामोडी अशा अनेक गोष्टी समजतात.
महाभारताचे युद्ध सुरू असताना आंधळ्या धृतराष्ट्राला युद्धाचे कथन करण्यासाठी श्रीकृष्णाने संजयला दिव्यदृष्टी दिली. त्यामुळे धृतराष्ट्राला युद्ध ‘अनुभवता’ आले. ‘संजय’ बारूंनाही ही संधी होती. मात्र, त्यांनी ते कथन करण्याऐवजी काही गोष्टी न सांगण्यावरच भर दिल्याने हे ‘अकथन’च अधिक आहे.
अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर – द मेकिंग अँड अनमेकिंग मनमोहन सिंग : संजय बारू,  
पेंग्विन इंडिया, नवी दिल्ली,
पाने : ३०१, किंमत : ५९९ रुपये.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….