11 August 2020

News Flash

अरब जगतातील उठाव

गेल्या काही वर्षांत अरब जगतात घडत असलेल्या बदलांविषयी ‘अरब स्प्रिंग’पासून ‘जस्मीन रिव्होल्युशन’पर्यंत अनेक शब्दप्रयोग वापरले गेले

| May 3, 2014 03:04 am

गेल्या काही वर्षांत अरब जगतात घडत असलेल्या बदलांविषयी ‘अरब स्प्रिंग’पासून ‘जस्मीन रिव्होल्युशन’पर्यंत अनेक शब्दप्रयोग वापरले गेले. पण त्यामागच्या मूळ धाग्यादोऱ्यांचा तटस्थपणे शोध घेत प्रत्यक्ष संघर्षभूमीवरील तपशील, प्रसंग यांचा ‘आँखों देखा हाल’ या पुस्तकातून पुढे येतो.
मध्य-पूर्वेतील अरब जगत म्हणजे वैराण, शुष्क वाळवंटी प्रदेश! पण गेल्या काही वर्षांत तिथे वसंताचं आगमन झालं असावं असं वाटण्याजोगी चैतन्यशीलता जाणवत होती. मात्र पुन्हा एकदा, हा आशाकिरण मावळल्याचं जाणवतंय. कारण इजिप्त, लिबिया, सीरिया या देशांत बरंच काही घडत आहे.  अरब जगतात तेथील हुकूमशाही वा लष्करी राजवटीविरुद्ध कधी उठाव होतील असं भाकीत कुणाही राजकीय-विश्लेषकाला, इतिहासतज्ज्ञाला वा राजकारण्याला करता आलं नव्हतं. त्या हुकूमशहांची आपल्या जनतेवरील पोलादी पकड कधी सैल पडेल असं कुणाच्याही मनात आलं नव्हतं, पण त्या साऱ्यांना अलीकडच्या घडामोडींनी, झालेल्या उठावांनी खोटं ठरवलंय.
काय झालं असं? हे उठाव का झाले? एखाद्या वणव्यासारखे किंवा संसर्गजन्य रोगासारखे ते भराभर का पसरत गेले आणि महत्त्वाचं म्हणजे ते उठाव त्या त्या वेळी यशस्वी होऊन तत्कालीन राजवटी कोसळल्यानंतरही या प्रदेशात अस्वस्थता का? जेरेमी बोवेन आपल्या ‘द अरब अपरायझिंग – द पीपल वॉण्ट द फॉल ऑफ द रेजिम’ या पुस्तकात वरील प्रश्नांच्या अनुषंगाने काही मर्मदृष्टी देतो.
२००२पासून बीबीसीचा मध्य-पूर्वेचा संपादक म्हणून काम करणारा बोवेन २००५पासून जेरुसलेम येथे मुक्काम ठोकून होता. या दीर्घकाळात त्याला तेथील राजकीय स्थितीबद्दलची मर्मदृष्टी तर प्राप्त झालीच, पण एकूणच अरब जगतातील बडी प्रस्थं आणि राजकारणी यांच्याशी त्याची चांगली मैत्री जमली. अरब जगतातील या उठावांच्या वेळी तो स्वत: इजिप्त, लिबिया, सीरिया इथे उपस्थित होता. त्यामुळे या पुस्तकातून दर दिवशीच्या, दर आठवडय़ाच्या चकमकी आणि संघर्ष व टय़ुनिशिया, इजिप्त, लिबिया, सीरिया येथील बदलती परिस्थिती यांचेही चित्रण दिसते. ‘अश-शब-युरिद इस्कत-अन निजाम’ (खाली खेचा ही राजवट!) हा अरबी मंत्र उभ्या मध्य-पूर्वेला तसाच साऱ्या जगाला हादरवणारा ठरला. उत्तर आफ्रिकेतील टय़ुनिशियापासून आखाती प्रदेशातील कतापर्यंत हा मंत्र सामान्य अरबी माणसाचा नारा झाला होता. अरेबिक आणि स्थानिक बोलींमध्ये त्याचा वापर करत वर्तमान हुकूमशाही राजवटीला उलथवून टाकण्याचे आव्हान जनता देऊ  लागली होती.
कालक्रमानुसार घटनांचे वर्णन करताना लेखकाने टय़ुनिशिया या काहीशा अपरिचित देशातील प्रसंगापासून आरंभ केला आहे. अनेक दशके तेथे झिन-अल-अबिदिन-बेन अली याची सत्ता होती. १७ डिसेंबर २०१० या दिवशी सकाळी साधारण ११च्या सुमारास टय़ुनिशियाच्या अगदी मध्य भागात असणाऱ्या ‘सिदी बाऊझीद’ नावाच्या सुस्त शहरात ‘मुहम्मद बाउजीजी’ नावाच्या, भाजीची गाडी बेकायदेशीरपणे चालवणाऱ्या विक्रेत्याने शिक्षेच्या भीतीने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. आपल्या या आत्महत्येने साऱ्या अरब जगतात केवढा भयंकर उत्पात घडणार आहे, याची त्या बिचाऱ्याला कोठली कल्पना असणार?
इजिप्त म्हणजे अरब जगतातील प्रभावी सत्ताकेंद्र आणि इस्लामचा चिरेबंदी गड, पण टय़ुनिशियाप्रमाणेच तिथेही वरवर शांत दिसणाऱ्या सामान्य माणसांच्या मनात मात्र तत्कालीन राजवटीबद्दलचा असंतोष खदखदत होता. याच सुमारास एका तरुणाला झालेली कैद, त्याची अमानवी छळणूक व त्यातच झालेला त्याचा अंत, या सर्वाची चित्रफीत यू-टय़ूबवर प्रसारित झाली. २०११च्या पोलीस दिनी कैरोत लोक एकत्र जमले आणि शहराच्या मध्यावर असणाऱ्या ताहरीर चौकाकडे जथ्याने चालू लागले. सोशल मीडियाद्वारे सारे जण एकमेकांशी संपर्क साधत होते. काही जणांनी तेथेच सरकारी कार्यालयांसमोर निदर्शनं करण्याचं ठरवलं होतं. हळूहळू तो आकडा हजारांवर गेला. तेथेच बसून त्यांनी सारी रहदारी रोखली. शहराचे सारे व्यवहारच त्यामुळे बंद झाले. आणि इजिप्तमधील बंडाला आरंभ झाला.
 या प्रसंगानंतर जवळच्या लिबियातही हे लोण पसरले व उठाव झाला. टय़ुनिशिया आणि इजिप्तप्रमाणे तेथेही उठावाची प्रथम सुरुवात ही राजधानी त्रिपोलीपासून दूरच्या गावात झाली व ती धग त्रिपोलीपर्यंत पोचली. गडाफी हा अरब जगतातील सर्वात क्रूर हुकूमशहा होता आणि त्याने खरोखरी सर्वसामान्य जनतेच्या पिढय़ांमागून पिढय़ांचं शोषण करीत त्यांना मतिभ्रष्टही केलं होतं.
आजवरचा इतिहास पाहता, शक्तिमान राजवटी आणि प्रभावी, मोठय़ा धर्मपरंपरा यांच्या क्रॉसरोडवर सीरिया राहिला आहे. तेथेही लिबिया, इजिप्त यांच्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली. फरक एवढाच, की सीरियाचा सर्वेसर्वा बशर असाद हा गडाफीपेक्षा थोडासा सुसंस्कृत आणि इंग्लंडमधून शिक्षण घेतल्याने विकसित देशांचा वारा लागलेला होता. सीरियन लोकांच्या असंतोषाचं कारण होतं हॉम्स प्रदेशात काही तरुणांचा क्रूरपणे करण्यात आलेला वध. याविरुद्ध काढण्यात आलेल्या निषेध मोर्चावर मुक्तपणे गोळीबार करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले होते. त्यात काही तरुणांचा मृत्यूही झाला. यामुळे संतापलेल्या लोकांनी हत्यारं उपसली आणि तिथे सरळसरळ यादवी युद्ध सुरू झालं. त्याचा परिणाम शेजारच्या राष्ट्रांवर प्रत्यक्षपणे, तर बाकी साऱ्या जगावर अप्रत्यक्षपणे झाला.
या साऱ्या घटनांचं वर्णन करताना लेखक अशा निष्कर्षांप्रत येतो की, या साऱ्या उठावांची कारणं आरंभी अगदी सामान्य आहेत. उदा. बेकारी, दडपणं, सर्वत्र सर्रास चालू असणारा भ्रष्टाचार, शिवाय सरकारचा, पोलिसांचा कामांमध्ये होणारा हस्तक्षेप, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी पायमल्ली वगैरे. शिवाय प्रत्येक देशाची एक वेगळी परिस्थिती असतेच की! टय़ुनिशियात त्यामानाने बरीच शांतता असल्याने तेथील सत्तांतर तुलनेनं सहज झालं. इजिप्त मात्र अजून धुमसतोच आहे. लिबियात अजूनही अंतर्गत विरोधी गटांच्या आपापसातल्या लढाया चालूच आहेत. सर्वात अनिष्टसूचक बाब म्हणजे सीरियात घुसलेले जिहादी आणि उत्तर सीरियातील काही भागांत शरियतच्या नियमांचं पालन करण्याचा त्यांनी धरलेला आग्रह!
बोवेन आणखी एका बाबीकडे आपलं लक्ष वेधतो. ती म्हणजे यातल्या सर्व उठावांच्या वेळी बंडखोरांकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव आणि नियोजनाची कमतरता! आपल्याला सत्ता मिळाली तर आपण काय करायचं याची त्यांच्याकडे योजनाच नव्हती. देशातील अराजकाला, जुलमाला ते त्रासले होते, पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय तयार नव्हता.
याबरोबरच लेखक स्पष्ट करतो की, इजिप्तमध्ये मोर्सी लोकशाही पद्धतीने निवडून आल्यावर पाश्चात्त्य देशांनी त्यांचा मान राखायला हवा होता. पण तो ‘मुस्लीम ब्रदरहूड’चा सदस्य आहे याच कारणावरून केवळ पाश्चात्त्यांनी त्याच्याशी बोलणी करण्यास नकार दिला. ज्या वेळी त्याला निर्दयपणे सत्तेवरून खाली खेचून अटक करण्यात आली, तेव्हा या देशांनी त्यात हस्तक्षेप केला नाही. आपल्याला गरज असेल तेव्हा अरबी सत्ताधाऱ्यांचा वापर करून घ्यायचा आणि ते आपल्या जनतेशी कसेही वागले तरी त्याकडे काणाडोळा करायचा, ही त्यांची दांभिक वागणूकही लेखक नमूद करतो.
 जे उच्चपदस्थ प्रसिद्धिमाध्यमांमध्ये झळकतात त्यांच्याखेरीज अगदी वेगळ्याच, खालच्या पदांवरील व्यक्तींचं दर्शन बोवेन यात घडवतो. त्याने त्यांच्या काही कथा अध्र्याच सांगितल्या आहेत आणि पुढे वाचकांच्या कल्पनेवर सोडल्या आहेत. इतिहास घडवण्यामागे नकळतपणे कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींची भेट तो आपल्याला घडवतो. टय़ुनिशियात बेकायदा फळगाडी चालवणारा मोहम्मद बाउजीजी शिक्षेच्या भीतीने स्वत:ला जाळून घेतो आणि इतिहास घडतो. त्या अधिकाऱ्याची भेट बोवेन घडवतो. फेसबुकवरील मजकूर वाचून बंड करायला निघालेल्या ‘झायद इलेलेवी’ला तो भेटतो. निदर्शनांच्या माध्यमातून कैरोवर ताबा मिळवला गेला हे पाहून आश्चर्य आणि अविश्वास यामुळे त्याचं भानच हरपतं. त्रिपोलीत गडाफीचा प्रवक्ता मुहम्मद अब्दुल्ला अल सेनुसी याला बोवेन भेटतो आणि अल्पावधीतच त्याला गडाफीची मुलाखत मिळते. त्या मुलाखतीला जाताना सेनुसी म्हणतो, ‘‘अरे, घाबरू नको. अमेरिकन संस्कृतीचं प्रतीक असणारी जीन्सही आता गडाफी चालवून घेईल, कारण युद्ध आहे ना!’’ ज्याच्याविरुद्ध देशभर उठाव झाले अशा असादची मुलाखत, विविध देशांच्या राजदूतांच्या भेटींच्या वर्णनांतून लेखक खूप मार्मिक निरीक्षणे मांडतो. अरब जगतातील उठाव आणि हा अल्पकालीन वसंत ऋतू याबद्दल पुष्कळ लिहिले गेले आणि अजूनही लिहिले जात आहे. त्या साऱ्यांत हे पुस्तक आपल्या चित्रदर्शी वर्णनशैलीमुळे व सत्यदर्शनामुळे उठून दिसते.
  हे वाचताना अपरिहार्यपणे आपल्या देशातील राजकीय चित्र डोळ्यांपुढे येते. आधी राजकीय की आधी सामाजिक या वादापासून गांधींच्या अहिंसेच्या चळवळीपर्यंत! ‘सत्याचा आग्रह धरल्यानेच हवा तो परिणाम घडवता येतो’ हे म. गांधींनी दाखवून दिले. मात्र कोणत्याही बदलासाठी संघटन, योजना, विचार, पर्याय हा असावाच लागतो हेच यातून अधोरेखित होते.
द अरब अपरायझिंग – द पीपल वॉण्ट द फॉल ऑफ द रेजिम  – जेरेमी बोवेन,
सायमन अँड शुस्टर, यू.के.,
पाने : ३३९, किंमत : १५ पौंड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 3:04 am

Web Title: the arab spring
Next Stories
1 साथीदार की व्यावसायिक?
2 अजूनही रुतून आहे!
3 बनवाबनवीची पाक-कृती
Just Now!
X