निव्वळ कथेसाठी गेली १५ वर्षे दिल्या जाणाऱ्या आणि आफ्रिकी बुकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘केन’ पुरस्कारांची नामांकने नुकतीच जाहीर झाली आहेत. दोन हजारोत्तर आफ्रिकी साहित्याला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान आणून देण्यात या पुरस्काराचे महत्त्वाचे योगदान असून, त्याने आफ्रिकी खंडातील कथालेखकांची फौज घडविली आहे. यानिमित्ताने या नव्या कथाविश्वावर दृष्टिक्षेप..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अज्ञात प्रदेशातून किंवा तळागाळातून तयार झालेल्या साहित्याला काही काळापुरते प्रचंड वलय तयार होते. हे वलय आपल्याकडे दलित साहित्याच्या रूपाने पाहायला मिळाले होते. पण जगभरातील साहित्यात गेल्या शे-दीडशे वर्षांत हा प्रकार घडत आला आहे, आणि त्याची आवर्तने अद्याप संपलेली नाहीत. अमेरिकी साहित्य वाचणाऱ्याला न्यूझीलंडच्या आदिवासी जमातींमधून तयार होणाऱ्या साहित्यातील जग चकित करणारे असू शकते, तसेच खुद्द अमेरिकेतील आर्थिकदृष्टय़ा मागास भागातून तयार होणाऱ्या साहित्याचा वेगळा रूपबंध असू शकतो. अमेरिकेत जगभरातून स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांच्या साहित्यातून सांस्कृतिक संकराची झलक वैविध्यपूर्ण दिसू शकते. आजघडीला ‘कथा’ या साहित्य प्रकाराला सार्वत्रिक ओहोटी लागण्यास सुरुवात झाली असली, तरी अमेरिकी नियत, अनियतकालिकांच्या पसाऱ्यामुळे तो चांगल्या अवस्थेत टिकून आहे. अमेरिकी मासिकांतील सर्वोत्तम कथा निवडणाऱ्या ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ या वार्षिक पुस्तक प्रकल्पाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. न्यूयॉर्कर, अमेरिकन रीडर, व्हाइस, टिन हाऊस या आणि त्यांच्यासारख्या शेकडो नियतकालिकांमधून कथा आणि कथालेखनाला अमर्याद व्यासपीठ उपलब्ध आहे. काही हजार डॉलरच्या शिष्यवृत्त्या आणि पारितोषिकांमुळे जागतिक ओहोटी अवस्थेतही अमेरिकी कथा मरणवाटेला लागू शकत नाही. अमेरिकी कथेनंतर दुसरीकडे आफ्रिकी कथांना गेल्या दीड दशकात मोठे बाळसे आले आहे. अज्ञात प्रदेशातील जगण्याचा प्रवाह या कथांतून उमटत असल्यामुळे त्या लोकप्रिय होत आहेत हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय २००० साली सुरू झालेल्या आणि ‘आफ्रिकी बुकर’ ही ओळख असलेल्या ‘केन पारितोषिका’चाही या कथाघुसळणीत मोठा वाटा आहे.
सर मायकेल केन या बुकर पारितोषिकाच्या मंडळातील सदस्याच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या पारितोषिकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आफ्रिकेतील नोबेल पारितोषिक विजेत्या वोल सोयिंका, नदिन गॉर्डिमर, नगिब महेफूज, जे.एम. कोएट्झी यांच्या मदतीचा हात पुढे आला. गेल्या १५ वर्षांत या पुरस्काराने आफ्रिकेतील तळागाळातील अतिअज्ञात परिसरात वाढलेल्या लेखकांना लिहिते केले. आफ्रिकी मुर्दाड वस्त्या, वाळवंटातील विचित्र जगणे, युद्धग्रस्त प्रदेश, निर्वासितांच्या, स्थलांतरितांच्या भीषण सत्यकथा, कल्पनातीत गरिबी, जगभरातील मदतीच्या ओघामुळे घडणारे जागतिकीकरण किंवा निव्वळ अमेरिकीकरण यांचे चित्र आफ्रिकी कथांमधून जन्मायला लागले. याआधी नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या किंवा आपल्या लेखनामुळे प्रसिद्ध झालेल्या चिनुआ अचेबे, बेन ओकरी आणि मूठभर आफ्रिकी लेखकांनी अज्ञात आफ्रिकेचा परिचय जगाला करून दिला होता. पण पुढे तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या विविध घटकांनंतर या जगण्यात जी घुसळण झाली ती थेट मांडणारी चिमामांदा गोझी अदिची, ई.सी. ओसोंडू, नो व्हायोलेट बुलावायो, ए. इगोनी बॅरेट, टोप ई फोरलेन, हेलोने हबीला या नव्या लेखकांची पिढी समोर आली. हेलोन हबीला या नायजेरियन लेखकाने ग्रँटा मासिकाला मागे दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ब्रिटिश कथा स्पर्धेत पारितोषिक मिळवण्याचा हेतू हा निव्वळ दोन आठवडे मोफत युरोपची सफर. नव्वदीच्या काळात आफ्रिकेतील अनेक तरुण लेखक या कथा स्पर्धामुळे देशसीमा ओलांडू शकत होते. कधीही न पाहिलेल्या सुखवस्तू आणि सुरक्षित देशांची सैर करू शकत होते.
केन पारितोषिकातून समोर आलेल्या सुदान, नायजेरिया, झिम्बाब्वे, युगांडा, सिएरा लिओन, केनया, घाना या आफ्रिकी देशांमधील इंग्रजी कथांना गेल्या दीड दशकात जगभर वाखाणले गेले आहे. पट्टीच्या वाचकांना या पारितोषिकांची शॉर्टलिस्ट अत्यंत महत्त्वाची वाटते, कारण त्यात दाखल झालेल्या नव्या लेखकांचे सारे साहित्य ऑनलाइन उपलब्ध असते. केन पारितोषिकासाठी नामांकित झालेल्या पाचही कथा दरवर्षी जगभरातील वाचक पीडीएफ स्वरूपात वाचू शकतात (यंदाही त्या वाचता येतीलच). शिवाय त्यांच्या वेबसाइट्सवरून ताजे आफ्रिकी साहित्य प्रसिद्ध करणाऱ्या ऑनलाइन नियतकालिकांपर्यंत पोहोचण्याचा मार्गही तयार होतो.
चिमामांदा गोझी अदिची यांच्या सुखवस्तू नायजेरियन कुटुंबाच्या बऱ्याच कथा न्यूयॉर्कर साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. दोन देशांतील जगण्यातील भिन्नता, विचारांमधील भिन्नता, प्रगत-मागास विचारांचा संघर्ष त्यांच्या कथेचा मुख्य गाभा असतो. केन पारितोषिकाचा या लेखिकेच्या प्रसिद्ध होण्याशी संबंध नाही, पण केन पुरस्कारांनी पुढे आलेल्या पिढीची ही लेखिकाही प्रतिनिधी आहे.
ई.सी. ओसोंडू या लेखकाच्या खणखणीत नायजेरियाई कथांना अमेरिकी मासिकांकडून आणि त्यांच्या विस्तारलेल्या वाचकांकडून मोठी मागणी आहे. ‘वेटिंग’ ही केन पुरस्कार मिळविणारी त्यांची लघुकथा घडते नायजेरियातील निर्वासित छावण्यांमध्ये. युद्धग्रस्त लहान मुले या छावणीत रेडक्रॉस संस्थेच्या साह्य़ाने जगत आहेत. तेथून त्यांना मिळालेल्या टीशर्ट्सवर लिहिल्या गेलेल्या नावांनी त्यांची नावे तयार झाली आहेत. ऑरलॅण्डो, लंडन, पॅरिस अशा नावांची ही मुले अमेरिकेतून आपल्याला कुणी तरी उदार व्यक्ती दत्तक घेतील या आशेवर एका फोटोग्राफरची वाट पाहत आहेत. या फोटोग्राफरकडून हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या आपल्या छबीला रेडक्रॉस अमेरिकेत प्रसिद्ध करेल, तेथे ते छायाचित्र पाहून द्रवलेली उदार व्यक्ती आपल्याला दत्तक घेईल, एवढीच त्यांची आस आहे. मात्र फोटोग्राफर युद्धग्रस्त प्रदेशात अडकला असल्याने त्यांच्या वाट पाहण्याच्या दुरवस्थेत किंचितही बदल होत नाही. त्या छावणीत साहित्य वाचणाऱ्या मुलाकडून या छावणीचे शब्दचित्र तयार झाले आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्था आफ्रिकेतील मुलांसाठी करीत असलेल्या मदतीचे आपल्यासमोर दिसणारे चित्र आणि ओसोंडू यांनी मांडलेले या कथेतील वास्तव धक्का देणारे आहे. यातील निवेदक वेटिंग फॉर गोदोही वाचतो आणि चार्ल्स डिकन्सचा प्रसिद्ध अनाथ ऑलिव्हर ट्विस्टही वाचतो. दोन कुशल वाक्यांत तो आपल्या स्थितीपुढे या साहित्यकृती किती नगण्य आहेत, याचा दाखला देतो. त्यांच्या अनेक कथांमध्ये नायजेरियातील तळागाळात वसणारे अमेरिकाप्रेम येते. ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’ या त्यांच्या कथासंग्रहातील सगळ्याच कथांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अमेरिकाळलेली आत्ताची नायजेरियाई पिढी येते. बोको हराम या दहशतवादी संघटनेचा उच्छाद, गुंडगिरी, भ्रष्टाचार यांच्या बातम्यांमधून जगाला परिचित असलेल्या नायजेरियाची खरी ओळख पटवून घ्यायची असेल, तर ओसोंडूंच्या कथा वाचणे अनिवार्य आहे. नायजेरियाई सिनेमामध्ये काम करण्यास आलेला अमेरिकी ‘अवर फर्स्ट अमेरिकन’, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून डोळ्यांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी मिळालेल्या अनुदानाबाबत ‘जिमी कार्टर्स आईज’, टॉर्चर चेंबरमध्ये निव्वळ कथा सांगण्याच्या कौशल्यावर वाचणाऱ्या कैद्याची गोष्ट ‘सिम्पल केस’ आदी ओसोंडू यांच्या कथा नायजेरियाविषयी आपल्या मनात वरवर असलेल्या गैरसमजांना बदलून टाकतात. त्यांच्या कथेत शिकलेली, मॉलमध्ये जाणारी, वीकेण्ड बाहेर साजरा करणारी आणि तारांकित हॉटेलमध्ये वावरणारी आजची पिढीही येते.
ओसोंडूइतकीच केन पारितोषिकामुळे जगभरात पोहोचलेली दुसरी साहित्यिक आहे झिम्बाब्वेची नो व्हायोलेट बुलावायो. तिच्या ‘वी नीड न्यू नेम’ या कादंबरीला बुकरच्या लघुयादीतही स्थान मिळाले होते. ‘हिटिंग बुडापेस्ट’ नावाच्या तिच्या याच कथामालिकारूपी कादंबरीतील पहिल्या कथेला केन पारितोषिक मिळाले होते. अत्यंत गरीब वस्तीतून पेरू चोरून खायला निघालेल्या ओंगळवाण्या मुला-मुलींच्या जथ्याचा प्रवास यात येतो. निवेदिका आपला हात धरून या जथ्यासोबत आपल्याला पेरूचोरीच्या प्रवासात सामील करते आणि कोळपलेल्या बाल्याचे आपण (इराणी सिनेमा वगैरेंमधील) यापूर्वी घेतलेले किंवा मनात आणलेले धक्के विसरून जातो. निवेदिका अभिनिवेश न आणता थेटपणे आपल्या परिस्थितीचे वर्णन करीत जाते. तयार झालेल्या पेरूंवर ही मुले पहारेकऱ्याला टाळून ताव मारतात. त्यांच्याकडे खायला, नेसायला किंवा पाय झाकायला असलेली दैनावस्था उमजल्यावर अनंतक्षणासाठीची सुन्नता ही कथा वाचणाऱ्याला देते. या लेखिकेच्या कथांनी आणि तिच्या ब्लॉग व इतर लिखाणामुळे, झिम्बाब्वेत लिहू लागणारी नवी पिढी तयार होत आहे.
केन पारितोषिकांनी आफ्रिकी आणि नायजेरियाई साहित्याकडे जगाकडून लक्ष वेधले जात असतानाच ए. इगोनी बॅरेट या नायजेरियाई लेखकाचे नाव कथांसाठी दुमदुमू लागले. बीबीसीच्या कथापुरस्कारानंतर त्यांच्या अनेक कथांना अमेरिकी, ब्रिटिश मासिकात मानाचे स्थान मिळाले आहे. ‘लव्ह इज अ पॉवर, ऑर समथिंग लाइक दॅट’ या त्यांच्या कथासंग्रहात अमेरिकेत आणि आफ्रिकी देशांत सातत्याने ये-जा करणाऱ्या उच्चभ्रू आफ्रिकींच्या जगण्याची बाजू येते. ‘ए नैरोबी स्टोरी ऑफ कमिंग अ‍ॅण्ड गोइंग’ ही त्यांची कथा आपल्यासाठी वाचणे महत्त्वाचे आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये भारतीय नागरिकांनी मॉल आणि सुपरमार्केट उघडली आहेत. तिथे भारतीयांकडून काळ्या आणि गोऱ्यांबाबत होणाऱ्या भेदभावाची ही कथा आहे. या भेदभाव करणाऱ्या भारतीय मालकाला नायकाने सुनावलेल्या गोष्टी गमतीशीर तरी आफ्रिकेचे वास्तव दर्शविणाऱ्या आहेत.
टोप ई फोरलेन या लेखकाच्या मिरॅकल या कथेला केन पारितोषिक मिळाले आहे. अमेरिकेतील आफ्रिकी नागरिकांच्या वसाहतीमध्ये ती घडते. अमेरिकेत नायजेरियातून स्थलांतरित झालेल्या व्यक्ती या लेखकाचा कथाविषय असतात. ‘समर ऑफ आईस्क्रीम’ या कथेमध्ये त्याने नायजेरियातून अमेरिकेत वसणाऱ्या कुटुंबाचे सूक्ष्मदर्शी चित्रण वाचकाला घडवून दिले आहे. वास्तव आयुष्यावर बेतलेली त्यांची ही कृती कथाप्रेमींना खूप आवडून जाईल.
ताये सेलासी (घाना मस्ट गो, सेक्स लाइव्ज ऑफ आफ्रिकन गर्ल्स) या लंडनमध्ये जन्मलेल्या, अमेरिकेत वाढलेल्या आणि तरीही आफ्रिकेतील घाना राष्ट्रात मुळे शोधणाऱ्या लेखिकेच्या साहित्यात ग्लोबलायझेशननंतरचा घाना देश येतो. एडविज डॅण्टिकॅट या हैतीमध्ये जन्मलेल्या आणि अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लेखिकेने हैती या देशाला अमेरिकी पटलावर आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांनी तेथील लेखकांना एकत्रित करणारे ग्रंथही संपादित केले आणि हैतीमधील भीषण जगण्याला न्यूयॉर्करच्या पानांमध्ये ग्रथित केले आहे. हैतीमधील राजकीय घडामोडी, गँगस्टर परंपरा, भ्रष्टाचार आणि सामान्य माणसाची चिपाड अवस्था त्यांच्या कथांमध्ये प्रामुख्याने येते.
जगातल्या कुठल्याही भागामध्ये साहित्यातून आज हरवत चाललेल्या किंवा नष्ट होत चाललेल्या मुळांचा, नीती- मूल्य- संस्कृती यांच्या ऱ्हासाचा शोध घेतला जात आहे. जग सपाट होताना आयुष्याला कुठलीच मुळे बांधून ठेवत नाहीत. ग्लोबल होताना मातीतले- देशीवाद कुरवाळणारे साहित्य मागे पडत आहे. त्या धर्तीवरच आफ्रिकी कथा या रूपबंधापासून पुरत्या अमेरिकाळल्यात.  आजच्या अमेरिकी कथेला परंपरा आहे ती गेल्या काही दशकांमध्ये तयार झालेल्या फिक्शन रायटिंग प्रोग्राम्ससारख्या कृत्रिम प्रोत्साहकाची. गॉर्डन लिश या कथा संपादकाने तयार केलेल्या कथालेखक-शिक्षकांची दुसरी आणि तिसरी पिढी सध्या अमेरिकी (पर्यायाने जागतिकही) कथापटलावर कार्यरत आहे. त्यामुळे या कथांमध्ये जाणीवपूर्वक आणला जाणारा बेतीव, आकर्षक रूपबंध आफ्रिकी साहित्यामध्ये उतरलेला दिसतो. या कथांमधील नाटय़ाने आणि त्यातील टोकाच्या वर्णनांची रूपे आफ्रिकेतील वाचकांपेक्षाही मोठय़ा प्रमाणात जगातील वाचकांना समोर ठेवून लिहिलेला जाणवतो. (आपल्याकडे एका प्रसिद्धीकाळानंतर दलित-तळागाळातील साहित्यही विशिष्ट उच्चभ्रू वाचक समोर ठेवून मोठय़ा प्रमाणावर येऊ लागले होते.) पण हा रूपबंध सर्वमान्य झालेला असल्यामुळे त्याला स्वीकारत नवे काही देऊ पाहणाऱ्या कथांना दरवर्षी केन नावाचे ‘आफ्रिकी बुकर’ पुढे आणून लेखक आणि या साहित्य प्रकाराविषयीही मोलाचे योगदान देत आहे.
आपल्याला यंदाच्या ‘आफ्रिकी बुकर’चा विजेता येत्या ७ जुलै रोजी कळेलच. १७ देशांतील पाच कथाकारांची लघुयादी आणि त्यांच्या कथा ऑनलाइन दाखल झाल्या आहेत. पाचही कथा अतिअज्ञात आफ्रिकी पाश्र्वभूमीला समोर आणणाऱ्या, तरी जागतिक परिमाण लाभलेल्या आहेत. ‘लोन्ली प्लानेट’ पुस्तकांमधून, आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या शोधपत्रकारांच्या वास्तवकथांमध्ये, डिस्कव्हरी-नॅशनल जिऑग्राफिकच्या डॉक्युमेण्ट्रीजमध्ये जे सापडणार नाही, ते या कथांमध्ये सहज सापडून जाईल. गरज आहे या आफ्रिकी कथेच्या जगात फक्त एकदा डोकावण्याची. त्यानंतर मग वाचनविस्ताराच्या अवस्थेत जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरणार नाही.
कमल राजे  – loksatta@expressindia.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The caine prize for african writing
First published on: 20-06-2015 at 01:17 IST