22 April 2019

News Flash

बांगलादेशनिर्मिती आणि नंतर

१४ डिसेंबर १९७१ रोजी याह्य़ाखानने लढाई थांबवण्यासाठी लेफ्ट. जन. नियाझींला निरोप पाठवला. १७ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता रेसकोर्सवर लेफ्ट. जन. अरोरांनी हजारोंच्या साक्षीने शरणागतीच्या

| January 31, 2015 12:50 pm

१४ डिसेंबर १९७१ रोजी  याह्य़ाखानने लढाई थांबवण्यासाठी लेफ्ट. जन. नियाझींला निरोप पाठवला. १७ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता रेसकोर्सवर लेफ्ट. जन. अरोरांनी हजारोंच्या साक्षीने शरणागतीच्या करारावर नियाझींची सही घेतली. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही.. प्रचंड संशोधन करून लिहिलेले हे पुस्तक अवश्य वाचावे.

१९४८च्या पाकिस्तान जनरल असेम्ब्लीत धीरेन्द्रनाथ दत्त यांनी बंगालीलाही राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे उत्साहपूर्ण भाषण केले त्यामध्ये स्वतंत्र बांगलादेशाच्या मागणीची मुळे रुजलेली आहेत. धीरेन्द्रनाथांच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या. पाकिस्तान सरकारने बंगाली नववर्षदिन आणि टागोरांची जयंती साजरी करायला बंदी घातली. त्याचा परिणाम उलटाच झाला. तरुण विशेषत: विद्यार्थी ते दोन्हीही अधिक जोरात साजरी करायला लागले. बंगाली मुस्लीम स्त्रियाही कपाळावर कुंकू लावतात. टीव्हीवर बातम्या वाचणाऱ्यांनी तसे लावायला बंदी आली पण मुस्लीम स्त्रियांनी त्याचा निषेध केला. १९५२च्या भाषिक आंदोलनापासून बांगलादेशाच्या स्वातंत्र्याची चिन्हे दिसू लागली. बंगाल्यांच्या निष्ठेबद्दल पश्चिम पाकिस्तानी नेहमीच साशंक असायचे. बंगालीपणा आणि इस्लाम हे  परस्परविरोधीच असले पाहिजेत, ते एक असूच शकत नाहीत अशी दृढ कल्पना पाकिस्तान्यांची होती. लेखकाच्या मते तशी समजूत भारतातही आहे.
फाळणीच्या वेळचा मुख्यमंत्री सुरहावर्दी होता. ४६ सालच्या दंगलींना भारतात त्याला जबाबदार धरतात तर बांगलादेशात सुरहावर्दी हिरो आहे आणि शेख मुजिबुर रहमान त्याचा शिष्य आणि उजवा हात होता. त्या वेळेस त्याने पाकिस्तानचा झेंडा उभारला होता.  १९६८-६९ मध्ये ‘आगरताला षड्यंत्र’ म्हणून ओळखलेल्या खटल्यात मुजिबुर रहमान आणि अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना आरोपी केले होते. एका आरोपीला पाकिस्तानी सुरक्षा रक्षकाने गोळ्या घालून ठार मारले त्यानंतर दंगल होऊन अनेक कागदपत्रे जाळली गेली. सरकारने खटला काढून घेतला. मुजिब सुटल्यावर त्याला लोकांनी ‘बंगबंधू’ म्हणून डोक्यावर घेतला. आता पूर्व पाकिस्तानचा तो र्सवकष नेता झाला. तिकडे आयुबखान पदच्युत होऊन याह्य़ाखान हुकूमशहा बनला. १९७० मध्ये निवडणुका तोंडावर आल्या. कुस्तीच्या जंगी मदानात दोन पलवान आमनेसामने उभे राहिले.
पूर्व पाकिस्तानातील ताग, चहा वगरे निर्यात करून पाकिस्तानला खूप विदेशी चलन मिळे पण आयात मात्र पश्चिमेला मिळायची. विकासाचाही जास्त वाटा पश्चिमेला मिळायचा. पूर्व पाकिस्तानी लोकांच्या लवकरच लक्षात आले की, त्यांची आíथक पिळवणूक होत आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. पूर्व पाकिस्तानच्या १६२ पकी १६० जागा  आवामी लीगने जिंकल्या. ३०० सभासदांच्या राष्ट्रीय असेम्ब्लीत मुजिबला स्पष्ट बहुमत मिळाले. तरीही झुल्फिकार ली भुट्टोशी संगनमत करून याह्य़ाखानाने मुजिबला सरकार स्थापनेसाठी बोलावले नाही. ७ मार्चला ढाक्याच्या रेसकोर्सवर अतिविशाल समुदायासमोर केलेल्या जहाल आणि प्रभावी भाषणात मुजिबने फक्त स्वतंत्र बांगलादेशाची घोषणा करणे बाकी ठेवले. त्याने बंगालीशिवाय इतर भाषिकांना आणि िहदूंना  सुरक्षेची हमी दिली. स्वत: स्वातंत्र्याची घोषणा न करता पुढचे पाऊल सरकारने उचलण्यासाठी तो थांबला. पण ते पाऊल केवढे दुष्परिणाम करेल याची कल्पना त्याला आली नाही.  
याह्य़ाखानाने पूर्व पाकिस्तानचा गव्हर्नर बदलून टिकाखानला पाठवले. पूर्व पकिस्तानच्या न्यायमूर्तीनी त्याला शपथ द्यायला सपशेल नकार दिला. २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून टिकाखानच्या सन्याने पुढील ८-९ महिने जो नरसंहार चालवला त्याच हृदयद्रावक वर्णन लेखकाने खूप संशोधन करून लिहिले आहे. मुजिबला अटक करून पश्चिम पाकिस्तानात पाठवून देण्यात आले. मेजर झिया उर रहमानने मुजिबच्या वतीने पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा २७ मार्चला गुप्त रेडिओ केंद्रावरून केली. ब्लड नावाच्या अमेरिकेच्या ढाक्यातील राजदूताने पाठवलेल्या तारांवरून निक्सन, किसिंजर आणि याह्य़ा यांनी कशी कूटनीती खेळली याचेही वर्णन आले आहे.
बंगाली निर्वासित चुकनगर नावाच्या गावात जमून तिथून चालत सरहद्द ओलांडून भारतात येत असत. एक दिवस दोन ट्रक भरून सनिक तिथे आले आणि बेछूट गोळीबार करून दहा हजारांवर स्त्री-पुरुषांना मारून गेले. शर्मिला बोसने  लिहिलेल्या ‘डेड रेकिनग’  या पुस्तकात चुकनगर नरसंहाराबद्दल आक्षेप घेऊन ती संख्या एक हजाराच्या आत असली पाहिजे. दोन ट्रकमध्ये किती सनिक, त्यांच्या एकूण गोळ्या किती, किती गोळ्या माणसांना प्रत्यक्ष लक्ष्य करतील आणि त्यातल्या कितींचे प्राण जातील याचे गणित करून दाखवायचा प्रयत्न केला आहे. पण ज्या वेळी बंगाल्यांनी बिहारींना मारले त्या वेळी कुठलाही आक्षेप अथवा संशय न घेता ती मृतांची संख्या स्वीकारते. लेखकाच्या मते शर्मिला बोसचे लेखन पाकिस्तानधार्जणिे आहे आणि कसेही पहिले तरी मानवतेविरुद्ध पाकिस्तानचा तो एक भयंकर गुन्हा होता यात शंका नाही.          
 पूर्व पाकिस्तानात सन्य घुसवण्याचा निर्णय घेणे भारताला फार कठीण होत. पश्चिम बंगाल आणि पूर्व पाकिस्तान एक होऊन एका अखंड स्वतंत्र बंगालची मागणी करतील अशी शक्यताही नाकारता येत नव्हती. १९६३ पर्यंत भारतीय घटनेने तशी मुभा राज्यांना दिलीही होती. इंदिरा गांधींनी रशियाशी २० वर्षे मुदतीचा मत्री, शांती आणि सहकार्याच्या  केलेल्या करारास लेखक ‘राजकारणातला मास्टर स्ट्रोक’ म्हणतो. निक्सनने त्याला स्वत:चा वैयक्तिक अपमान समजला. मे महिन्यापासून भारताने मुक्तिवाहिनीला गनिमी  युद्धाचे शिक्षण देणे चालू केले होत. त्यांच्या कादर सिद्दिकीचा तर पाकिस्तानी सनिकांनी धसकाच घेतला होता. त्याला चे गेवारा म्हटले आहे.  प्रत्यक्ष लढाईच वर्णन त्रोटक आहे. १४ डिसेंबरला याह्य़ाखानने लढाई थांबवण्यासाठी लेफ्ट. जन. नियाझींला निरोप पाठवला. १७ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता रेसकोर्सवर लेफ्ट. जन. अरोरांनी हजारोंच्या साक्षीने शरणागतीच्या करारावर नियाझींची सही घेतली. तिथे जाताना प्रक्षुब्ध बंगाली जमावापासून नियाझींचे रक्षण भारतीय सनिकांनी केले; नाही तर नियाझींची काही धडगत नव्हती. नियाझींची तलवार आणि पिस्तूल काढून घेतले, असे लेखकाने न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीदाराचा हवाला देऊन लिहिले आहे. पण लेफ्ट.जन. जेकबच्या २४११ील्लीि१ ं३ ऊँं‘ं पुस्तकात नियाझींनी ‘माझ्याकडे तलवार नाही’ असे म्हटल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्याच फक्त पिस्तूलच काढून घेतले.  लेखक म्हणतो भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही. भारताचे सन्य पाहिजे तेव्हाच गेले आणि काम झाल्यावर लगेच बाहेर पडले. नऊ महिन्यांच्या मुक्तिसंग्रामात अनेक पाकिस्तानी सनिकांनी अनेक बंगाली स्त्रियांवर बलात्कार केले. त्यांनी ते पद्धतशीरपणे केले.
१० जानेवारी १९७१ ला मुजिब पाकिस्तानी कैदेतून मुक्त होऊन स्वतंत्र बांगलादेशास परतला. त्याचे अभूतपूर्व स्वागत झाले. देश उभारणीसाठी त्याने सोविएत पद्धतीची अर्थनीती स्वीकारून राष्ट्रीयीकरण सुरू केले. तागाची निर्यात क्युबाला केली त्याबरोबर अमेरिकेकडून येणारी अन्नधान्य मदत बंद झाली. नित्य लागणाऱ्या वस्तूंचा बाजारात तुडवडा भासू लागला. पण त्यानेच स्थापन केलेल्या ‘जातीय राखी वाहिनी’च्या कार्यकर्त्यांना त्या काळ्या बाजारात मिळू लागल्या. त्याच्या अवामी लीगचे नेते तस्करी, चोरटय़ा व्यापारात गुंतले होते. मुजिबची  विश्वासार्हता झपाटय़ाने कमी होऊ लागली. स्वतंत्र बांगलादेशापेक्षा पाकिस्तानच बरे होते असे लोकांना वाटू लागले. त्यात भर म्हणून त्याने सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी घालून फक्त त्याच्याच एका पक्षाला मान्यता दिली. ‘एक नेता एक देश, शेख मुजिब बांगलादेश’ ही घोषणा सुरू केली. मुक्तीनंतर २-३ वर्षांतच बांगलादेश एक टिनपाट हुकूमशाही दिसू लागली. या परिस्थितीमध्ये सन्यातल्या मेजर फारुख रहमान आणि इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी कट रचला. इंदिरा गांधींनी त्याची गुप्त माहिती मुजिबला पुरवली होती. १५ ऑगस्ट १९७५च्या पहाटे मुजिबसकट सर्व कुटुंबीयांचा, पत्नी, मुलगी, १० वर्षांचा मुलगा, जावयासह सर्वाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. संशयाची बाब ही की, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने ५० हजार टन तांदळाची मदत जाहीर केली. नंतर आलेल्या खोंडकरने मारेकऱ्यांना ‘शुजरे संतान’ म्हणजे ‘सूर्यपुत्र’ असे गौरवले. पुढील एक-दोन वर्षांत बरीच उलथापालथ, अनेक राजकारण्यांची हत्या होऊन लेफ्ट. जन. झिया उर रहमान हुकूमशहा झाला.    
झियाने बांगलादेशाचे इस्लामीकरण सुरू केले. १९८१ साली मुजिबची मुलगी शेख हसीनाला पुन्हा मायदेशी येण्याची परवानगी दिली. ३० मे १९८१ ला झियाची हत्या झाली आणि त्या राजकीय/लष्करी  पोकळीत जनरल इर्शादने हस्तक्षेप सुरू केला. उपराष्ट्रपती सत्तार निवडणूक जिंकून राष्ट्राध्यक्ष झाले. पण लष्करी क्रांतीत इर्शादने त्यांना हटवून तो हकूमशहा झाला. त्याच्या राजवटीत इतकी अंदाधुंदी झाली की, १९९०मध्ये त्यालाही राजीनामा द्यावा लागला. मग झालेल्या निवडणुकीत जनरल झियाची विधवा पत्नी खालिदा आणि तिची बांगलादेश नॅशनल पार्टी विजयी झाले.  पुढील काळ खालिदा झिया आणि शेख हसीना यांनी आलटून पालटून निवडणुका जिंकल्या आणि त्या पंतप्रधान किंवा विरोधी पक्षनेत्या राहिल्या. सत्तेत आल्यावर हसीनाने मुजिबच्या मारेकऱ्यांना अटक करवून खटले भरवले. फारुख रहमानसकट पाच जणांना फाशीची शिक्षा झाली. २०१० साली म्हणजे हत्येनंतर ४० वर्षांनी त्या अमलात आल्या. लेखकाने मुलाखत घेतल्यावर लिहिले आहे ‘फारुखच्या बोलण्यात किंवा चेहऱ्यावर पश्चात्तापाची भावना अजिबात नव्हती’. आज बांगलादेश ‘इस्लाम अधिकृत धर्म असलेला सेक्युलर’ असा विचित्र देश आहे. ज्या पाकिस्तान्यांनी अत्याचार केले त्यातल्या १९५ लोकांची नावे पाकिस्तानला दिली होती, पण त्यातल्या एकावरही पाकिस्तानात खटला भरला गेला नाही याचे आपल्याला अजिबात आश्चर्य वाटत नाही.
पुस्तकात एखादा नकाशा असता तर वाचताना संदर्भासाठी उपयोगी पडला असता. पुस्तकाच्या कव्हरवर साडी नेसलेल्या पण चोळी नसलेल्या, ६ ते ७ महिने गरोदर, शून्यात भकास दृष्टी लागलेल्या स्त्रीचा फोटो वाचकाला पुस्तकातला  बराच मजकूर सांगून जातो. चार पाने भरून संदर्भग्रंथांची यादी आणि  खूप संशोधन करून लिहिलेले हे पुस्तक अवश्य वाचावे.                
    
द कर्नल हू वूड नॉट रीपेंट द बांगलादेश वॉर अ‍ॅण्ड इट्स अनक्वाएट लेगसी
ले. सलिल त्रिपाठी
प्र. अलेफ बुक कं.
पृ. ३८२, किंमत रु. ५९५
 

First Published on January 31, 2015 12:50 pm

Web Title: the colonel who would not repent