21 March 2019

News Flash

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८२. अखेर

जगणं स्वअर्पित आहे तो स्वतपुरतं जगत असतो. जगणं समर्पित आहे तो ज्याला ते समर्पित आहे त्याच्याचसाठी जगत असतो. जो परमात्म्याच्याच प्रेमात जगत आहे तो एकरसात,

| December 22, 2012 12:07 pm

जगणं स्वअर्पित आहे तो स्वतपुरतं जगत असतो. जगणं समर्पित आहे तो ज्याला ते समर्पित आहे त्याच्याचसाठी जगत असतो. जो परमात्म्याच्याच प्रेमात जगत आहे तो एकरसात, एका लयीतच जगेल. ती लय, तो रस आहे प्रेमाचा. त्यात एका क्षणाचाही खंड पडणार नाही. क्षणाचीही उसंत नाही. न पल बिछुड़े पिया हम से, न हम बिछुड़े पियारे से। हो एसी लव लगी हरदम, हमन को बेकरारी क्या।। परमात्मा आणि त्याच्यापासून क्षणभरही विभक्त नसलेला त्याचा भक्त दोघे एका लयीत असे मग्न आहेत की बेकरारी, बेचैनी म्हणून काही उरलेलीच नाही.  अशी स्थिती ज्यांना हवी आहे, जे या प्रेमाच्या मार्गावर येऊ इच्छितात त्यांना या भजनाच्या अखेरीस कबीर सांगतात, कबीरा इश्क का माता, दुई को दूर कर दिल से। ये चलना राह नाजुक है, हमन शिर बोझ भारी क्या।। हृदयातून दुजेपणा दूर करा आणि प्रेमाचा हा मार्ग इतका नाजूक आहे की ओझं डोक्यावर लादून चालू नका! ‘मी’पणातूनच समस्त दुजेपणा निर्माण होतो. प्रेमाच्या मार्गावर ‘मी’ अंशमात्रही उरत असेल तर प्रेमात परिपूर्णता नाही. तोवर परमात्म्याशी खरं ऐक्य नाही. शहरयार ‘परवाज़्‍ा’ यांचा शेर आहे, ‘अब तक था अपना होश वो रहते थे दूर दूर। अब आ गए करीब तो अपना पता नहीं।।’ जोवर ‘मी’पणाचा होश आहे तोवर तो परमात्मा दूरच असतो. जेव्हा तो जवळ येतो तेव्हा भक्ताचं स्वतचं भान पूर्ण लोपलं असतं. तेव्हा या परमात्मप्रेमाच्या मार्गावरून चालायचं तर ‘मी’पणाचं सर्व ओझं दूर करायलाच लागेल. ही प्रक्रिया सद्गुरूंच्याच कृपेशिवाय अशक्यच. त्याची प्राप्ती आणि त्याच्या बोधानुरूप आचरण हे मानवी जन्माचं सर्वोच्च ध्येय आहे. तोच माझ्या अंतरंगात शुद्ध प्रेम उत्पन्न करू शकतो. अशा प्रेमात दंग असलेले कबीर क्षणोक्षणी प्रत्येक प्रसंगातून दुसऱ्यांना मुक्तीचा महामार्ग दाखवत होते. सर्व तऱ्हेच्या बंधनातून जिवंतपणीच सुटण्याची प्रेरणा देत होते. त्याचा अंतिम प्रत्यय त्यांनी दिला तो आपल्या मृत्यूच्या निमित्ताने. काशीतच कबीरांचा निवास आणि काशीत मृत्यू येणारा मुक्त होतो, अशी श्रद्धा. पण जे जिवंतपणीच मुक्त व्हायला जनांना सांगत होते त्यांना मृत्यूनंतरच्या मुक्तीचा इंतजार कसला? मृत्यू समीप येताच कबीर काशी सोडून निघाले आणि मगहर गावी गेले. काशी जशी मुक्तीसाठी प्रसिद्ध तसेच त्या काळी दुष्काळी मगहर हे मृत्यूनंतरच्या दुर्गतीसाठी प्रसिद्ध होते. कबीरांनी म्हणूनच मगहरला मुक्काम केला. त्यांच्या शिष्यांनीही खूप समजावून पाहिलं पण या कृतीतून कबीरांनी शिष्यांची समज वाढविली. आपला शेवटचा श्वास त्यांनी मगरहमध्येच घेतला. त्यानंतर मगहरचा दुष्काळ कायमचा मिटला म्हणतात. दुर्गतीचा कलंकही गेला. आपल्या हृदयामधला दुष्काळ मिटला तरच अरुपाचे रूपात येण्याच्या हेतूचे खरे सार्थक! कबीरविषयक त्रोटक चिंतनाचा आपण येथेच समारोप करीत आहोत. आता या सदराचाही समारोप करताना मला आपल्याला काही सांगायचे आहे.

First Published on December 22, 2012 12:07 pm

Web Title: the end
टॅग God,Religion