19 September 2020

News Flash

प्रतिमानिर्मितीमधील विरोधाभास

चित्रपटातील आपल्या प्रतिमेतून एम.जी.रामचंद्रन लोकप्रियतेच्या शिखरावर राहिले.

| June 13, 2015 12:33 pm

चित्रपटातील आपल्या प्रतिमेतून एम.जी.रामचंद्रन लोकप्रियतेच्या शिखरावर राहिले. मात्र ज्या उपेक्षित वर्गाने त्यांच्यावर अक्षरश: जीव ओवाळून टाकला त्याच वर्गाला दिलासा देण्यात एमजीआर सत्तेवर असताना कसे अपयशी ठरले, त्या आधारे व्यक्तीची प्रतिमा व मतदाराचे वर्तन याचे विश्लेषण आहे. एमजीआर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या पुस्तकात उलगडण्यात आले आहेत. चित्रपट व राजकारण यांच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. या पुस्तकातील अनेक संदर्भ आजही तामिळनाडूतील राजकारणाशी मिळते-जुळते आहेत.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री डॉ. जे. जयललिता यांच्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू असलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा निकाल गेल्या महिन्यात लागला. हा निकाल जयललितांच्या बाजूने लागल्यावर पुन्हा अपेक्षेप्रमाणे अम्मा मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्या. जयललितांना शिक्षा झाल्यावर अनेक जणांनी आत्महत्या केली होती. सुटल्यावर राज्यभर जल्लोष करण्यात आला. अगदी जयललितांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी सर्वच मंत्र्यांनी (मावळते मुख्यमंत्री पनीरसेलवन यांच्यासह) शपथ घेतल्यावर जयललितांना साष्टांग नमस्कार करायचा बाकी होता. त्याआधी नव्वदीच्या दशकात जयललिता निवडून आल्या तेव्हा एका राजकीय अनुयायाने त्यांना, स्वत:ची जीभ कापून दिली होती! हे सर्व सांगायचे कारण एवढय़ासाठीच की तामिळनाडूतील गेल्या पाच दशकांतील राजकारणाचा विचार केला तर आजही व्यक्तिपूजेच्या बाबतीत फारसा फरक पडलेला नाही. त्यातही चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आलेल्या व्यक्तीच्या हातीच राज्याची सूत्रे राहिलेली आहेत. त्याच दृष्टिकोनातून एम. एस. एस. पांडियन यांनी ‘द इमेज ट्रॅप: एम. जी. रामचंद्रन इन फिल्म अ‍ॅण्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकात एमजीआर यांच्या अफाट लोकप्रियतेचे पैलू उलगडले आहेत.   ते पुस्तक आता पांडियन यांच्या निधनानंतर पुन:प्रकाशित झाले आहे.
उपेक्षित वर्गाचे नेमके चित्रण एमजीआर यांनी आपल्या चित्रपटांतून उभे केले, त्यामुळे तामिळ जनतेने त्यांना डोक्यावर घेतले. प्रखर जातवार समाजरचना पाळणाऱ्या या राज्यात चित्रपटगृहांनी पहिल्यांदा हे भेद नष्ट केले याचे मार्मिक समाजशास्त्रीय विश्लेषण केले आहे. तिकीट खरेदी करणारा कुठल्याही जाती-धर्माचा असो, ४० रुपयांचे तिकीट घेतलेला एका रांगेत, तर ६० रुपये देऊन तिकीट खरेदी केलेले एका रांगेत बसून चित्रपट पाहात.  तिथे भेदाच्या भिंती नष्ट झाल्या. एमजीआर यांचे १९८७ मध्ये निधन झाले. तो उदारीकरणाच्या पूर्वीचा काळ. साधारण १९९१ नंतर सामाजिक-आर्थिक परिस्थितीही झपाटय़ाने बदलली. तंत्रज्ञानातील बदलातून चित्रपटसृष्टीवरही त्याचे बरे-वाईट परिणाम झाले. त्यामुळे हे पुस्तक वाचताना ६०-७० च्या दशकातील तामिळनाडूत नेमकी कशी स्थिती होती, एमजीआर यांच्याकडे कोणी तरी दिव्यशक्ती असलेला माणूस या भावनेने त्यांचे चाहते चित्रपट बघायला येत. हा नायक हिंदी चित्रपटाप्रमाणे एकाच वेळी दहा ते पंधरा जणांना लोळवतो, खलनायकाला संपवतो, लोकांवरील अन्याय दूर करतो असे साधारण काहीसे कथानक.. मात्र एका चित्रपटाचा शेवट एमजीआर मरतात असा असतो. तो चित्रपट साफ आपटतो. थोडक्यात काय एमजीआर हे चित्रपटात कधी मरणारच नाहीत तर ते मारणार, अशी या भाबडय़ा प्रेक्षकांची अपेक्षा असते. याच प्रतिमेचा लाभ राजकारणात करून घेतल्याची दक्षिणेतील अनेक कलावंतांची आज उदाहरणे आहेत. त्याची सुरुवात कदाचित एमजीआर यांनी केली असावी. त्यांच्या अनेक चित्रपटांतून दिलेल्या सामाजिक संदेशांची तत्कालीन परिस्थितीशी लेखकाने तुलना करून लोकप्रियतेचे गमक दाखवून दिले आहे.
पडद्यावर मिळालेल्या लोकप्रियतेची शिडी वापरून राजकारणात आल्यावर लोकांनी दिलेली सत्ता जनहितार्थ राबवणे यात फरक असतो. एमजीआर यांच्याबाबतीतही त्यांचा १९७७ ते ८७ हा कालखंड सत्तेचा होता. पडद्यावर गरिबांचा मसिहा म्हणून ते अफाट लोकप्रिय झाले; मात्र मुख्यमंत्रिपदी असताना या वर्गासाठी विशेष काही केले नाही याची अनेक उदाहरणे देत अभिनय आणि वास्तवातील राजकारण वेगळे असते हे सांगण्याचा पांडियन यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या सत्तेच्या काळात मद्यसम्राट, बांधकाम व्यवसायातून उखळ पांढरे करून घेणारे समांतर सरकार चालवणारे उदयाला आले. ज्या माध्यमाचा उपयोग करून एमजीआर सत्तेत आले त्या कला क्षेत्राचेही फारसे भले झाले नाही, असे निरीक्षण लेखकांनी नोंदवीत यातील विरोधाभास उघड केला आहे.
तामिळनाडूतील राजकारणाचे कंगोरे जाणण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आजही या राज्याच्या राजकारणात काँग्रेस किंवा भाजप या राष्ट्रीय स्तरावरील पक्षांना विशेष स्थान नाही.(अपवाद १९८४ साली लोकसभेत राज्यात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते) द्रमुक किंवा अण्णाद्रमुक या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांशी त्यांनी कधी ना कधी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातमिळवणी केली आहे. १९३६ मध्ये ‘सती लीलावती’ या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात एमजीआर यांनी पदार्पण केले. पुढे १९६७ मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर १९८७ मध्ये मृत्यूपर्यंत ते तामिळनाडूतील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले.  १९७२ मध्ये द्रमुकमधून पक्षशिस्त मोडल्यावरून त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर एडीएमकेची त्यांनी स्थापना केली. आता हाच पक्ष एआयएडीएमके या नावाने ओळखला जातो. एमजीआर यांच्या अनेक चित्रपटांचे कथानक सामाजिक विषयांशी निगडित होते. त्या वेळच्या दुष्प्रथांवर प्रहार यामधून करण्यात आले. महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा नायक फोडतो याचेही चित्रण आहे. त्यामुळे महिलावर्गातून एमजीआरना मोठा पाठिंबा होता. एमजीआर फॅन क्लब हा आजही एआयएडीएमकेच्या यशामागचा महत्त्वाचा घटक आहे. एमजीआरना ज्या वेळी द्रमुकमधून निलंबित करण्यात आले, त्या वेळी राज्यभरातील दहा हजार एमजीआर फॅन क्लबच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचा विस्तार कसा केला याची मांडणी त्यांच्या पुढील वाटचालीतील यशाचे रहस्य सांगून जाते.
विपरीत परिस्थितीतून एमजीआर पुढे आले. चित्रपट तसेच राजकारणात त्यांनी नाव कमावले. मात्र बहुसंख्य प्रचारसभांमध्ये हाच मुद्दा मांडून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत, अशी टीका लेखकाने करताना व्यक्तिगत जीवनातही एमजीआर यांचे तीन विवाह झाल्याची उदाहरणे दिली आहेत. विशेष म्हणजे दुसरी पत्नी हयात असतानाही त्यांनी तिसरा विवाह केला. त्यातही तिसऱ्या पत्नीचे पतीही हयात होते. हे सारे काहीशा बंदिस्त असलेल्या राज्यातील समाजरचनेच्या विपरीत होते. तरीही एमजीआर शेवटपर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर राहिले. एमजीआर यांच्या मृत्यूला २८ वर्षे झाली. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी राज्यात अनेक योजनांना त्यांची नावे आहेत, याचे दाखले लेखकाने दिले आहेत. दक्षिणेतील अभिनेते व त्यातून प्रतिमानिर्मितीचा लाभ राजकारणात कसा होतो हे जाणण्यासाठी आजच्या काळात हे पुस्तक उपयुक्त आहे. तसेच एमजीआर यांच्या लोकप्रियतेचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याची मांडणी उत्तम पद्धतीने लेखकाने केली आहे. मात्र अनेक वेळा त्यांच्या चित्रटांचे कथानक तत्कालीन परिस्थितीशी जोडण्याच्या प्रयत्नात काही वेळा मांडणी रटाळ झाली आहे. मात्र कमी साक्षरता असलेल्या काळात लोकशिक्षणासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम होते. त्याचा उपयोग करून एमजीआर यांनी चित्रपटांतून जनजागृती केली. हे प्रभावीपणे मांडतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न संशोधनातून या पुस्तकात करण्यात आला आहे.

द इमेज ट्रॅप: एमजी रामचंद्रन इन फिल्म अ‍ॅण्ड पॉलिटिक्स
लेखक : एम. एस. एस. पांडियन
सेज पब्लिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
पृष्ठे – १६२ किंमत- ६४५ रुपये.

हृषीकेश देशपांडे – hrishikesh.deshpande@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 12:33 pm

Web Title: the image trap m g ramachandran in film and politics
Next Stories
1 साहसकथेला वास्तवाचा तडका
2 सुरक्षेपुढील गुंत्यांचा आढावा
3 राजकीय स्मृतिचित्रे..
Just Now!
X