रुद्राक्षांच्या माळांचे अंगभर अवडंबर, केसांचे अस्ताव्यस्त जंजाळ, कपाळाला लालभडक टिळा, प्रवचनांची पोपटपंची एवढय़ा भांडवलावर श्रद्धेच्या बाजारात सुरू केलेली दुकाने अंधश्रद्धाविरोधकांना वाकुल्या दाखवत बघता बघता कशी फोफावत जातात आणि समस्यांनी ग्रासलेल्या, त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर भांबावलेपणाने चाचपडणाऱ्या जनतेला भजनी लावत आपल्या काळ्या कारनाम्यांवर बेमालूमपणे पांघरुणे घालत राहतात याची शेकडो उदाहरणे आसपास नंगा नाच करत आहेत. सत्संगाच्या नावाने आपले अवतारकार्य जगाच्या माथी मारण्याचा उद्योग करणाऱ्या आसारामबापू नावाच्या बाबांचे प्रताप गेल्या काही वर्षांपासून उजेडात येऊ लागलेलेच होते, त्यात एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपाने भर पडली आहे. असे संत समाजाला कोणत्या सत्संगाकडे घेऊन जाणार हा प्रश्न ऐरणीवर येऊनही जाग येणार नसेल, तर भोंदू संतांच्या नावाने बोटे मोडण्याआधी सामाजिक जागृतीवर भर देण्याची खरी गरज आहे. या बापूच्या आश्रमातील सत्संगाच्या विकृत संसर्गाने काही बालके दगावल्याचा आरोप यापूर्वी होत होता. आसारामबापूंच्या अवतारी चाळ्यांचे प्रदर्शन अलीकडे काही सोशल साइट्सवरूनही होऊ लागल्याने, त्यामागचे खरे रूप उजेडात आले आहे. आलिशान राजवाडय़ाच्या सौधावर कितीही ऐटीत बसलेला कावळा मोराचा तोरा कधीच आणू शकत नाही, असे एक वचन आहे. पण आजकाल समस्यांचा पडदा दाटपणे दाटलेल्या नजरांना वास्तवाचे दर्शनच दुरापास्त झाले आहे. भरजरी वस्त्रे घालून आणि रेशमी फेटय़ात मोरपीस अडकवून स्वत:ला कृष्णावतारी भासविणाऱ्या आसारामबापूंनी महाराष्ट्रातील भीषण पाणीटंचाईची तमा न बाळगता हजारो लिटर पाण्यातून होळीचे रंग उधळले होते. अशा बापूंच्या पाठीशी दैवी शक्ती नसते, उलट शेकडो भक्तांच्या आंधळ्या पाठिंब्याच्या जोरावरच भोंदूंच्या नंदनवनातील बापूगिरी गाजवत ते समाजालाच मूर्ख बनवत असतात. अशा बापू-बाबांनी पांघरलेल्या संताच्या मुखवटय़ामागील स्वार्थी चेहरे अनेकदा उघड होऊनदेखील त्यांच्यावर कायदेशीर वा लोकशाही मार्गाने कारवाई करून त्यांचे मुखवटे टराटरा फाडण्याची हिंमत दाखविली जाऊ नये याचे कारणदेखील, त्यांच्यामागे उभ्या असलेल्या भोळ्या, अंधश्रद्धाळू समाजाच्या शक्तीमध्येच दडलेले असावे.  छिंदवाडा येथील गुरुकुल आश्रमातील एका अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामबापूंवर आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे असल्याने, कुणाचे स्वातंत्र्य कुणाच्या हातात, असा एक वेगळा प्रश्नदेखील यातून निर्माण झाला आहे. या प्रकरणात आसारामबापूंच्या संतपणावरील प्रश्नचिन्ह ठळक झाले आहेच, पण त्याहूनही गंभीर असा एक मुद्दाही उपस्थित झाला आहे. भोंदू बापू-बाबांच्या भजनी लागून एका पिढीने आपले आयुष्य निर्थक करून घेतले आहेच, पण पुढच्या पिढीलादेखील याच खाईत ढकलण्याची आंधळी वृत्तीदेखील वाढत आहे. आपल्या मुलीला बापूच्या हवाली केल्यास बापूच्या मंत्रशक्तीने तिचा आजार बरा होईल, यावर विश्वास ठेवून तसे करणारा पालक, मुलीच्या भविष्यावर शिंतोडे उडाल्यानंतर जागा होतो, हे आंधळेपणाचे लक्षण इथे अधोरेखित झाले आहे. यामुळे, भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी, समाजाला जागे करणे हाच उपाय आहे. बाबा-बापूंवरील कारवाईइतकेच ते महत्त्वाचे आहे.