News Flash

धर्मातून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग जाणणारा विद्वान..

अन्वर राजन यांचा असगर अली इंजिनियर यांच्यासंबंधी आलेला लेख (रविवार विशेष, १९ मे) वाचला. असगर अली हे इस्लामचे गाढे विद्वान होते - इतके की त्यांचे

| May 23, 2013 12:15 pm

अन्वर राजन यांचा असगर अली इंजिनियर यांच्यासंबंधी आलेला लेख (रविवार विशेष, १९ मे) वाचला. असगर अली हे इस्लामचे गाढे विद्वान होते – इतके की त्यांचे विचार इस्लामच्या धर्ममरतडांना पचणं शक्य नव्हतं. अर्थातच त्यांना धर्ममरतडाऐवजी सूफी पंथ अधिक जवळचा वाटत होता. आणि शांतता, धार्मिक सौहार्द यांच्यावर त्यांचा सतत भर होता. इस्लामच्या मूळ संहितेच्या सहाय्याने ते सतत आपले प्रागतिक विचार लोकांसमोर मांडत असत. कारण त्यांनी धर्मग्रंथांच्या संहिता मुळातून वाचल्या होत्या. दुसरीकडे त्यांच्या प्रागतिक विचारांचं मूळ मार्क्‍सवादामध्ये होतं हे उघड आहे.
त्यांचं कार्य हे ख्रिश्चन धर्मातल्या लिबरेशन थिऑलॉजी हा विचारप्रवाह मानणाऱ्यांसारखं आहे. हा विचारप्रवाह मानणाऱ्या धर्मगुरूंनी सतत जनतेच्या बाजूने आणिअन्यायाच्या विरोधी लढे दिले आहेत. प्रसंगी हौतात्म्यही पत्करलं आहे. आणि १९७० च्या दशकानंतर लॅटिन अमेरिकेत ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्यांच्यामागे या धर्मगुरूंनी केलेली जनजागृती महत्त्वाची आहे. गोरगरिबांना धार्जण्यिा ख्रिस्ताच्या भूमिकेला या धर्मगुरूंनी सतत अधोरेखित केलं आहे. त्यापायी प्रसंगी पोपच्या विरोधाला अनेक कारणांसाठी तोंड दिलं आहे.
अशा तऱ्हेचे प्रवाह इस्लाममध्ये असले तरी ते क्षीण आणि विखुरलेले आहेत. त्यांच्यातून म्हणावी तशी ताकद उभी राहिलेली नाही. असा प्रयत्न असगर अलींनी केला ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, िहदू धर्माच्या भाषेतून बोलणारा पण जनतेच्या सतत बाजूने उभा असलेला आणि लढा देणारा असा कोणता प्रवाह आज अस्तित्वात आहे हा या निमित्ताने अस्वस्थ करणारा प्रश्न मला सतत पडलेला आहे. आजचे िहदू धर्मीयांचे अनेक प्रवाह अस्मितेच्या राजकारणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. यातून वेगळा निघून अधिक मोकळा आणि सर्वसमावेशक प्रवाह निर्माण होणं ही काळाची गरज आहे.
-अशोक राजवाडे, मुंबई

सरकारीबाबू, कर्मचारी कसे वागणार?
‘नाकेबंदीचे टोक’ या अग्रलेखातून (२२ मे) सर्व राजकीय पक्ष, व्यापारी यांच्या चतुराईचा पर्दाफाश झाला आहे.. विशेषत: सरकारीबाबूंनी पुरेसा अभ्यास न करता नियम बनवले त्यांनाही उघडे पाडले हे बरे झाले. असेही असू शकते की राज्यकर्त्यां पक्षाच्या धुरिणांची मर्जी राखण्यासाठी सरकारीबाबूंनी प्रयत्न करून बघितला असेल. जनतेच्या हातात काहीच नसल्याने तिची मात्र नेहमीप्रमाणे कुचंबणा झाली. आता तरी सरकारीबाबू जागे होतील व विषयाचा र्सवकष अभ्यास करून बनवलेल्या नियमात सुधारणा करण्याची तसदी घेतील तर बरे होईल. त्यासाठी राज्यकर्त्यांची नाराजीही पत्करायला हरकत नसावी.
विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले असते तर हे आंदोलन इतके दिवस चालले नसते व लहानसहान गिऱ्हाइकांची कुचंबणा झाली नसती, असे वाटते.  व्यापारी समाजाचे शत्रू नाहीत हे जसे राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे तसे सर्वसामान्यांच्या सुखसुविधांसाठी प्रामाणिकपणे कर भरणे हे अत्यंत आवश्यक आहे याचाही विसर व्यापाऱ्यांना पडता कामा नये. यापुढे जी व्यवस्था लागू केली जाईल तिला व्यापाऱ्यांप्रमाणेच संबंधित कर्मचाऱ्यांनीही भ्रष्टाचार न करता सहकार्य दिले पाहिजे.
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

जिंकले ते सरकार, व्यापारी; हरले ते विरोधक
अखेर अनेक दिवस रेंगाळलेला एलबीटीचा तिढा सुटला. महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर आदी शहरांतील व्यवहार त्यामुळे ठप्प झाले होते. एलबीटी कदापिही रद्द होणार नाही, मात्र त्यातील जाचक तरतुदींबाबत बोलणी होऊ शकतात ही सरकारची भूमिका होती. तर, एलबीटी मान्य आहे, पण बऱ्याच जाचक तरतुदी आहेत त्या वगळाव्यात ही व्यापाऱ्यांची मागणी. (काही आततायी मंडळींनी मात्र एलबीटीच रद्द व्हावा, हा ‘लाथा बुक्क्या टॅक्स’ आहे वगैरे वगैरे सांगितले. मात्र हे बहुसंख्यांचे मत नव्हते.) एक आयतीच व्होट बँक मिळते आहे, या अपेक्षेने महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनात सक्रिय भाग घेतला व एलबीटीच रद्द करू असा धोशा लावला. एवढेच नव्हे, तर आमचे राज्य आले तर हा एलबीटी रद्द करू अशी खुशीची गाजरेही दाखविली. मात्र शेवटी सरकार व व्यापारी यांच्यात सामंजस्य झाले व व्यवहार सुरू होत आहेत ही खरोखरच अभिनंदनाची बाब. या परिस्थितीत एकच म्हणावेसे वाटते, की जिंकले ते व्यापारी व सरकार; हरले ते विरोधक.
– फुलचंद सांकला, पुणे

पुरोगामीपणाचीच अधोगती..
महाराष्ट्राच्या तथाकथित ‘जाणत्या राजा’चे खरे व ढोंगी स्वरूप परखडपणे उघड करणारा ‘समस्याग्रस्तांसि आधारु..’ हा अग्रलेख (२१ मे) वाचला. अशा ‘मुंब्रा’सारख्या वस्तीचा का पुळका येतो हे मतपेटीचे धार्मिक राजकारण पक्के माहीत असलेल्या सुज्ञ जनतेस वेगळे सांगायची गरज नाही. तसेच या जाणत्या राजाला नेहमी अजून ज्यांचा पुळका येतो ते म्हणजे त्यांचे ‘लवासा प्रेम’ आणि ‘क्रिकेट प्रेम’. हेच साहेब उघड उघड अनधिकृत बांधकामांची तळी उचलतात आणि सरकारी मदतीने कर चुकवणाऱ्या याच संघटनेला ‘माहिती अधिकाराच्या’ बाहेर ठेवून तृप्तीची ढेकर देतात.
एका ज्येष्ठ नेत्याचे हे स्वरूप म्हणजे पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची व समाजकारणाची किती फारकत स्वातंत्र्यानंतर अवघ्या ६५ वर्षांत झाली आहे, याचे अतिशय चिंताजनक चित्र दाखवते.
– हृषीकेश वाकडकर, नाशिक

भूगोलाची जबाबदारी
खरे तर भूगोलाचे पुस्तक हा देशाचा आरसा असतो. त्यात एवढी मोठी चूक होणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ‘भूगोलाचे घातक पुस्तक’ या प्रा. विद्याधर अमृते यांच्या लेखात (२२ मे) त्यांनी या पुस्तकाशी संबंधित अभ्यास मंडळ बरखास्त करावे असा उल्लेख केला आहे. हीच योग्य कारवाई ठरेल, असे मला वाटते. अभ्यास मंडळात सरकार सदस्याची निवड पारखून करते.  मग ही एवढी मोठी चूक  कशी काय?  पांढरपेशा लोकांनी स्वाभिमान सोडलाच आहे, मग जबाबदारी स्वीकारण्याची तयारी कशी राहणार?
– आदेश रेनगुंटवार

घूमजाव की डावपेच ?
नरोदा-पटिया दंगलीतील आरोपींना फाशी व्हावी म्हणून करण्यात येणाऱ्या अपिलाबाबत नरेंद्र मोदी यांनी घूमजाव केल्याचे वाचले. महिन्याभरापूर्वीच अपिलाला परवानगी दिल्याचे जाहीर करून, त्याचा गवगवा करून मोदींनी आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयास केला होता. त्या प्रतिमेला तडा गेला आहे. यातून दोन शक्यता पुढे येतात :
मोदी संघाच्या दबावाखाली येऊ शकतात. मोदी म्हणजे गुजरात, मोदी म्हणजे सरकार, मोदी म्हणजे गुजरात भाजप, अशी समीकरणे चलनात होती. मोदी संघालाही जुमानत नाहीत; इतके ते पोलादी इच्छाशक्तीचे, केवळ गुजरातच्या भल्याला समर्पित नेते, असे सतत भासवले जात होते. वरील बातमीमुळे ते कितपत खरे आहे हा प्रश्न जनसामान्यांना पडावा.
 दुसरी शक्यता : गवगवा करून प्रतिमा उजळायची, पण जे करायचेच नव्हते त्यासाठी संघ वगैरेंच्या दबावाचे कारण पुढे करायचे आणि कृती टाळायची. त्यामुळे संघाचाही फायदा. नरेंद्र मोदींसारख्या दबंग व्यक्तिमत्त्वावर संघाची हुकमत चालू शकते, हे जगाला दिसेल असा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रयत्न असावा. असल्या तथाकथित हुशारीच्या डावपेचांसाठी संघ प्रसिद्ध आहे, ते त्यांचे वैशिष्टय़च आहे.  समाधानाची बाब ही की, आजपर्यंत तरी जनता त्याला बळी पडलेली नाही. पुढेही पडणार नाही.
– श्रीधर शुक्ल, ठाणे

काय साधले?
‘नाकेबंदीचे टोक’ हा अग्रलेख (२२ मे) वाचला. खरोखरीच एवढा दीर्घ मुदतीचा बंद करून व्यापाऱ्यांनी काय मिळविले हेच समजत नाही. सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांनी जे काही मिळविले असा दावा ते करतात त्यासाठी तर शासन त्यांच्याशी बोलणी करण्यास तयारच होते व  या वाटाघाटी दुकाने उघडी ठेवूनदेखील होऊ शकत होत्या. परंतु ते एलबीटीच काय, कुठलाच कर नको यावर अडून बसले होते. शेवटी हेचि फळ काय यांच्या तपाला असे म्हणायची वेळ आली आहे.
– शरद फडणवीस, कोथरूड, पुणे

चीड कितपत आहे, दिसलेच!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुलींच्या राखीव जागांवर मुलांची वर्णी लावल्या प्रकरणाशी संबंधित एकंदर तीन ( मुलांना त्या जागा दिल्याच्या बाजूने एक आणि सदर घटनेचा निषेध करणारी दोन) पत्रे आपल्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. पण आयपीएल सामन्यांतील गरव्यवहाराचा विचार केला, तर ‘लोकसत्ता’ जवळपास रोज या विषयावरची पत्रे प्रसिद्ध करत आहे. यावरून आपल्याला स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल कितपत चीड आहे ते स्पष्ट होते. मग मुलींना डावलल्याविषयीची चीड व्यक्त करणारा ‘आयोगाचा औचित्यभंग’ हा अग्रलेख (१५ मे) ‘लोकसत्ता’मध्ये असणे, हेदेखील निव्वळ पुरोगामीपणाचे नाटकच का म्हणू नये?
– स्मिता पटवर्धन, सांगली

false propaganda of nuclear
nuclear energy, nuclear electricity power generation, atomic energy plants, safety, clean
गैरप्रचाराचे अणू..
प्रदीप इंदुलकर-pradeepindulkar@hotmail.com
अणुभट्टय़ा स्वच्छ आणि सुरक्षित असतात. किरणोत्सार निसर्गातही असतोच, त्यामुळे अणुभट्टीलाच किरणोत्साराबद्दल दूषणे देण्यात अर्थ नाही, अणुऊर्जेचा पर्याय हा स्वच्छ-सुरक्षित असल्याने तो आपण स्वीकारला पाहिजे, असा प्रचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञही करीत असतात. हा प्रचार पूर्णत: योग्य असतो का आणि नसल्यास या गैरप्रचाराचे अणू कोणती हानी घडवतात, याची चर्चा करणारा पत्र-लेख..
‘चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा’ हा राजीव साने यांच्या ‘गल्लत, गफलत, गहजब’ सदरातील लेख (१७ मे) आणि ‘लोकमानस’मधील पी. ए. पाटील यांचे ‘अणुवीज प्रकल्प हा अणुबॉम्ब नव्हे’ हे पत्र (१८ मे) यांना उत्तर देणे किंवा त्याचा प्रतिवाद करण्याचा बिलकूल उद्देश नाही; मात्र काही वैज्ञानिक अंधश्रद्धा वा गैरसमज निर्माण होण्याची भीती हीच या प्रस्तुत लेखाची प्रेरणा आहे. या दोन्ही मजकुरांतून असे ध्वनित होते की, अणुवीज हा अत्यंत स्वच्छ आणि स्वस्त विजेचा स्रोत असून तो इतर सर्व ऊर्जास्रोतांपेक्षा अतिशय सुरक्षित आहे, त्यामुळे भारतानेच नव्हे तर सगळ्या जगाने याचा अंगीकार करायला हवा. यातील ‘स्वच्छ’ आणि ‘सुरक्षित’ या दोन्ही मुद्दय़ांवर जे लिखाण झाले आहे ते दुर्दैवाने अत्यंत अवैज्ञानिक आहे.
‘निसर्गात किरणोत्सार असतोच, त्याचा मानवावर काही परिणाम होत नाही त्यामुळे अणुभट्टीतील किरणोत्साराचा परिणाम कसा होईल?’ असा दावा तर श्रेष्ठ अणुशास्त्रज्ञसुद्धा करीत असतात मग अन्य लेखकांनी केला तर त्यात नवल ते काय? पण या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘किरणोत्साराचे प्रमाण कोकणात ३०००, पुण्यात १२०० तर अणुकेंद्रात फक्त ५० असते’ (म्हणजे नेमके काय असते? या आकडय़ांचे एकक काय? असो.) – यातून त्यांचा सांगायचा मुद्दा इथे लक्षात येतो तो असा की, नसर्गिक किरणोत्सारापेक्षा अणुभट्टीतला किरणोत्सार कमी असतो. हाच एक मोठा गैरसमज सातत्याने समाजात पसरवला जात आहे. समजा, लेखक म्हणतात त्याप्रमाणे आज कोकणात नैसर्गिक किरणोत्सार (खरा शब्द आहे बॅकग्राऊंड रेडिएशन) जर ३००० एकक असेल आणि उद्या दुर्दैवाने तिथे अणुभट्टी बांधली गेली तर त्या ठिकाणी आज जो ३००० एकक किरणोत्सार आहे तो शून्यावर येणार आणि फक्त अणुभट्टीतलाच ५० एकक किरणोत्सार राहणार आहे का? अणुभट्टीत असे कोणते तंत्रज्ञान आहे, जे ‘बॅकग्राऊंड रेडिएशन’ शून्यावर आणते? म्हणजेच मूळच्या बॅकग्राऊंड रेडिएशनमध्ये अणुभट्टीतल्या किरणोत्साराची भरच पडणार आहे. हा साधा युक्तिवाद आहे.
सातत्याने सगळे अणुशास्त्रज्ञ अणुभट्टीतल्या किरणोत्साराची या नैसर्गिक किंवा बॅकग्राऊंड रेडिएशनशी तुलना करून अणुभट्टीतला किरणोत्सार कसा क्षुल्लक आहे हेच पटवायचा प्रयत्न करीत असतात, मात्र त्या वेळी ते आयोनायिझग आणि नॉन-आयोनायिझग किरणोत्साराबद्दल बोलत नाहीत. केवळ इतका ग्रे आणि इतका रॅम किरणोत्सार निसर्गात असतो आणि तितका ग्रे अणुभट्टीतून होतो, असे काहीबाही सांगून लोकांची दिशाभूल करीत असतात. परंतु अणुभट्टीतला किरणोत्सार हा आयोनायिझग स्वरूपाचा असतो. म्हणजे तो अणूमध्ये न्यूक्लियसच्या भोवती जे इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यातला एखादा इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षेतून बाहेर फेकू शकतो. एखादा इलेक्ट्रॉन हरवलेल्या अशा अणूचे मग आयनमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला आयोनायिझग म्हणतात. ही प्रक्रिया जर आपल्या शरीरातील एखाद्या सूक्ष्म पेशीतल्या अणूवर झाली तर असा आयोनाइज झालेला अणू ती पेशी बघडवून टाकतो. ही पेशी बिघडण्याची प्रक्रियाच पुढे कॅन्सरचे कारण ठरू शकते. ही प्रक्रिया जर आपल्या डीएनएभोवती असलेल्या द्रवातल्या अणूवर झाली तर डीएनए बिघडू शकतो. हा बिघाड पुढे अनेक आनुवांशिक बदल घडवतो. किरणोत्साराचे परिणाम पुढच्या पिढीत दिसतात असे म्हटले जाते, त्याचे कारण हेच आहे. असा हा आयोनायिझग किरणोत्सार फक्त अणुभट्टीत निर्माण होत असतो. नसर्गिक किरणोत्सारात ही क्षमता नसते. याचा अर्थ या जगात पहिली अणुभट्टी सुरू होण्यापूर्वी आयोनायिझग स्वरूपाचा किरणोत्सार नव्हता किंवा फारच क्षुल्लक होता. ‘फारच क्षुल्लक होता’ असे म्हणण्याचे कारण असे की, हा आयोनायिझग स्वरूपाचा नसर्गिक किरणोत्सार निर्माण करण्यात एका नसर्गिक अणुभट्टीचा हातभार होता. जशी राजापूरची गंगा हा एक निसर्गातील चमत्कार आहे तशीच आफ्रिकेतील ओक्लो येथील नसर्गिक अणुभट्टी हाही एक चमत्कार आहे. ही नसर्गिक अणुभट्टी हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात कार्यरत होती, जी असा आयोनायिझग स्वरूपाचा किरणोत्सार निर्माण करीत होती. मात्र एकंदर जगाचा आवाका पाहता हा किरणोत्सार क्षुल्लक होता, कारण या अणुभट्टीची क्षमता होती फक्त शंभर किलोवॅट.
किरणोत्साराच्या बाबतीत दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ावर अणुशास्त्रज्ञ लोकांची दिशाभूल करीत असतात, तो म्हणजे किरणोत्साराचा प्रकार. अणुभट्टीतला किरणोत्सार तीन प्रकारांत मोडतो, ज्यात दोन प्रकारचे कण असतात ज्याला अल्फा आणि बीटा म्हणतात आणि तिसरे गामा नावाचे किरण. अणुभट्टीत प्रत्यक्ष अणुभंजन होत असताना हे तीनही प्रकारचे किरणोत्सार निर्माण होत असतात. मात्र अल्फा आणि बीटा हे कण असल्याने ते विविध कारणांनी वातावरणात येतात आणि तिथून अन्न, पाणी या माध्यमातून ते प्राण्यांच्या, माणसांच्या शरीरात पोहोचतात. मात्र गामा हे किरण असल्याने त्यांचा एक स्रोत असतो आणि तो अणुभट्टीत स्थित असतो. तो बाहेर येण्याची शक्यता नसते. त्यामुळे अणुशास्त्रज्ञ याच किरणोत्साराबाबत बोलत असतात आणि अल्फा आणि बीटा कणाबाबत बोलणे टाळतात. अणुभट्टीतून उत्सर्जति होणारे हे कण हे ‘आण्विक प्रदूषण’ – न्यूक्लियर पोल्यूशन असते. मात्र असे काही होते हे आपल्याला सांगितलेच जात नाही, त्यामुळे ‘न्यूक्लियर पोल्यूशन’ हा शब्दच आपल्याला माहीत नाही. आपल्याला सतत असेच भासवले जाते की अणुऊर्जा स्वच्छ आहे.
आणखी एक गैरसमज या लेखांमधून पसरण्याचा धोका आहे. लेखक म्हणतात- ‘ही जी किरणोत्सारी मूलद्रव्ये असतात त्यात सातत्याने भंजन होत असते आणि किरणोत्साराने त्याचे वस्तुमान सतत कमी कमी होत जाते, त्यामुळे ही मूलद्रव्ये आपण नाही वापरली तर ती संपून जाणार आहेत.’ ..केवळ हे लेखकच नाही तर काही अणुशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखकही अशी अवैज्ञानिक विधाने बेधडकपणे करतात. मुळात किरणोत्सारी मूलद्रव्यात भंजन होत नाही तर भंजनातून किरणोत्सारी मूलद्रव्ये तयार होत असतात. आज निसर्गात केवळ एकच मूलद्रव्य असे सापडते की, ज्याचे भंजन होऊ शकते. ते म्हणजे युरेनिअमचे एक समस्थानक ‘युरेनिअम-२३५’. याचे अर्धायुष्य असते ७०४ दशलक्ष वर्षे, म्हणजे आज पृथ्वीवर जितके ‘युरेनिअम-२३५’ असेल ते ७०४ दशलक्ष वर्षांनंतर निम्मे होणार आहे. त्यामुळे आपण ते वापरले नाही तर ते वाया जाईल, ही भीती हे शास्त्रज्ञ किती बेमालूमपणे सामान्यांच्या गळी उतरवत आहेत, पाहा! ‘एनपीसीआयएल’ने तयार केलेल्या पुस्तिका अशाच बेजबाबदार अवैज्ञानिक विधानांनी भरलेल्या आहेत. त्यांचा प्रतिवाद अनेक ठिकाणी केलेला आहे, तरीही पुन्हा पुन्हा त्याच थिअरीज का मांडल्या जात आहेत कळत नाही.    
आता पाहू या अणू अपघात. दोन्ही लेखकांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की, अणू अपघात अशी काही गोष्टच नसते, कारण अणुभट्टी ही अपघात‘प्रूफ’ असते. ‘मी जरी स्फोट करायचा असे ठरवले, तरी स्फोट घडवू शकणार नाही, असे खुद्द अनिल काकोडकरांनी सांगितले.’ हे जर खरे असेल तर मग धन्यच आहे. अणुभट्टीत स्फोट घडवायचा असेल तर जगातल्या कोणत्याही चालू स्थितीतील अणुभट्टीत थंडाव्यासाठी खेळवले जाणारे पाणी फक्त दोन मिनिटे बंद करावे आणि मग अणुभट्टी राहते की उडते ते पाहावे. आजपर्यंत जगात जे तीन महा अणू अपघात झाले त्यांचे कारण येनकेनप्रकारेण थंडाव्याचे पाणी बंद होणे हेच होते. ज्या फुकुशिमातल्या अणू अपघाताचा दाखला सातत्याने दिला जातो तो अपघात ‘बंद अणुभट्टीत झालेला अपघात’ होता हे इथे ध्यानात घ्यायला हवे. ज्या क्षणी भूकंप झाला त्याच क्षणी अणुभट्टी बंद झाली होती, कारण तशी व्यवस्था प्रत्येकच अणुभट्टीत केलेली असते. मात्र अणुभट्टी बंद होते म्हणजे वीजनिर्मिती बंद होते, मात्र भट्टीत अणुभंजनाची साखळी प्रक्रिया सुरूच असते आणि ती नियंत्रित करण्यासाठी बंद अणुभट्टीतसुद्धा पाणी खेळवणे गरजेचे असते. फुकुशिमात जेव्हा त्सुनामी आली आणि वीजपुरवठा बंद झाला तेव्हा पर्यायी वीजव्यवस्थेवर पाणी खेळवत ठेवले गेले मात्र त्याच वेळी ही पर्यायी व्यवस्था फार काळ टिकू शकत नसल्याचे लक्षात आले होते त्यामुळे पुढच्या दोन-तीन दिवसांत आसपासच्या लोकांना तिथून हलवण्यात आले. त्सुनामीनंतर सुमारे दोन-तीन दिवसांनी फुकुशिमातल्या अणुभट्टय़ांचा गाभा वितळण्यास सुरुवात झाली. तोवर आसपासच्या सर्व लोकांना तिथून हलवण्यात आल्याने त्या वेळी मरायला तिथे कुणी शिल्लकच नव्हते. यातून काय अर्थ काढायचा? की अणू अपघातात कुणी मरतच नाही? म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर भरदिवसा एखाद्या भरलेल्या थिएटरमध्ये जर आग लागली तर एका वेळी हजार लोक मरू शकतात. मात्र तीच आग जर रात्री दोन वाजता रिकाम्या थिएटरला लागली तर एकही माणूस मरणार नाही. यातून आगीत कुणीच मरत नाही, असा अर्थ काढायचा का? आपले तथाकथित अणुशास्त्रज्ञ अणुऊर्जेचे समर्थन करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात त्याचे फुकुशिमा हे उत्तम उदाहरण आहे. मुळात अणू अपघाताची तीव्रता ही किती माणसे मेली यावरून ठरतच नसते. अणुभट्टीचा गाभा वितळणे ही अणू अपघाताची सर्वात वरची पातळी आहे. थ्री माइल आयलंड, चेर्नोबिल आणि फुकुशिमात ती पातळी गाठली गेली आणि दुसरीकडे भारतीय अणुशास्त्रज्ञांनी आणि विज्ञानलेखकांनी अणू अपघाताबाबतच्या थापेबाजीची सर्वात वरची पातळी गाठली, हे भारतीय विज्ञान क्षेत्राचे दुर्दैव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 12:15 pm

Web Title: the person is scholar who knows the path of salvation thru religion
Next Stories
1 गीता समजून घेणारे कमी, हीच समस्या
2 लोकशाही टिकवण्यासाठी लोकशिक्षण आवश्यक
3 बाळासाहेबांच्या विरोधातही मराठीजन होते
Just Now!
X