‘अजितदादांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी परदेशींची बदली केल्यास जनक्षोभ’ ही बातमी (लोकसत्ता, २० जाने.) वाचून लोकांना लोकशाही मूल्यांची जाण असल्याची जाणीव झाली. पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी १८ महिन्यांत सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. असे अधिकारी सगळ्याच पालिका/ महापालिकांना मिळाले पाहिजेत हेच त्यातून ध्वनित होते. पुण्यातही कितीतरी अनधिकृत बांधकामे वैधतेच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यात पसे ओतून फसलेल्या सामान्य लोकांच्या भावना, बिल्डरांचे आíथक हितसंबंध यांना महत्त्व द्यायचे की या अनधिकृत बांधकामांना सामावून घेऊन महापालिका सेवांचा अंत पाहायचा हे  मंत्रिमहोदयांनी ठरवायची वेळ आली आहे; हे सर्वानी समजून घेणे आवश्यक आहे.
खरे तर अजितदादांनीच आयुक्त परदेशी यांच्या कार्यपद्धतीची भलावण केल्याचे ऐकिवात होते. मग आता घूमजाव कुणाच्या भल्यासाठी, हा प्रश्न हैराण करतो. शहराचा सर्वागीण विकास आणि वेडावाकडा विस्तार यातला फरक ओळखू शकणारे शासकीय अधिकारी आणि शहाणी झालेली जनता यांचा मान अशा अधिकाऱ्यांना शहराची घडी नीट बसेपर्यंत आहे त्या पदावरचा कार्यकाल वाढवून दिला जावा असे वाटते.
-श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.

.. जबाबदारी बाकीच्यांची!
‘शिक्षणाचा असर नाही’  ही बातमी (लोकसत्ता, १७ जाने.) वाचून धक्का वगरे काही बसला नाही. ‘असर’चा अहवाल वास्तवदर्शी आहे. आपल्याकडे वाचन आणि लेखन या भाषाकौशल्यांची सद्यस्थिती दयनीय आहे. गणिती मूलभूत क्रियांच्या बाबतीत तर निराशाजनक अवस्था आहे. सदर अहवाल हा केवळ प्राथमिक शिक्षणासंदर्भात असला तरी माध्यमिक शाळांचे चित्र याहून वेगळे नाही.
मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट असणाऱ्या या शिक्षणक्षेत्राच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण?
विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्थाचालक, अधिकारी, शासन की आणखी कोण?  या प्रश्नाचं उत्तर सोप्पं आहे..  
 तुम्ही ज्या भूमिकेत सध्या आहात ते सोडून इतर सगळे!
म्हणजे तुम्ही जर पालक असाल तर शिक्षक नीट शिकवत नाहीत म्हणून दोष द्यायचा आणि शिक्षक असाल तर पालक लक्ष देत नाहीत, शासन शालाबाहय़ कामं लावतं म्हणून गळा काढायचा. सतत दुसऱ्याकडे बोट दाखवण्याच्या वृत्तीमुळे आपली शिक्षणाची ‘बोट’ मात्र हेलकावे खाऊ लागली आहे, हे आपण विसरत चाललो आहोत. राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षण क्षेत्राची ही अधोगती आपण किती दिवस उघडय़ा डोळ्यांनी पाहणार आहोत? हे चित्र बदलायचे असेल तर दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा आपापली भूमिका आपण चोखपणे वठवली तरी पुरेसा ‘असर’ होईल.
तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

हे मतप्रदर्शन की दमदाटी?
‘प्रसिद्धीचा पिसारा’ हे पत्र (लोकमानस, २० जाने.)  वाचले. प्रगल्भ समाज टीकेचा गांभीर्याने विचार करतो, परंतु हे पत्र निराळे होते. लोक व्यक्तींना देवत्व बहाल करतात आणि त्याचे मनुष्यत्व हिरावून घेतात, ही आपली खासियत. मग कोणत्याही प्रकारची टीका वा न आवडणारे मत प्रदर्शन सहन केले जात नाही. त्यातलेच हे. पुलंचे लिखाण अक्षर वाङ्मयात जमा होते की नाही माहीत नाही; पण ज्या शेक्सपियरचे लिखाण तसे आहे असे समजले जाते, ते ‘इंग्लंडचे लाडके व्यक्तिमत्व’ आहे आणि तरीही ‘त्या नावाचा कोणी नव्हता’  इथपासून ते ‘तो एक अशिक्षित निरक्षर मनुष्य होता’ इथवरची टीका केली गेल्यावरही कोणी काही गहजब केल्याचे ऐकीवात नाही.
हे खरेच आहे की पुलंचे लिखाण मध्यम वर्गीय पांढरपेशा समाजापुरते मर्यादित आहे आणि तसे म्हटले तर त्यात रागावण्यासारखे काय आहे? शेवटी प्रत्येकाला आपले मत प्रदíशत करण्याचा अधिकार आहेच. ‘आम्हाला वाटते तसेच तुम्हाला वाटले पाहिजे अन्यथा तुम्ही ते लिहू नये किंवा बोलू नये’ असे म्हणणे म्हणजे साहित्यातला मनस्वीपणा की एकप्रकारची दमदाटी?
रघुनाथ बोराडकर, कोथरूड- पुणे</strong>

देव्हारे माजणारच!
शिवसेनाप्रमुखांच्या पंचधातू-मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे वृत्त (लोकसत्ता, २० जानेवारी) वाचले. ज्या समाजात विचारांना फाटा देऊन झोटिंगशाहीच्या जोरावर सर्वसामान्य जनतेवर पकड ठेवणे, तरुण रक्ताला फक्त चेतवणे, जात, धर्म, प्रांत, पंथ अशा विविध तुकडय़ांत विभागलेल्या समाजातील युवा वर्गात खोटी प्रांतीय अस्मिता चेतवून दीर्घकाल झुंजवत ठेवणे, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण करून शैक्षणिक प्रगतीद्वारे सक्षम बनविण्याऐवजी त्यांना परप्रांतीयांचा द्वेष, विरोध अशा उद्योगांत गुंगवून ठेवणे, तर कधी परधर्मीयांचा बागुलबुवा दाखवून आपणच कैवारी असल्याचा आव आणणे हे सातत्याने सुमारे पन्नास वष्रे घडले आहे, त्या समाजातील तरुणाईची मानसिकता, आदर्श असलेल्या नेत्याची देवळेच उभारण्याकडे वळली तर त्यात नवल ते कोणते? सरळ मार्गाने चालणाऱ्या, कोणाच्या अध्यात-मध्यात नसणाऱ्या, सामान्य कुवतीच्या पण नागरिक म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडणाऱ्या, करदात्या सर्वसामान्यांची कुचंबणा, त्याच्या हक्कांची गळचेपी आज सगळीकडे आढळते. त्यातून त्याला बाहेर काढण्याऐवजी त्याच्या धर्म, श्रद्धा यांना कुरवाळायचे. हे सातत्याने घडले की उद्धारकर्ता, कैवारी यांची देवळे उभी राहणारच. वैचारिकता संपुष्टात न आलेला सर्वसामान्य राडा संस्कृती, दहशत याला घाबरून त्याविरोधात चकार शब्द काढत नाही, इतकेच.
रजनी अशोक देवधर

सय्यदनांची उपेक्षा आणि गर्दीचा अंदाज
‘खबरदारी कधी घेणार?’ हा ‘अन्वयार्थ’ (२० जाने.) वाचला. गर्दी नियंत्रित न झाल्यामुळे १८ जणांना जीव गमवावा लागला, हे खरे; त्याला जबाबदार अनेक घटक आहेत. परंतु पोलीस यंत्रणेला गर्दीचा अंदाज लावता का नाही आला? गर्दीचे मानसशास्त्र का लक्षात आले नाही, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे.
अशी गर्दी मुंबईला नवीन नाही. नुकतीच दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांच्याही अंत्ययात्रेला गर्दी जमली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपूर्वीपासून प्रचंड गर्दी जमली होती. पण त्या वेळी पोलीस यंत्रणेला, प्रशासनाला आणि सरकारलाही त्या गर्दीचा कसा काय अंदाज लावता आला? या वेळी काय झालं? कारण या वेळी एका अशा व्यक्तीचे निधन झालं होतं, जी व्यक्ती एका समाजाचं फक्त आध्यात्मिक नेतृत्वच करत नव्हती, तर ती व्यक्ती एक थोर समाजसेवकदेखील होती. त्याच व्यक्तीने ‘सैफी हॉस्पिटल’सारखी देणगी दिली आहे. हे तेच हॉस्पिटल आहे, ज्याने दादर बॉम्बस्फोटाच्या वेळी सर्वप्रथम रुग्णवाहिका पाठवून जखमींवर उपचार केले होते.
 परंतु अल्पसंख्याक समाजसेवकांची नेहमी होते तशी डॉ. सय्यदना बुऱ्हानुद्दीन यांचीही बऱ्याच प्रसिद्धी माध्यमांनी उपेक्षाच केलेली आढळते. उपेक्षाच नव्हे तर मागे एका चित्रवाणी वाहिनीने तर त्यांच्यावर दहशतवादाचा खोटा आरोप लावून टाकला होता. अशा प्रकारे अल्पसंख्याक समाजातील समाजसुधारक, समाजसेवक व धर्मगुरूंची हेटाळणी केली गेल्यामुळे त्यांचा एवढा मोठा चाहता वर्ग असू शकतो, याचा अंदाज पोलिसांना आला नाही, तर त्यात बिचाऱ्या पोलिसांची काय चूक?
नौशाद उस्मान, कुर्ला

‘महाराष्ट्राचे’ व्हा, ते   राज्यातच
‘पक्षरंग’ या सदरात मनसेबद्दल ‘महाराष्ट्राचा होण्याचे आव्हान’ हा संदीप आचार्य यांचा लेख (१९ जाने.) वाचला. लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवून ‘महाराष्ट्राचा’ होणे राज ठाकरे जरूर पसंत करतील, पण त्यासाठी निवडणुकीचे गणितसुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
अख्ख्या महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. मनसेने सर्व ४८ जागा जरी जिंकल्या (ते शक्य नाही, तरी) लोकसभेतील एकंदर ५४५ पकी हे प्रमाण १० टक्क्यांच्याही खालीच. या बळावर महाराष्ट्राच्या प्रश्नांची राष्ट्रीय पातळीवर उत्तरे कशी काय मिळतील?
त्यामुळे ‘महाराष्ट्राचे’ आवाहन हे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपुरतेच करावे हे माझे प्रामाणिक मत आहे. मनसे स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार हे नक्की त्यामुळे ‘महाराष्ट्राचे’ होणे हे आवाहन पूर्णत: फोल ठरेल.
विकास आपटे, बोरिवली, मुंबई</strong>

दुहेरी भूमिकेची ‘ममता’
सुचित्रा सेन यांच्याबद्दलचे ‘शनिवारचे संपादकीय’ (१८ जाने.) वाचले. िहदीतील गाजलेल्या चित्रपटांबद्दल लिहिताना ‘आँधी’ चित्रपटाचा उल्लेख प्रामुख्याने होतो. त्यांच्या अभिनयासोबत इतर काही बिगर चित्रपटीय कारणांमुळे चित्रपट जास्त गाजला. त्यांची दुहेरी भूमिका असलेला ‘ममता’ हा कृष्णधवल चित्रपट म्हणजे त्यांच्या अभिनय कारकीर्दीमधील मानाचे आणि महत्त्वाचे नाव. परिस्थितीने कलावंतीण झालेली एक घरंदाज गृहिणी आणि तिची परदेशात शिकून आलेली उच्चविद्याविभूषित वकील मुलगी अशा या दोन भूमिका होत्या. त्यांच्यासोबत अशोककुमार आणि धर्मेद्र होते. भर कोर्टात आपल्या आयुष्याची चिरफाड होत असताना कलावंतीण तिथेच प्राण सोडते, त्यावेळचा त्यांचा अभिनय कधीही विसरता न येण्यासारखाच आहे.        
– राधा मराठे