हरणे आणि जिंकणे या कोणत्याही राजकीय पक्षाच्या आयुष्यात एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. यात कधी पराभवाची बाजू वर आली म्हणून काही एखादा पक्ष सर्वस्व गमावून बसतो असे होत नाही. तसे एखाद्याचे झाले असेल तर त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक ठरते. काँग्रेसचे हे असे झाले आहे..

प्रगतीसाठी क्रियेऐवजी प्रतिक्रियेवरच अवलंबून राहण्याचे एखाद्याने ठरवले तर काय होते याचे उदाहरण पाहावयाचे असेल तर काँग्रेस या पक्षाखेरीज अन्य चांगला पर्याय शोधून सापडणार नाही. २८ डिसेंबर रोजी या पक्षाने आपला १३०वा स्थापनादिन साजरा केला. ज्या पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यलढय़ास वैचारिक परिमाण दिले, ज्या पक्षात राजाजी ते मोहन कुमारमंगलम असे उजवे आणि डावे गुण्यागोविंदाने नांदत होते, ज्या पक्षाने सरदार वल्लभभाई पटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशविषयक परस्परविरोधी भावनांचा तितकाच आदर केला तो पक्ष आपला १३०वा स्थापनादिन साजरा करताना कधी नव्हे इतका केविलवाणा आणि सुतकी होता. ही अवकळा काँग्रेसला आली ती काही केवळ राजकीय पराभवामुळे खचितच नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आयुष्यात जयपराजयाचे चक्र हे फिरतच असते. आज स्वबळावर सत्तेत असलेल्या भाजपच्या पदरात १९८४ साली अवघे दोन खासदार होते. तर आज ४४ खासदारांच्या संख्येवर कुंथणाऱ्या काँग्रेसकडे त्याच वेळी ४१४ खासदारांचे राक्षसी बहुमत होते. तेव्हा हरणे आणि जिंकणे या कोणत्याही राजकीय पक्षाच्या आयुष्यात एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. यात कधी पराभवाची बाजू वर आली म्हणून काही एखादा पक्ष सर्वस्व गमावून बसतो असे होत नाही. तसे एखाद्याचे झाले असेल तर त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक ठरते. काँग्रेसचे हे असे झाले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अशक्त झालेल्या सोनिया गांधी, चालताना नाक जमिनीला लागते की काय असे वाटावे इतका पाठीला बाक आलेले मोतीलाल व्होरा आणि खांदे पाडून वावरणारे मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद आदी यांना रविवारी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात पाहणेच मुळी इतके कंटाळवाणे आणि जांभई निमंत्रक होते की त्या पक्षाच्या समर्थकांनाही काँग्रेसच्या भवितव्याची चिंता वाटावी. जवळपास सर्वच राज्यांत काँग्रेसची ही अशी अवस्था आहे. महाराष्ट्रात टिळक भवनात ‘त्या ठिकाणी, त्या ठिकाणी’ या पालुपदांशिवाय ज्यांचे एक वाक्यही पूर्ण होत नाही ते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि जे कितीही निर्थक बोलू शकतात असे सुशीलकुमार शिंदे वगरे मंडळी पक्षाच्या स्थापनादिन सोहळ्यास जमली होती. एकंदर चित्र होते ते जणू आपल्या पक्षात अधिक कंटाळवाणे कोण हे ठरवण्यासाठी काँग्रेसजनांत अटीतटीची स्पर्धा सुरू आहे.
ती सुरू आहे कारण हा राजकीय कंटाळा घालवण्यासाठी काय करायचे याचे कोणतेही कल्पनाचित्र त्या पक्षाकडे नाही. एके काळी ज्या पक्षाने देशाला एकापेक्षा एक तगडे नेते दिले, त्या पक्षाकडे आज नेत्यांची वानवा आहे. नवीन पिढीने आपणाकडे यावे यासाठी या पक्षाने काहीही केले नाही, हे त्याचे कारण. प्रस्थापितांच्या पुढल्या पातीस व्यवस्थेत सामील करून घेणे म्हणजेच तरुण पिढीस वाव देणे असा समज या पक्षाने करून घेतलेला असल्याने हे असे झाले. कोणत्याही उपयुक्त वस्तूप्रमाणे राजकीय नेत्यांच्या उपयुक्तता आणि उपद्रवक्षमतेचा म्हणून एक काळ असतो. तो आज ना उद्या संपतोच. काँग्रेसमध्ये तो एकगठ्ठा संपताना दिसतो. अशा वेळी जर पक्षाकडे खऱ्या अर्थाने स्वतंत्र तरुणांची फळी असती तर वातावरणात इतकी निराशा दिसती ना. ती नसल्यामुळे ज्यांचे दहा गेले, पाच राहिलेत अशा नेत्यांना जेव्हा मतदारांनी पराभूत करून घरी पाठवले त्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची एके काळची पुण्याईदेखील घरी गेली. काँग्रेसचे तरुण नेते एकामागोमाग एक कुचकामी ठरू लागले ते यामुळे. या तीर्थरूपांनी ज्या वेळी सत्ता होती त्या वेळी ती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचा विचार केला नाही. कारण त्यांना स्वत:ला सत्तेचा मोह सुटत नव्हता. पुढे लोकांनीच जेव्हा त्यांना पराभूत केले त्या वेळी नसलेला सत्ताधिकार ही नेतेमंडळी आपल्या पुढच्या पिढीकडे देऊ पाहत होती. जे मुळात नाहीच वा नव्हते ते वारसाहक्काने देता कसे येणार? तेव्हा ही अशी अवस्था काँग्रेसच्या वाटय़ाला येणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. तशी ती येऊ नये म्हणून प्रयत्न करण्याचा अधिकार आपल्या अंगभूत घराणेशाहीमुळे काँग्रेसने कधीच गमावलेला असल्याने हे विधिलिखित टाळणे काँग्रेसला शक्य झाले नाही. सत्ता वा अधिकार पुढील पिढीकडे संक्रमित करता येतात. नेतृत्वगुण नाही. हे काँग्रेसने कधीच ओळखले नाही. या अपयशास आणखी एक किनार आहे.
ती म्हणजे बदलत्या काळाची. आजची पिढी उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानात जगणारी आहे. भूतकाळातील ओझे वाहण्यास ती तयार नाही. कारण जगण्याच्या रेटय़ात यशस्वी होण्यासाठीच्या स्पध्रेचे जू आधीच तिच्या मानेवर आहे. तेव्हा या पिढीस गांधी वा नेहरू यांच्या पुण्याईचे फार काही कवतिक आहे, असे नाही. हे काँग्रेसने कधीही लक्षात घेतले नाही. या बदललेल्या वास्तवाकडे काँग्रेसने सोयिस्कर डोळेझाक केली. त्यामुळे पक्षाची भाषाही बदलली नाही. गरिबीचे उदात्तीकरण करणारी भंपक आणि तितकीच भाबडी समाजवादी विचारसरणी हा पक्ष गोंजारत बसला. बरे, त्याबाबतही तो प्रामाणिक असता तर एक वेळ समजण्यासारखे होते. परंतु स्वत: जमीनदारी वृत्तीने जगणारे या पक्षाचे नेते काँग्रेस का हाथ, गरिबों के साथ वगरे तीच ती जुनी पोपटपंची करीत राहिले. ऐंशीच्या दशकापर्यंत ती लोकांनी गोड मानून घेतली. पिचलेल्या मध्यम वर्गास त्या वेळी काही अन्य तगडा पर्यायही नव्हता. परंतु १९९१ नंतर चित्र बदलले. आíथक उदारीकरणाचे मुक्त वारे देशात वाहू लागल्यानंतर मध्यम वर्गाच्या गरजांना धुमारे फुटले आणि त्या वाढत्या प्रेरणांना सामोरे जाण्यात खुद्द काँग्रेस पक्षच  कमी पडू लागला. या काळात संपत्तीचे मोठय़ा प्रमाणावर लोकशाहीकरण झाले. इतके दिवस मूठभर कुटुंबीयांच्याच हातात असलेली संपत्तीनिर्मितीची कला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निमित्ताने अनेकांना गवसली. या काळात अनेक नवनवे उद्योजक जन्माला आले. एकीकडे संपत्तीनिर्मितीसारख्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित व्यवस्थेत लोकशाहीचे वारे वाहू लागल्याचे दिसत असताना राजकारण मात्र घराणेशाही धरून ठेवू पाहत होते. हा विसंवाद होता. हे काँग्रेसने समजून घेतले नाही. अखेर मतदारांनीच हे शिकवण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि काँग्रेसचे जू भिरकावून दिले.
तेव्हा आता या परिस्थितीतून सावरून आपली गाडी पुन्हा रुळांवर यावी, अशी काँग्रेसची इच्छा असेल तर त्या पक्षास काही गोष्टी कराव्याच लागतील. त्यातील पहिल्या क्रमाकांची असेल ती म्हणजे राहुल गांधी यास बाजूला करण्याची. चाळिशी पार करून गेलेल्या या बाप्यास आपल्या जबाबदारीची जाणीव नाही आणि आपण कोणाला उत्तर देण्यास बांधील आहोत असेही त्यास वाटत नाही. पक्षाच्या स्थापनादिनी आपली कृश आई ध्वजवंदन करीत असताना हे चिरंजीव गायब होते. पक्षाचे उपाध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांचा कोणताही, कसलाही सहभाग पक्षाच्या स्थापनादिनात नव्हता. किंबहुना ते हजरदेखील नव्हते. गांधी घराण्याच्या या पुढील पातीस पक्षाने बरीच संधी दिली. या सर्व परीक्षांत ते एकजात अनुत्तीर्ण ठरलेले आहेत. तेव्हा या व्यक्तीच्या हातून काही आपला उद्धार होण्याची शक्यता नाही हे काँग्रेसजनांनी प्रामाणिकपणे मान्य करावे आणि नवे वारे पक्षात कसे वाहू लागतील यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी पक्षश्रेष्ठी संस्कृतीच्या दरबारी राजकारणासदेखील काँग्रेसला तिलांजली द्यावी लागेल.
त्यास इलाज नाही. या प्रामाणिकपणाच्या अभावी १३० वर्षांचा हा जुना वृक्ष नि:सत्त्व आणि निस्तेज झाला आहे. योग्य काळजी घेत बदल केले नाहीत तर तो नामशेष होईल.