अक्कलदाढ आली की वाकडीतिकडी येते किंवा ती दुखते म्हणून काढून टाकली जाते. नक्कलदाढेचं त्याहून वेगळंच.. ती आली तरीही दुखणं सहन करत कायम ठेवावी लागते आणि बाकीच्या दातांना तासावं लागतं. काही जण नक्कलदाढेचं दुखणं सहन करतात, पण बाकीचे दात तासत नाहीत. काही जण बाकीचे दात काढून टाकतात आणि ‘कलेचा आविष्कार’ इतका अगाध की, तासण्याऐवजी काढून टाकलेल्या त्या दातांच्या जागी नक्कलदाढाच उगवतात की हो!

नक्कलदाढ, दात, अक्कलदाढ, दुखणं, दात तासणं किंवा ते तासून धारदार करणं, दात कायम ठेवणं हे सगळे अतिशय अमूर्त, रूपकात्मक किंवा उपमेय-उपमानमधले उपमानास्पद शब्द आधी काढून बाजूला ठेवले पाहिजेत, म्हणून ते सगळे बाजूला काढून या मजकुरासोबतच्या प्रास्ताविकात ठेवून दिले आहेत. समजा ते वापरले तर  वाचणाऱ्यांचा गोंधळ फार वाढेल.. नक्कलदाढ म्हणजे नक्कल करण्याची प्रवृत्ती आणि ‘दात’ म्हणजे स्वत:च्या सर्जनशीलतेचं भांडवल, असं प्रत्येक वेळी, प्रत्येक वाक्यात समजावून सांगावं लागेल, त्यापेक्षा हे शब्द आपण या मजकुरात पुढे वापरायलाच नकोत.. हवं तर अगदी अखेरच्या परिच्छेदातच वापरू, पण मध्ये अजिबात नाही.
विषय चित्रकलेतल्या नकलेचा आहे. शिकण्यासाठी नक्कल आवश्यकच मानली गेल्यास नवल नाही. चित्रकलेपुरतंच बोलायचं तर फार लांब म्हणजे लूव्र किंवा राय्जेविक संग्रहालयांत उमेदवार चित्रकार कसे एकेका ग्रेट मास्टरच्या चित्रासमोर आपापलं चित्रसाहित्य घेऊन सरळ त्या थोर चित्राला नकलून काढतच त्या चित्राचा आस्वाद घेतात, इतकं लांबचं पाहायला नको.  ‘ब्रश असा धरा, तो रंगात असा बुडवा, कागदाला किंवा कॅनव्हासला असा लावा’ वगैरे सूचना तोंडी देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना थेट आपली नक्कल करायला लावणारे शिक्षक शालेय पातळीवर तरी अधिक लोकप्रिय असल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना असेल. मग आर्टस्कूलच्या किंवा चित्रकला महाविद्यालयाच्या पातळीवर एखाद्या चित्रकार-शिक्षकांची व्यक्तिचित्रणाची किंवा निसर्गचित्रणाची पद्धत विद्यार्थ्यांवर इतकी बिंबते की, त्या शिक्षकाचे विद्यार्थी लगेच ओळखू येतात! आपली शैली म्हणजे काय हे ओळखू यावं, अशा काही  ‘शैलीच्या खुंटय़ा’ निसर्गचित्रण किंवा व्यक्तिचित्रणवाले अनेक चित्रकार पूर्वापार पेरून ठेवत असतात.. कुणी व्यक्तीच्या चेहऱ्याकडेला जांभळी छटा आणतं, कुणी व्यक्तिचित्रणात लोण्यासारखा रंग लावतं, कुणी नाका-गालांवरले हायलाइट अगदी टळटळीत देऊन टाळीच मिळवतं.. निसर्गचित्रणात कागद रिकामा ठेवून उन्हाचा टळटळीतपणा दाखवण्याचे उपाय कसे खुबीनं योजायचे, याचे हिशेब तंत्र म्हणून सारखेच असले तरीही शैली म्हणून बदलतात.  कुणी निसर्गचित्रणात अगदी पाना-पानांचं आणि  किल्ल्याची तटबंदी वगैरे असल्यास प्रत्येक दगडा-दगडांचं काम करतं,  कुणी जलरंगांचा वापर करताना ओल्या पाणथळ कागदावरच काम करून वातावरण कुंद करून टाकतं.. तंत्रावरली एकेकाची हुकमत  जशी-जशी असेल, तशी-तशी त्यांची चित्रपद्धत बदलत जाते. मध्यंतरी तर असंही झालं होतं की, अमूर्त चित्रांची आपापली वाट शोधणारे शिक्षक विद्यार्थ्यांना इतके आपले वाटत की, त्यांच्याच वाटेनं त्यांच्याच मागे जाणारे काही विद्यार्थी-चित्रकार होते किंवा आहेत.  मुंबईचे प्रभाकर कोलते आणि पुण्याचे पांडुरंग ताठे हे दोघेही माजी अध्यापक. त्यांना असे अनुभव नक्की असतील, पण ते दोघांनीही कधी स्वत:हून सांगितलेले नाहीत.
कलाशिक्षण संपल्यावर, गॅलऱ्यांच्या जगात आणि त्याहीपेक्षा स्टुडिओच्या चार भिंतींत स्वतंत्र चित्रकार म्हणून उभं राहताना कोणतेही सर उपयोगी पडत नाहीत. उलट त्रासच होतो आणि त्यावर जालीम उपाय म्हणून, आजवर अपरिचित (फक्त स्वत:ला किंवा स्वत:सकट बाकीच्यांना) अपरिचित असलेल्या चित्रकारांचा सहारा घेतला जातो. अनुकरणाची प्रॅक्टिस पुढे चालू राहते.. ‘माझी चित्रं कोलतेंसारखी आहेत असं कसं काय म्हणू शकतील कोणी.. आता तर ती रॉथ्कोसारखी  आहेत..’ असं एका अमूर्त चित्रकाराकडून प्रस्तुत लेखकानं १२ वर्षांपूर्वी प्रत्यक्ष ऐकलं आहे! मात्र आपण कशाची नक्कल करतोय असं लोक म्हणू शकतात, याची पुरती जाण तेव्हाही असलेला तो चित्रकार आता कुणाचीही नक्कल करत नाही.
लुक टायमान्स हेही चित्रकार आणि अध्यापकच. फक्त ते ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’ या नात्यानं अटलांटिकच्या अल्याडपल्याड अगदी अव्वल कलासंस्थांमध्ये फिरत असतात. तेव्हा त्यांचा परिणाम बऱ्याच जणांवर दिसणं साहजिक आहे. त्यांचा एक थेट शिष्य आपल्या भारतात आहे. तो म्हणजे शिबू नटेशन! या शिबूनं हे नेमकं काय केलंय, माणूस रंगवताना तो फिल्म पोस्टरसारखा रंगवलाय की प्लास्टिकच्या बाहुलीसारखा रंगवलाय की छापील चित्राचं चित्र काढलंय, असा प्रश्न बारा-तेरा वर्षांपूर्वी अनेकांना पडला असेल. शिबू (त्या वेळी तरी) भोळा : ‘छापील चित्रावरनं केलंय म्हणून त्यात थोडा फिल्म पोस्टरचा भास असेल, पण तो प्लास्टिकी पोत अ‍ॅक्रिलिक रंगाच्या सपाट वापरातनं येणारच’ असं त्याने सांगून टाकलं. योगायोग असा की, पुढे गिरीश दहिवल (हा आता आपल्यात नाही), रियाझ कोमू आणि टी. व्ही. संतोष हेदेखील तशीच चित्रं करू लागले. ‘तशीच’ याचा अर्थ, त्याच पद्धतीची. या दोघांची चित्रं एकमेकांपेक्षा, शिबूपेक्षा आणि थेट लुक टायमान्सपेक्षाही निराळीच ठरली, याचं कारण चित्रातला विषय आणि तो मांडण्यामागला हेतू!  या चौघांपैकी कुणीही एकमेकांच्या हेतूंचं अनुकरण कधीही केलेलं नव्हतं. मात्र चित्रं एकसारखी दिसत.
ही इथं फसगत आहे..  किंवा एक प्रकारे, आपली परीक्षा- आपण चित्रं पाहातो म्हणजे फक्त ‘डोळय़ांनी बघतो’ की मनानं, बुद्धीनंही पाहातो?
नकलांची दुकानंच काही जण चालवतात  (यात मघाशी घेतलेल्या नावांपैकी एक होतं, म्हणे. खरंखोटं माहीत नाही.)- किंवा पाच वर्षांपूर्वी, अंजोली इला मेननच्या एका ‘असिस्टंट’ चित्रकारानं, या अंजोलीबाईंसाठी त्यानंच एक चित्र अंजोली यांच्या सहीनिशी खपवल्याची सनसनाटी बातमी एका गॅलरीनंच पसरवली होती. एका (आता दिवंगत) ज्येष्ठ प्रोग्रेसिव्ह चित्रकाराची मुलगी त्याच्याचसारखी चित्रं काढते आणि खाली त्याच्या आडनावाची सही करून टाकते, असे म्हटलं जाई. अशा कथा आणि किस्से खूप असतात. त्यात तथ्यही असू शकतं, पण हे जे काही गॉसिप आहे, ते आणि हे गॉसिप ज्या ‘कॉपिइंग इंडस्ट्री’बद्दल केलं जातं तो उद्योगसुद्धा – ‘चित्र म्हणजे हेतुहीन कौशल्यानं घडवलेली कलावस्तू’ आणि ‘चित्रकाराचं नाव म्हणजे जणू ब्रँडनेमच’ अशा दोन गृहीतकांवर आधारित असतात. तेव्हा आपण त्यात न पडणं बरं.
चित्रपद्धत सारखी वापरली, चित्राचं दर्शन साधारण सारखंच आहे, म्हणून – आणि  म्हणूनच-  चित्रं एकमेकांची नक्कल ठरतात का?
कलाकार म्हणून स्वतंत्रपणे वाढायचं असेल, तर कॉपी नको हे ओघानंच आलं. पण ‘प्रभाव’ म्हणून तांत्रिक पद्धतीची नक्कल होते, तशी हेतूच्या प्रभावाखाली पुनर्निर्मिती होऊ शकतेच.
सध्याची दुखणी आणखी निराळी. तंत्रशुद्ध, कौशल्यपूर्ण निर्मितीची कॉपी कोल्हापूर – विजापूर आदी भागांत पूर्वापार सुरूच आहे. पण मुंबईत असले वस्ताद आणि बनेल लोक तयार होताहेत की,  चित्रामागचे किंवा कलाकृतीमागचे कुठले हेतू सध्या ‘चालताहेत’ याची माहिती ते इंटरनेटवरून वगैरे मिळवतात.. मग ते हेतू राजकीय-सामाजिक असल्याचं लक्षात येतं किंवा अगदी काटेकोरच बोलायचं तर, सध्या जगानं स्वीकारलेली आर्थिक घडी शहाणपणाची आहे का, असा सवाल मांडणारे, वंशभेदाच्या नव्या व्याख्या शोधू पाहणारे, शहरावर सामान्य माणसाचा हक्क आहे की नाही यासारखे थेट नागरी प्रश्नच विचारणारे हेतू सध्या ‘चालतायत’ असं लक्षात येतं. मग आपलाही तोच हेतू मानायचा आणि हूं.. करायचं चित्र.. किंवा शिल्प, मांडणशिल्प वगैरे.
हेतू नक्की निराळा होता, पण दुसऱ्याच्या चित्रपद्धतीचा किंवा प्रतिमासृष्टीचा स्वीकार केला, म्हणून वादग्रस्त ठरलेले मोठे चित्रकारही आहेत. तय्यब मेहतांच्या पिढीनं त्यांच्यावर त्यासाठी ‘फ्रान्सिस बेकनचं अनुकरण करणारे’ असा शिक्का कुजबुजत का होईना, मारलाच होता आणि या कुजबुजवाल्यांची तोंडं पुढे मेहतांच्या चित्रांतल्यासारखीच फुटली. हल्लीच्या सुबोध गुप्ताला मात्र फटका बसला नाही. डॅमिएन हर्स्ट या ब्रिटिश चित्रकाराशी सुबोधची काहीशी कुत्सित तुलना होत असे, पण पाच वर्षांपूर्वी हर्स्टनं ‘हिऱ्यांची कवटी’ केली आणि तीन-चारच वर्षांपूर्वी व्हेनिसमध्ये गुप्तानं केलेली ‘स्टीलच्या भारतीय भांडय़ांची कवटी’ विराजमान झाली. गुप्तावर नकलेचा आरोप करण्याची कुणाची टाप न व्हावी, इतपत ‘मूलभूत कार्य’ त्यानं स्टीलच्या भांडय़ांमधलं भारतीयत्व जगाला दाखवून करून ठेवलेलंच आहे.
‘तय्यब मेहता किंवा रियाझ कोमू यांनी दात कसे तासून धारदार केले? आणखी बऱ्याच जणांनी कसे बाकीचे दात पाडून घेऊन नक्कलदाढाच का उगवू दिल्या?’ असे प्रश्न पडल्यास किंवा ‘सुबोध गुप्ताला ‘इंडियाज डॅमिएन हर्स्ट’ असं भारतीय इंग्रजी मीडिया कितीही म्हणाला तरी दोघांचे दात निरनिराळे आहेत,’ असं काही तुम्हाला सुचलं असेल, तर तुम्ही शीर्षक आणि प्रास्ताविक फारच मनापासनं वाचलंय बुवा!