पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये वाचले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे हे लांबलचक नाव व्यवहारात केवळ इंग्रजी आद्याक्षरांनी संक्षिप्त करून वाचण्याची व वापरण्याची पद्धत लवकरच सुरू होईल यात शंका नाही. अनेक विद्यापीठे थोर स्त्री-पुरुषांच्या नावाने सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ वगरे नामावलींमध्ये आणखी एक भर पडली असली तरी विद्यार्थ्यांना वा इतरांना केवळ संक्षिप्त नावातच समाधान असते. मात्र मागणी करणाऱ्यांना किंवा राजकीय पक्षांना त्यातल्या राजकारणाचे महत्त्व असते. विद्यापीठांचेच नाही तर छत्रपती शिवाजी टर्मिनसचे छशिट आणि लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्लाचे लोटिट असे अधिकृत आणि अनधिकृत उपयोग लगेचच सुरू होतात. याने मूळ राजकारणाला किंवा व्यापक सामाजिक प्रबोधनाला किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे. नामकरण करायचेच झाले तर या महामानवांच्या नावातला किंवा श्रेयनामांमधला एकच शब्द उचलणे योग्य झाले असते. निरनिराळ्या ज्ञानसंस्थांची एकेकाच्या नावाने नामकरणाची पद्धत वाढतच जाणार आहे. त्यामुळे हास्यास्पद संक्षिप्त नावांचा धोका पत्करण्यापेक्षा मुळातच छोटे नामाभिधान करण्याचा विचार करावा.
डॉ. शाम अष्टेकर, नाशिक

बदनाम विद्यापीठाला ज्ञानदेवतेचे नाव?
‘नाम बदल नव्हे नाम विस्ताराचे नाटय़’ ही बातमी (‘लोकसत्ता’, २८ ऑक्टोबर) वाचली. सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा ठराव अधिसभेत मंजूर झाला, याचा मलाही आनंद झाला; पण क्षणभरच. आपल्या आदरस्थानी असलेल्या विभूतींची आपण यानिमित्ताने विटंबना तर करत नाही ना असे वाटून गेले.
पूर्वेचे ऑक्सफर्ड असा ज्याचा लौकिक होता ते  पुणे विद्यापीठ आता काय झाले आहे? येथे पीएच.डी. संशोधनाची राजरोस चोरी होते, परीक्षा विभागातून पसे घेऊन गुण वाढवले जातात, वसतिगृहावर विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत, आज तेथील अनेक कर्मचारी, अधिकारी निलंबित आहेत किंवा जामिनावर आहेत त्या विद्यापीठाला आमचे श्रद्धास्थान असलेल्या सावित्रीबाई यांचे नाव द्यायचे?
पूर्वी एका विडीला संभाजी महाराजांचे नाव दिले म्हणून आम्हीच आंदोलन करून ते बदलले आणि विडीपेक्षाही बदनाम झालेल्या विद्यापीठाला, आमच्या ज्ञानदेवतेचे नाव देण्यासाठी आम्ही अट्टहास करत आहोत!
देवयानी पवार, पुणे

CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

समाजाला वेठीस धरणारे भावनिक मुद्दे..
महात्मा फुले यांचे कार्य स्त्रियांच्या आत्मसन्मानाला जागृत करणारे ठरल्याचे दिसून येते.स्त्रीशिक्षण म्हणजे अनतिकता व सामाजिक अनाचाराला निमंत्रण आहे, असा दांभिक प्रचार तत्कालिन सनातनी वर्गाने केला. त्यांनी सावित्रीबाईंना दगड व शेण फेकून मारले. जोतीरावांच्या वडलांवर दडपण आणून त्यांनी जोतीबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढण्यास भाग पाडले. पण जोतीरावांनी सर्व विरोधांवर मात करून मुलींसाठी आणखी शाळा काढल्या.  आज बहुजन स्त्रिया सर्व क्षेत्र व्यापत आहेत. सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. त्यामुळे जर पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात येत असेल तर ती निश्चितच न्याय्य आणि आनंदाची गोष्ट आहे.
 त्यांचे नाव पुणे विद्यापीठाला देऊन विद्यापीठ अधिसभेने आपले कर्तव्य केले, परंतु या नावाला शासन मान्यता मिळणे महत्त्वाचे आहे. तेही याचे राजकारण न करता. लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बहुजन समाजाला खूश करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अन्यथा भावनिक मुद्दे उपस्थित करून समाजाला वेठीस धरू नये. बहुजन समाजानेही अशी आंदोलने करताना सावध राहावे हीच इच्छा.
विश्वास माने, चेंबूर, मुंबई</strong>

मधल्या फळीत वेंगसरकर
‘हा घ्या मुंबईचा कर-करीत संघ..’  या द्वारकानाथ संझगिरी यांच्या पत्रात (लोकमानस- २६ ऑक्टो.) आडनावात  ‘कर’ असलेल्या, सर्व ठिकाणच्या नव्या-जुन्या खेळाडूंची नावे होती.  संझगिरी यांनी मधल्या फळीत लिहिलेले दिलीप वेंगसरकर यांचे नाव संपादनातील अनवधानाने राहून गेलेले आहे. हा ११+१ नावांचा संघ पूर्ण करण्यासाठीही ते आवश्यक होते.

गोपुंना ही ‘वितंडा’ अभिप्रेत नसणार, एवढे नक्की
‘वितंडा आणि भुरळभोग’ या अग्रलेखाने  (१८ऑक्टोबर) गो. पु. देशपांडे यांना आदरांजली वाहिल्याबद्दल धन्यवाद. पण त्यात काही संशयास्पद विधाने आहेत. ती अशी की, ‘वितंडा म्हणजे म्हणजे प्रश्न आणि प्रतिप्रश्न उपस्थित करून रुढ समजांना आव्हान देण्याची कृती.’ पुढे म्हटले आहे, ‘हा शब्द गोपुंनीच प्रचारात आणला आणि वितंडा हे विद्वानांचे कर्तव्यच ठरते, अशा निर्णयपूर्वक भूमिकेतून अनेकांना, अनेकदा सुनावले.’
मुळात ‘वितंडा’ असा शब्द नसून ‘वितंड’ असा आहे. आता, ‘वितंड’ ही संकल्पना तपासणे आवश्यक आहे. कारण ‘वितंड’चा मूळ अर्थ आणि संपादकीयात दिलेला अर्थ यात खूप मोठा फरक आहे. आधी ‘वितंड’ चा मूळ अर्थ पाहू. तो असा :  भारतीय वैदिक तत्त्वचिंतन परंपरेतील ‘न्याय दर्शन’ या नावाने परिचित असणाऱ्या संप्रदायाने तात्त्विक चर्चा करण्याची एक विशिष्ट पद्धती विकसित केली आहे.  वितंडा ही या पद्धतीचा केवळ एक भाग आहे आणि ती स्वरूपाने नकारात्मक आहे.
 तात्त्विक चर्चा ज्या सभेत होते न्यायदर्शनात तिला ‘तद्विदय़ संभाषा’ म्हणतात. तद्विदय़ म्हणजे तज्ज्ञ आणि संभाषा म्हणजे परिषद, सभा. ही सभा चार घटकांनी मिळून बनते. वादी (चच्रेचा मुद्दा उपस्थित करणारा), प्रतिवादी (चच्रेत विरोध करून आपले मुद्दे मांडणारा), सभापति (चच्रेचा आरंभ करून त्यावर लक्ष ठेवणे आणि शेवटी निर्णय देणे, ही कामे करणारी अधिकारी व्यत्ति. सभापतिला ‘मध्यस्त’ असेही म्हणतात),प्राश्निक (अधूनमधून सूचक प्रश्न करणारे, यांनाच ‘सभ्य’ किंवा ‘सदस्य’ असे नाव आहे.) अशी रचना झाल्यानंतर जी चर्चा केली जाते तिलाच ‘वादविवाद’ म्हणतात. वादप्रकियेचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेवून वाद करावयाचा असतो. ही प्रकिया ‘पूर्वपक्ष – उत्तरपक्ष पद्धती’ म्हणून परिचित आहे. स्वतची बाजू मांडणे आणि दुसऱ्याची बाजू खोडणे. स्वतचे मत मांडणे हे मंडन आणि दुसऱ्याचे मत खोडणे हे खंडन. ज्याचे खंडन करावयाचे तो ‘पूर्वपक्ष’ व ज्याचे समर्थन करावयाचे तो स्वतचा म्हणजे ‘उत्तरपक्ष’. चच्रेत स्वतचे मत मांडणे हा सिद्धान्त.
  या प्रकारात एकमेकांचे अस्तित्व टिकवीत, स्वतबरोबर विरोधकाचाही विकास होईल,याची काळजी घेऊन वाद केला जातो आणि निष्पक्ष रितीने योग्य व सत्य निर्णय घेणे शकय़ होते. तोच ‘न्याय’ असतो. ही पद्धती अमलात आणताना जी चर्चा होते तिचे तीन प्रकार आहेत. वाद, जल्प आणि वितण्ड.   
वाद : वाद म्हणजे एखाद्या विषयातील तत्त्व कळावे,या निरपेक्ष हेतूने सुरु केलेली चर्चा. सत्यज्ञान हाच हेतू वादामागे असतो, ‘माझा जय व्हावा’ अशी बुद्धि वादात नसते. वादात कोणतेही खोटे पुरावे सादर कारवयाचे नसतात.समजा चुकून केले गेले तर ते मागे घेऊन वाद पुढे न्यावयाचा असतो. वादी आणि प्रतिवादी यांच्यापकी कुणातरी एकाचाच विजय होतो. पण वाद बरोबरीत सुटला तर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार सभापतिचा असतो. या निर्णयानंतर पुन्हा कुणी वाद घालावयाचा नसतो.वाद करावयाचाच असेल तर ज्या मुद्दय़ावर विजय मिळविलेला असतो, तो वगळून त्यानंतरच्या मुद्दय़ावर वाद करावयाचा असतो. समज, तातडीने उत्तर सुचले नाही किंवा नंतर सुचले तरी वादात चालते. कारण तेथे व्यत्तिगत जय-पराजय महत्वाचा नसून ‘तत्त्वाचे’ ज्ञान महत्वाचे असते.
जल्प :   जल्प म्हणजे ‘दुसऱ्याला हरविणे आणि स्वत जिंकणे’. स्वत कोणताही पुरावा द्यावयाचा नाही पण दुसरा कोठे चूक करतो त्यावर बारीक लक्ष ठेवून त्या चुकीचेच भांडवल करुन त्याचा पराभव झाला, अशी घोषणा करणे आणि नंतर काहीशी दांडगाई करुन चर्चा बंद करणे.  
वितण्ड :   चच्रेचा तिसरा प्रकार म्हणजे वितंड  (संस्कृत वितण्ड). ‘वितंड’मध्ये दुसऱ्याला हरविणे हा हेतू सुद्धा नसतो. केवळ शब्दाला शब्द वाढविणे, निष्फळ चर्चा वाढविणे, कोणताही निर्णय स्वत न घेणे आणि दुसऱ्यालाही घेवू न देणे, शक्य झाल्यास दांडगाई करून चर्चा बंद करून स्वतचा विजय घोषित करणे, हाच हेतू यात असतो.
गोपुंचा भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता. त्यांना राजकीय अर्थाने या भारतीय तत्त्वज्ञानाची पुर्नमांडणी करावयाची होती. उदाहरणार्थ त्यांना ‘षड्दर्शनांचे भारतीय तत्त्वज्ञान आणि त्याचा इतिहास’ मांडावयाचा होता. त्यांनी जाहीरपणे अनेकदा हा मनसुबा व्यत्त केला होता. त्यामुळे त्यांना मूळ ‘वितंड’ चा माहीत नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मग अग्रलेखातील कथित अर्थ कुठून आला? याचा तपास झाला पाहिजे किंवा तोच अर्थ गोपुंचा मूळ अर्थ असेल तर न्यायदर्शनातील मूळ अर्थ शेजारी ठेवून गोपुंचे लेखन समजावून घेतले पाहिजे. किंवा तिसरी एक शक्यता आहे. अग्रलेखात म्हटल्यानुसार प्रश्न आणि प्रतिप्रश्न विचारण्याची मूळ परंपरा समजावून घेतली पाहिजे. पण वितंड म्हणजे प्रश्न आणि प्रतिप्रश्न विचारणे खासच नव्हे.   
– श्रीनिवास हेमाडे, संगमनेर