खेळात पैसा आला की खेळाचा विकास होतो, अशी क्रीडा क्षेत्रातील धारणा असते. पण आलेल्या पैशाचा योग्य विनियोग करून खेळाला उत्तुंग उंची गाठून देणे, हे सर्वानाच जमत नाही. प्रो-कबड्डी लीगच्या अनपेक्षित यशाची चर्चा करताना ही बाब अधोरेखित व्हावयास हवी. तीन वर्षांपूर्वी कबड्डी प्रीमियर लीग (केपीएल) नामक असाच एक फ्रँचायझींवर आधारित फॉम्र्युला कबड्डीमध्ये राबवण्यात आला होता. पण सरकारी प्रक्षेपणातल्या त्रुटी, तांत्रिक गोष्टींचा अभाव, नियमांचा गांभीर्याने न केलेला विचार, खेळाडूंच्या लिलावालाही न दिलेले स्थान आणि दूरच राहिलेले ‘ग्लॅमर’ अशा निस्तेज वातावरणात त्या अल्पजीवी केपीएलचे पहिले पर्व हैदराबादेत पार पडताच तिने दम तोडला!   केपीएलच्या दुर्दैवी अंतानंतर यंदा आनंद महिंद्रा आणि चारू शर्मा या द्वयींनी प्रो-कबड्डीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचलला आणि त्यांना ‘न भूतो’ असे यश मिळाले. देशोदेशींचे खेळाडू, लाखांच्या बोलींची उड्डाणे घेणारा खेळाडूंचा लिलाव, स्टार स्पोर्ट्ससारख्या क्रीडा वाहिनीवरील प्रक्षेपण, उद्योग व चित्रपट क्षेत्राशी निगडित फ्रेंचायझी आणि खेळास वेग देऊन सामन्यांची रंगत वाढवणारे नवे नियम असे सूत्र संयोजकांनी गुंफले. व्यापार-उद्योगाच्या भाषेत सांगायचे तर, या गुंतवणुकीत जोखीम अधिकच होती. त्यामुळे सर्वच साशंक होते. पण जसजसा प्रो-कबड्डीचा हंगाम पुढे जाऊ लागला, तसतसे जनमानसाचे अधिष्ठान त्याला मिळू लागले. टीव्ही प्रेक्षकांच्या आकडेवारीत प्रो-कबड्डी आता फिफा विश्वचषकाला मागे टाकून थेट क्रिकेटशी स्पर्धा करू लागला आहे! महाराष्ट्राशी आणि मराठी मनांशी नाते सांगणाऱ्या कबड्डीचे हे यश सर्वानाच भारावून टाकणारे आहे. राकेश कुमार, अनुप कुमार, नवनीत गौतम, जसवीर सिंग, मनजीत चिल्लर, राहुल चौधरी, प्रशांत चव्हाण यांच्यासारख्या अनेक खेळाडूंना आता तारांकित दर्जा मिळू लागला आहे. त्यांच्या छायाचित्रांसाठी, स्वाक्षऱ्यांसाठी आता लोक उत्सुकता दर्शवू लागले आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन, रॉनी स्क्रूवाला, किशोर बियाणी, राणा कपूर यांसारख्या मंडळींनी यंदाच्या प्रो-कबड्डीत गुंतवणूक केली होती. कबड्डीचे नाणे बाजारपेठेतही खणखणीत वाजू शकते, याचा पहिला प्रत्यय आल्याने आता जाहिराती, उत्पादने आदींतही हा छनछनाट ऐकू आल्यास नवल नाही. त्या वेळी आमची मातीतली कबड्डी ‘हरवली’, नियमांत बदल झाल्याने मूळ खेळाचा ‘गळा घोटला गेला’, असे रडगाणे गाण्याची मुळीच आवश्यकता नाही. एकदिवसीय क्रिकेट ४० वर्षांपूर्वी सुरू झाले, आता तर २० षटकांचे सामने आले, तरीदेखील कसोटी क्रिकेट म्हणजे खरे क्रिकेट, हे समीकरण कायम असते कारण कसोटी क्रिकेट आजही आपली अभिजातता टिकवून आहे. पारंपरिक कबड्डीचा रांगडेपणा राजाश्रय मिळवत होताच, आता  लोकाश्रय ग्लॅमरस ‘प्रो’अवतार मिळवतो आहे, तसा  ऑलिम्पिक-कबड्डीचा  अवतारही लवकरच निघावा आणि त्याने जगताश्रय मिळवावा, ही सदिच्छा बाळगणे इष्ट ठरेल.