गेल्या भागात जो अनुभव वाचला तो कुणाचा आहे, हे महत्त्वाचं नाही. त्यात व्यक्तीनाम महत्त्वाचं नाही की तो व्यक्तिसापेक्षही नाही. आपल्या प्रत्येकाचं प्रतिबिंब त्यात पडतं. कारण सद्गुरूंचा खरा आधार घेण्याच्या आड आपल्यातली समजच येत असते. बालसुलभ वृत्तीला जे नि:शंकतेनं पटतं ते भौतिकाचे अनेक संस्कार झालेल्या मनाला तात्काळ स्वीकारता येत नाही. अर्थात सद्गुरूंचा आधार आपण त्यांच्या कृपेशिवाय पकडूच शकत नाही आणि ती प्रक्रियाही तेच पार पाडतात. अनेक प्रसंगांतून ते भौतिकातील अवलंबनातला फोलपणा मला जाणवून देतात. माझ्या विचारांची मर्यादा जाणवून देतात. व्यापक जगणं म्हणजे काय, हे आचरणातून बिंबवत असतात. त्यांच्यावरचा विश्वास तेच दृढ करीत त्याला निष्ठेचं रूप देतात. सुरुवात मात्र मी केली पाहिजे, ती आहे त्यांच्या बोधानुरूप वागण्याचा अभ्यास. ते काय सांगतात? ते कुणाला घर-दार सोडायला सांगत नाहीत, व्यवसाय-व्यवहार सोडायला सांगत नाहीत, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडायला सांगत नाहीत. ते एवढंच सांगतात की, प्रसंगपरत्वे, परिस्थितीपरत्वे प्रारब्धवशात जे काही कर्तव्यकर्म करावं लागेल ते अचूकतेनं करताना परमात्म्याचं स्मरण ठेवा. कर्म करताना जर ते सद्गुरूइच्छेनं करीत आहोत, हा भाव आला तर कर्म आपोआप त्यांनाच अर्पण होईल. म्हणून माउली सांगतात, देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे। तरी परिपूर्ण सहजें। जाहलें जाण।। आता माझ्या आयुष्यात जे काही दु:ख येतं ते प्रारब्धानं येतं, कुणी माझ्याशी विपरीत वागतो ते प्रारब्धानुसारच असतं; मग कुणाला वाटेल की, मग मीदेखील दुसऱ्याशी वाईट वर्तन केलं तर ते त्याच्या प्रारब्धातदेखील नसेल कशावरून? मग त्यात माझा काय दोष? प्रत्येक कर्म जर प्रारब्धाच्या सिद्धान्तानुसार माझ्या वाटय़ाला येत असेल आणि ते सद्गुरूंना स्मरून केलं तर ते बाधणारं नसेल, तर मग मी वाईट वर्तन केलं म्हणून काय बिघडतं? त्यासाठीच स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवी स्पष्ट बजावते की-
म्हणौनि जें जें उचित। आणि अवसरेंकरूनि प्राप्त। तें कर्म हेतुरहित। आचरें तूं।। १७।। (अ. ३, ओवी ७८).
प्रचलितार्थ : म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते ते तू फळाची आशा सोडून करीत जा.
विवरण : इथे जो ‘म्हणून’ शब्द आला आहे त्याचा अर्थ कळण्यासाठी आधीची ७७वी ओवीही पाहिली पाहिजे. ही ओवी अशी आहे- म्हणशी नैष्कम्र्य होआवें। तरी एथ तें न संभवे। आणि निषिद्ध केवीं राहाटावें। विचारीं पां।। म्हणजे कर्मे टाकून दिली की कर्माच्या खोडय़ातून सुटू, कर्मातीत होऊ असा विचार करशील तर ते शक्य नाही. जो देहात आहे त्याच्याकडून क्षणोक्षणी कर्म होणं अटळच आहे. म्हणून देहधाऱ्याला विहित कर्मे टाकून कर्मातीत होता येणार नाही. मग कर्मे जर करायचीच तर ती वाईट का करावीत? निषिद्ध कर्मे का करावीत? विपरीत कर्मे का करावीत? इथे शब्द येतो ‘म्हणून’!