‘बी.एड.’ची पदवी घेऊन वीणापणी चावला यांनी काही काळ शिक्षिकेचेही काम केले होते. नंतर त्या पत्रकार झाल्या, मग त्यांनी ‘प्राचीन भारताचा राजकीय इतिहास’ या ग्रंथाचे सहलेखन केले.. हे सर्व केल्यानंतर, खऱ्या अर्थाने त्या शिकू लागल्या!
नाटक या माध्यमाची भारतीयता आधुनिक काळातही टिकून राहू शकते, अशा विचाराने हे ‘शिक्षण’ सुरू झाले होते. त्याहीआधी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजतर्फे घेतल्या जाणाऱ्या पियानोवादन आणि (पाश्चात्त्य शास्त्रीय) गायन परीक्षा देऊन, रॉयल शेक्सपिअर थिएटरचे ध्वनिप्रशिक्षक पॅट्सी रोडेन्बर्ग यांच्याकडून आवाजशास्त्राचे शिक्षण त्यांनी घेतले होतेच, पण त्याला कथ्थक नृत्याच्या शिक्षणाचीही जोड होती. पंचविशीनंतरचे शिक्षण हे मयूरभंज छाऊ आणि कुडिअट्टम नृत्यशैली, कलारिपय्यटू हा अभिजात युद्धप्रकार आणि धृपद हा शुद्ध शास्त्रीय संगीतप्रकार, असे होते.
हे सारे का करायचे आहे, काय शोधायचे आहे, याची एक दिशा होती- ‘भारतीय आधुनिक-समकालीन नाटय़’!  केवळ संवादांच्या वा कथानकीय नवेपणाच्या ताकदीवर नव्हे, तर ‘प्रयोगा’तून नाटय़ानुभव देण्याची ताकद भारतातील ठिकठिकाणच्या (आणि तथाकथित मुख्य प्रवाहाने कधीही आपले न मानलेल्या) नाटय़परंपरांमध्ये होती. त्या परंपरांच्या डोळस आणि पुरोगामी पुनरुज्जीवनासाठी १९६० च्या दशकापासून झालेल्या प्रयत्नांपेक्षा निराळे प्रयत्न मुंबईत १९८१ साली त्यांनी स्थापन केलेल्या ‘आदिशक्ती’ या नाटय़संस्थेने सुरू केले, परंतु १९८८ पर्यंत त्यांचा भर पाश्चात्त्य संहितांच्या भारतीयीकरणावर होता. नृत्य हाही नाटय़ानुभव देणाराच प्रकार आहे असे मानणारी दिशा सततच्या शिक्षणातून वीणापणींना सापडत गेली, ती मात्र नवी होती! नृत्यनाटय़ांच्या उदयशंकर-प्रणीत पुनरुज्जीवनवादापासून यक्षगानाला शिवराम कारंतांनी ‘रंगमंच’ देण्याच्या प्रयोगापर्यंतची सारी आणि अल्काझी/ शंभू मित्र/  गिरीश कार्नाड आदींनी नव-भारतीय नाटकासाठी केलेल्या प्रयोगांची ताजीच पाश्र्वभूमी पचवून, आणखी निराळे- सांस्कृतिक बहुविधतेला छेदून साऱ्यांना भिडणारे- असे नाटय़ वीणापणींना घडवायचे होते.  भीम, गणपती, बृहन्नला, हनुमान रामायण असे (परिचित भारतीय कथांवर आधारलेले) ‘प्रयोग’ त्यांनी साकारावेत आणि जाणकारांपासून सामान्यांपर्यंत ज्यांनी ते पाहिले त्यांना ‘नवे काहीतरी अनुभवल्या’चा प्रत्यय मिळावा, असे १९९४ पासून सुरू झाले. या प्रयोगांना अमेरिकेतील विद्यापीठे, फ्रान्स/ जर्मनीतील नाटय़ोत्सव आणि भारतभर दाद मिळाली, तर वीणापणींना २०११ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाला. टेन्थ हेड (रावण) हा प्रयोग २०१३ मध्ये साकारला, त्यात बदल घडवून तो मंचित होण्याआधीच त्या गेल्या.